(घोंगडीची रूपके)
13.
(घोंगडीची रूपके)
माझे घोंगडे पडिले ठायी । माग तया पायी सापडला ॥१॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिके ॥धृपद॥
चोर कुठोरि एकेचि ठायी । वेगळे पाहावे नलगेच काही ॥२॥
आणिकाची चोरली आधी । माझे तयामधी मेळविले ॥३॥
आपल्या आपण शोधिले तीही । करीन मी ही तेचि परी ॥४॥
तुका म्हणे माझे हितचि झाले । फाटके जाउन धडके आले ॥५॥
अर्थ :
माझे घोंगडे कोणत्या ठिकाणी पडले याचा मी मागमूस घेतला तर मला ते देवाच्या पायाजवळ पडलेले सापडले. तो चोर अगदी पक्का आहे व अशा चोराला पुंडलिकाने आपल्या पाठीशी घातले आहे. चोर आणि चोराला आश्रय देणारा पुंडलिक हे दोघेही एकाच ठिकाणी आहेत त्यांना वेगवेगळया ठिकाणी पाहाण्याची गरज नाही. अहो या चोराने तर या अगोदर खूप घोंगडया चोरुन आणल्या आहेत आणि त्याच घोंगडयामध्ये माझे देखील घोंगडे मिसळून टाकले आहे. इतर साधूसंतांनी आपला आपणच शोध केला त्याप्रमाणेच त्यांच्यासारखे मी वागेन व मी देखील आपला आपणच शोध करीन. तुकाराम महाराज म्हणतात, माझे पंचमहाभूताच्या ठिगळांनी शिवलेले फाटके घोंगडे देवाने चोरुन नेऊन मला त्याने ब्रम्ह अवस्थेचे नवीन व तेजोमय घोंगडे दिले यामधे माझे खरे तर हितच झाले आहे.
घोंगडी अभंग समाप्त
