वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४६. लक्ष्मणाचे सरयूप्रवेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088331 · अभंग क्र. ४६

46.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय शेहेचाळिसावा ॥
सीतेचे वनांत गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तदनंतर सुमित्रात्मज । रजनी क्रमोनी गभस्ती तेजःपुंज ।
उदयो होता जे वदला अग्रज । तया कार्या करितसे ॥१॥
सुमंताप्रति बोले वचन । मुख कोमाईलें दिसे विवर्ण ।
सारथियासहित रथ उत्तम जाण । येथे शीघ्र आणावा ॥२॥
श्रीरामाची आज्ञा ऐसी । रथी वाहोन जानकीसी ।
सीतेचेही आवडी मानसी । ऋषिआश्रम पहावे ॥३॥
मी नेतो वैदेहीतें । पहावया ऋषिआश्रम पुण्यतीर्थे ।
तरी सुमंता शीघ्र रथातें । आणावें आज्ञेकरोनी ॥४॥

लक्ष्मणाच्या आज्ञेप्रमाणे सुमंताने रथ आणलाः

ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । तत्काळ सुमंतें उठोन ।
रथ आणिला रत्नखचित सुवर्णवर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥५॥
सुमंत म्हणे सुमित्रात्मजा । रथ आणिला कुलजा ।
आता करावे योजिले काजा । महाराजा शक्रारिहंत्या ॥६॥
ऐसे सुमंतमुखींचें वचन । ऐकोनि सुमित्रानंदन ।
प्रवेशला जेथे जनकाचें कन्यारत्न । परम पावन पतिव्रता ॥७॥

सीतेने त्या रथांतून वनश्री पाहाण्यासाठी यावे अशी लक्ष्मणाची तिला विनंती :

मग तो पुरूष-पंचानन । जानकीप्रति अग्रजाचें वचन ।
बोलता झाला माते तुजलागोन । श्रीरामे रथ पाठविला ॥८॥
रथी आरुढोनियां भद्रे । तुम्ही वन पहावया श्रीरामचंद्रें ।
पाठविले वो गुणसमुद्रे ।गंगेचिये पैलतीरा ॥९॥
मजबरोबरी वो शुभानने । रथी बैसोनियां वने उपवनें ।
पाहे ऋषिआश्रम सिध्दस्थाने । तपोधन जेथे वसती ॥१०॥
शीघ्र चालं वो झडकरी । श्रीरामाज्ञा वंदोनि शिरी ।
तुझे मनोरथ वनांभीतरीं । पाहता पूर्ण करीन पै ॥११॥
तुवा श्रीरघुनाथा मागितले । ते तुज श्रीरामे दिधले ।
आता चालिजे शीघ्र काळे । वनवासासी जनकात्मजे ॥१२॥
ऐसे सौमित्र बोलल्यावरी । जानकी संतोषोनि ते अवसरी ।
वना जावयाचा उल्हास भारी । हृद्यमंदिरीं उंचबळला ॥१३॥

सीतेने निघण्याची तयारी केली, परंतु अपशकुनामुळे ती सचिंत :

वनवासी ऋषीकारणें । सवे घेतलीं दिव्य वस्त्रे भूषणे ।
नानापरींचीं रत्नें धनें । फळे मिष्टांन्ने घेतलीं ॥१४॥
विजनी मुनिपत्न्या सती । तया द्यावया भूषणे सीता सती ।
घेती झाली होती आइतीं । नानाविध वस्त्रेंही ॥१५॥
वैदेही म्हणे सुमित्रासुता । मोटा बांधोनि घालिजे रथा ।
वनी वसती ऋषींच्या कांता । त्यांसी द्यावयाकारणे ॥१६॥
पुनरपि बोले मैथिली । लक्ष्मणा मी तुजजवळीं ।
विनंती करितें ये काळी । सावध होवोनि अवधारिजे ॥१७॥
मी पाहीन ऋषिआश्रमातें । अशुभचिन्ह मज का होते ।
वामनेत्राचे लवतें पातें । सर्वांगी कंप होतसे ॥१८॥
शरीरी अवस्था वाटत । हृद्यीं चिंता वर्तती बहुत ।
धारणा माझी चंचळ होत । वनवासासी जावया ॥१९॥
लक्ष्मणा आजि हे पृथ्वी । उद्वस वाटते माझे जीवी ।
दिशा दाटल्या बहुत धुई । कळाहीन सूर्य दिसतसे ॥२०॥
माझा भ्रतार माझे दीर । सासू सुहृद आणि सहोदर ।
श्रीरामभक्त श्रीरामकींकर । पुरवासी जन सुखी असो ॥२१॥
ऎसे जानकी वदोन । स्तुति करी देवता प्रार्थून ।
अहो अबिंके हा रघुनंदन । सुहृदेंसी कल्याण असो ॥२२॥
ऎंसे जानकी वदल्यावरी । लक्ष्मण विनीत जोडील्या करी ।
म्हणे माते तुझ्या उत्तरीं । सर्वांसी क्षेम होईल ॥२३॥
धरणिजे तुझे आशीर्वादें । माझे मनोदेवतेसी निघाली दोंदें ।
तुवा चिंतिलीं कल्याणशब्दें । तरी सर्वांसी कल्याण पै असे ॥२४॥

