जैशा तुम्ही दुरी आहा
2340.
जैशा तुम्ही दुरी आहा । तैशा राहा अंतरे ॥१॥
नका येऊ देऊ आळ । अंगी गोपाळ जडलासे ॥धृपद॥
अवघा हाचि राखा काळ । विक्राळ चि भोवता ॥२॥
तुका म्हणे मज ऐशा । होता पिशा जगनिंद्य ॥३॥
अर्थ :
देवाशी अनन्य असलेली भक्त स्री म्हणते की हे सखयानो जश्या तुम्ही आता माझ्यापासून दूर आहात तशाच दूर रहा. माझ्या अंगी गोपाळ जडला आहे व त्याच्याशी व्याभिचार केल्याचा आळ माझ्यावर आला आहे तसा आळ तुमच्यावर येऊ देऊ नका. तुमच्या भोवती मृत्यू रुपी विक्राळ काळ आहे त्याच्या पासूनच तुमचे तुम्ही रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर माझ्यासारख्या देव वेड्या झालात तर तुम्ही ही माझ्यासारख्या जगात निंदेला पात्र व्हाल (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी सामान्य कोटीतील स्त्रियांना उपरोधिक भाषेमध्ये परमार्थाचा उपदेश केला आहे. )
