वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ७. संत महिमा अभंग ७१० ते ७२०

पूर्वजन्मी सुकृते थो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074565 · अभंग क्र. ७१९

719.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली ।
ती मज आणि फळासी आली ॥१॥
परमानंदु आजि मानसी ।
भेटी जाली या संतांसी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे ।
यांते भेटावया मन न धरे ॥३॥
एक एका तीर्थाहुनि आगळे ।
तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु जाला ।
जैसा अचेतनी प्राणु प्रगटला ॥५॥
वत्स विघडलिया धेनु भेटली ।
जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥६॥
हे पियूषापरते गोड वाटत ।
पंढरीरायाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवर विठ्ठले ।
संत भेटता भवदुःख फिटले ॥८॥

अर्थ :
मी मागील अनंत जन्मामध्ये थोर पुण्यकर्मे केली होती. ती आज मला फलद्रूप झाली? कशाहून म्हणाल तर संताची भेट होऊन त्यांच्या कृपाप्रसादाने माझ्या अंतकरणांत परमानंदाचा लाभ झाला. त्यामुळे व्यवहारांत आई, बाप, इष्ट मित्रयांच्या भेटी व्हाव्यात असे माझ्या मनांतसुद्धा येत नाही कारण त्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद क्षणिक असतो. संताचा अधिकार काय सांगावा? तो गंगा, यमुनादि तीर्थाहूनही मोठा आहे. कारण संतांच्या समुदायांत भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष असतो. त्या परमात्म्याचा आनंद किती विलक्षण आहे म्हणून सांगावे. एका दरिद्रयाला एकाएकी धन मिळावे, किंवा मेलेल्याच्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रगट व्हावा, या गोष्टी न घडणाऱ्या तर खऱ्याच पण जर घडून आल्यातर त्यास काय आनंद वाटेल. ज्याप्रमाणे आपल्या आईची ताटातूट झालेल्या वासराला आई भेटावी किंवा हरणीस चुकलल आपले पोर भेटावे म्हणजे त्यांना जसा आनंद होतो. त्या प्रमाणे मला आनंद प्राप्त झाला आहे. या पारमार्थिक आनंदाचे माधुर्य अमृतापेक्षाही जास्त आहे. माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे भक्त जे संत त्यांची आज मला भेट झाली. त्या भेटीनेच माझे संसारदुःख निवृत्त झाले. म्हणूनच म्हणतो की. आजपर्यंत अनेक जन्मांत जी मोठमोठी पुण्य कमे केली ती आज मला फलद्रूप झाली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग