॥ श्रीएकनाथमहाराजकृत
5.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय पाचवा ॥
सुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणारि म्हणे अगस्ती । तुझेनि मुखें सुकेश उत्पत्ती ।
वर लाधला शैलजात्मजापती । महादेवें प्रीती पाळिला ॥१॥
तयाकारणें वस्तीसी । गंधर्व लोक यमपुरासीं ।
राज्यीं स्थापोनि तयासी । पुढे काय ऋषी वर्तले ॥२॥
ते सांगावे आम्हांप्रती । तू कृपाळु कृपामूर्ती ।
तुजसमान नाही त्रिजगती । तुझी कीर्तीं न वर्णवे ॥३॥
तुवा प्रशिला अपांपती । तुझेनि विंध्याद्रीसी निद्रास्थिती ।
तुझेनि सूर्यास मार्गप्राप्ती । तुवा इल्वकवातापी मारिला ॥४॥
ऐसा तुझा अगाध महिमा । वाचा वर्णू व शके ब्रह्मा ।
परादि वाचा शिणल्या मज रामा । वर्णिले तुम्हा न वचे ॥५॥
राक्षसवंशासंबंधी रामांचा अगस्तींना प्रश्न :
यालगीं जी ऋषिवर्या । मजा झाले परमाश्चर्या ।
राक्षसवंश महाऔदार्या । शिववरद पावावया किंनिमित्त ॥६॥
मग तो सुकेश आपण । गिरिजापतीचा वर लाहोन ।
स्वकर्मस्वधर्मीं सावधान । पुढील निरूपण मज सांगा ॥७॥
अगस्ति म्हणे कमलोद्भवजनका । नीरपुरीनायकाच्या प्राणघातका ।
आम्हा पुससी हे अपूर्व देखा । वाटतसे दातारा ॥८॥
ग्रामणी नामक गंधर्वाने सुकेशाला आपली कन्या दिली :
सुकेश धार्मिक जाणोन । ग्रामणी नामे गंधर्व आपण ।
तपस्तेजें तो दारूण । दुसरा जाण विश्वावसु ॥९॥
तयाचे घरी कन्या सुंदरी । जैसी कर्पूरगौराची गौरी ।
नातरी लक्ष्मी विष्णूचे घरी । तैसी कुमरी तयाची ॥१०॥
देव वानती तियेचे गुण । ते ग्रामणी गंधर्वे आपण ।
सुकेशासी प्रीती दिधली दान । विधिविधान पै केले ॥११॥
मग ती दोघे शिववरदेंकरी । ऐश्वर्य भोगिती निरंतरी ।
स्वर्ग अप्राप्त इतरां भारी । ते सुखा गजरीं भोगिती ॥१२॥
स्वर्गी दोघे क्रीडा करिती । गगनी जेवी निशापती ।
किंवा विमानी शचीपती । तेंवी विचरती पै दोघें ॥१३॥
त्या दोघांना तीन मुले झाली :
तदनंतरे देववतीसी । गर्भ संभवला तियेसी ।
तीन पुत्र समान त्रिनेत्रेंसीं । तियेचे कुसीं जन्मले ॥१४॥
त्यांचे केले जातक कर्मासी । तयांची नावे तू परियेसीं ।
सुमाळी माल्यवंत माळी ऐसी । तुजपासी सांगितली ॥१५॥
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । तैसे तेजे शोभती तीन्ही ।
दिवसेंदिवस थोर होवोनी । पितृभजनीं सादर ॥१६॥
पितृआज्ञे तिघे जण । मेरुशिखरी तप आचरोन ।
तपें संतुष्ट चतुरानन । येवोनि आपण बोलत ॥१७॥
तिघांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मदेवाचा वर :
तुम्ही तप केले निघोर । तेणे हर्ष मज झाला थोर ।
आता काय मागाल तो वर । तुम्हा सत्वर देईन ॥१८॥
