न चलति शब्द खुंटले प
448.
न चलति शब्द खुंटले पै वाद ।
एकतत्त्व भेद नाही रुपा ॥१॥
ते रूप पंढरी क्षरले चराचरी ।
माझे माझ्या घरी बिंबलेसे ॥२॥
बापरखुमादेविवरू पुंडलिका वरू ।
निळियाचा आगरू पंढरीये ॥३॥
अर्थ :
श्रीपंढरीरायाचे स्वरूपाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी शब्दांचे काही चालत नाही सर्व प्रकारचे वाद खुंटून जातात. कारण या एकस्वरूप असलेल्या तत्त्वास खरे म्हणजे नामरूपाचा भेद असु शकत नाही. परंतु हेच रूप विठ्ठलाच्या रूपाने चराचरांच्या रक्षणासाठी पंडरपूरात अवतरले आहे. आणि माझ्याही अंतःकरणात तेच बिंबलेले आहे. माझा हा बाप रखुमाईचा पति श्रीविठ्ठल पुंडलिकाला वर देणारा असून निळसर रंगाचे जणू तो आगरच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