लक्ष्मण सीतेसह गोमतीतीरावर आला :

तदनंतर आरूढोनि रथी । प्रयाण करी वनाप्रती ।
नगर साडोंनि प्रथम वस्ती । गोमतीतीरी पै केली ॥२५॥
गोमतीचें तीर् पावन ।तिचे उत्तरे नैमिषारण्य ।
जेथे सदशिव आपण । पार्वतीसहित पै असे ॥२६॥
तया क्षेत्री अद्यापि जाण । वाळूच्या लिंगाचे दर्शन ।
करिती जन पुण्यपावन । अभक्तां सहसा लिंगदर्शन नाही ॥२७॥
ऎसिये गोमतीप्रती ।प्रथमदिवशी केली वस्ती ।
उद्य होतांचि गभस्ती । सारथ्यासि म्हणे लक्ष्मण ॥२८॥
शीघ्र संजोगी रे रथ । आजि भागीरथींतीरीं सुस्नात ।
स्नान तर्पण करू तेथ । माध्यान्हिक कर्माते ॥२९॥
आजि भागीरथीचें पाणी । मस्तकी धरूं सुस्नात होवोनी ।
जैसे ईश्वरें मौळीचिये स्थानी । विश्णुपादोदक धरियले ॥३०॥
शक्रारिअरिचें ऎकोनि वचन । सारथियानें शीघ्रचि जाण ।
रथ संजोगिला मनाहून । वेग बहुत वारूंचा ॥३१॥

गंगाकिनारी आगमन :

आरूद्ढोनि रथावरी । सीतेसहीत रावणात्मजारी ।
पावले पंचदश घटिकांभीतरीं । भागीरथीच्या तीरांते ॥३२॥
तेथे करोनि संध्यास्नान । पित्रुतर्पण ब्राम्हणपूजन ।
माध्यानिक क्रिया सारून । उद्वेगी मन सुमित्रांचे ॥३३॥

लक्ष्मणाचे दुःख पाहून जानकी त्याला धीर देते :

आठविली अग्रजाची मात । जे सीता त्यागी वनांआंत ।
तो काळ समीप जाणोनि सौमित्र । स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥३४॥
लक्ष्मणाचे देखोनि रूदन । धर्मज्ञ जानकी बोले वचन ।
तुम्ही रडता काय कारण । जान्हवीतीर पोहोनियां ॥३५॥
जान्हवीतीर पुण्यपावन । ईंचे दर्शन कल्मषदहन ।
इचा महिमा चतुरानन । वर्णू न शके स्ववाचा ॥३६॥
हा माझा हर्षकाळ । ईस देखोनि सुखकल्लोळ ।
तुम्ही रुदन करावया काय मूळ । ते मजप्रति सांगिजे ॥३७॥
श्रीरामासमीप पार्श्वभागीं । वस्ती लक्ष्मणा तुम्हालागीं ।
या वियोगदुःखें तुम्ही फुंदा आंगी । शोकसागरी पडता हो ॥३८॥
मजसारिखी प्रीति तुजवरी । अधिक लक्ष्मणा श्रीराम करी ।
शोक सांडोनि ये अवसरी । मज परपारीं उतरावे ॥३९॥
परपारीं आम्ही उतरोन । तेथे वसती मुनिगण ।
तयांचे करू दर्शन पूजन । अलंकारभूषणे देवोनी ॥४०॥
तेथे एक रात्र करू वस्ती । प्रभाते अयोध्यापुरीप्रती ।
गमन कीजे श्रीरघुपती । जेथे राज्य करीतसे ॥४१॥
शीघ्र लक्ष्मणा ये समयी बरवी । विस्तार्ण सुंदर नाव आणवीं ।
पैलतीरीं उतरोन गोसावी । महानुभावांसी भेटणें ॥४२॥
हे ऋषिरामायण । उत्तरकांड कल्मषदहन ।
एका जनार्दनी विनंती पूर्ण । संत सज्जन परिसा तुम्ही ॥४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
सीतालक्ष्मणवनाभिगमनंनाम षट्चत्वारिंशोध्यायः ॥४६॥ ओव्या ॥४३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग