दुर्जनाच्या संगे दुर
510.
दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती ।
कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥
सज्जन संगती करिता तेचि रूप ।
आनंदाचा दीप बाणताती ॥२॥
दुर्जनाशी दिसे सर्व सृष्टी बद्ध ।
न दिसे काही शुद्ध सर्वथैव ॥३॥
सज्जनांसी भासे विश्व पूर्ण मुक्त
एकत्वी आसक्त न दिसती ॥४॥
सज्जनादुर्जनातीत जे निर्जन ।
तेथे संमर्जन ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ :
दुर्जनांच्या संगतीने दुर्जनत्व येते. मग अशा संगतीने साधकाला विश्रांती मिळणार कशी. सज्जनाच्या संगतीने सज्जनपणा येऊन ते आनंदाची प्राप्ती करून देतात. दुर्जन मनुष्याला सर्व जग बद्धच आहे असे वाटते. त्याला जगात शुद्ध असे काही दिसतच नाही. सज्जनाला सारे जगत मुक्त असे वाटते. 'देखे आपुली प्रतिती जगचि मुक्त' या माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे एकसारखे आसक्त दिसत नाही. सज्जन दुर्जनांच्या दृष्टीच्याही पलीकडे जे निर्जन त्या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो.
असे माऊली ज्ञानेश्वर म्हणतात.
