दळण - अभंग १७४ ते १७
174.
दळण - अभंग १७४ ते १७५
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ.॥
वैराग्य जाते मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें॥येई ॥१॥
स्थुळ सूक्ष्म दळियले देहकारणसहित महाकारण दळियले औट मत्रेसहित । येई ॥२॥
दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं॥येई ॥३॥
एकवीस स्वर्ग दळियेले चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंली सप्त सागरांसहित । येई ॥४॥
बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित॥येई ॥५॥
नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेले ब्रह्मा विष्णुसहित॥येई ॥६॥
ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानसहित । मीतुंपण दळियेले जन्ममरणसहित । येई ॥७॥
ऐसे दळण दळियेले दोनी तळ्यासहित एका जनार्दनी कांही नाही उरले द्वैत॥येई ॥८॥