हात जोडोनि तयांप्रती । मग तिघे राक्षस विनविती ।
आम्ही तिघीं वसावें एकत्री । अपार संपत्ती भोगित ॥१९॥
आयुष्य व्हावे आत्यंतिक । वैर व्हावे आमुचे रंक ।
आणि प्रताप अधिकाधिक । इतुके आवश्यक दे आम्हा ॥२०॥
ऐकोनि तयांचे वचन । हांसोनि बोले चतिरानन ।
जे इच्छा ते दिधले जाण । सत्य भाषण पै माझे ॥२१॥
इतुके बोलोनि प्रजापती । विमानारीढ सत्यलोकाप्रती ।
गेलियामागें अवनि जापती । काय करिती ते राक्षस ॥२२॥
शिल्पशास्त्रीं अति प्रवीण । ऐसा जो विश्वकर्मा जाण ।
तयाच्या भवनाप्रति जावोन । करिती स्तवन तयाचे ॥२३॥
त्या तिघांनी विश्वकर्म्याकडून लंकानगरी वसविली :
सुकेशपुत्र म्हणती विश्वकर्म्यासी । तुझा महिमा न बोलवे आम्हांसी ।
तू केवळ सृष्टीकर्ता सत्यत्वेंशीं । निर्माण करिसी भवनातें ॥२४॥
तुवा सुरवरांकारणें । रचिली नानापरी भवने ।
नाना मंदिरे नाना पट्टणे । गुह्यस्थानें निर्मिलीं ॥२५॥
तरी आम्हांकारणें समर्था । मंदिर पाहिजे सर्वथा ।
मेरू मांदार अथवा हिमपर्वता । यांच्या आश्रयानें करावे ॥२६॥
ऐकोनि तयांची वाणी । विश्वकर्मा विचरे मेदिनीं ।
दक्षिणसमुद्रामाजी दोनी । पर्वत नयनी देखिले ॥२७॥
पर्वतेंसीं पर्वत समीप जाण । त्रिकूट ऐसे त्यां अभिधान ।
उंच तीस योजने विस्तीर्ण । तोय परिपूर्ण सरोवरीं ॥२८॥
लंकानगरीचे वर्णन :
मग तो विश्वकर्मा तेथ । लंकानगरी निर्माण करित ।
भोवते दुर्ग शोभिवंत । परिघ विचित्र समुद्राचा ॥२९॥
नगरी शोभे हाटकवर्ण । हाटवटिया शोभायमान ।
हुडे अटोळिया सप्तखण । माजी दुखणें बहुवस ॥३०॥
चहू दिशासीं चार दारवंटे । आगडा सांखळ्या वज्रकपाटॆं ।
परवीरांचे हृदय फुटे । देखोनि नेटे ते काळी ॥३१॥
तोरणे मखरे बहुवस । माजी शोभती मिक्तघोंस ।
द्राक्षामंडपछाया मार्गस्थांस । विश्रांतीस पै देखा ॥३२॥
देखोनिया लंकेची थोरी । लाजे अमरावती हात चुरी ।
भोगवती दडाली पाताळविंवरीं । कैलासही सरी ते न पवे ॥३३॥
करावे लंकेचें वर्णन । कथा विस्तारेल अति गहन ।
त्याहिमाजी मी अपुरातें दीन । बुद्धिहीन पै असे ॥३४॥
यालगीं जी करावी क्षमा । जैसे बालक नेणे शुभा-शुभ कर्मा ।
तयावरी जनकजननीचा प्रेमा । तया सुखासी सीमा पै नाही ॥३५॥
मग तो विश्वकर्मा तयांप्रती । सांगता झाला श्रीरघुपती ।
तुम्ही करावी तेथे वसती । लंका नाम नगरींसी ॥३६॥
नर्मदानामक गंधर्वस्त्रीनें त्या तिघांना तीन कन्या दिल्या :
याउपरी रजनीचर तिघे जण । वसविते झाले लंकाभवन ।
नर्मदा नामे गंधर्वी जाण । तिघी कन्या तिये घरी ॥३७॥
ह्री श्री कीर्ती तिघी बहिणी । नर्मदा गंधर्वी त्यांची जननी ।
देती झाली राक्षसांलागोनी । अनुक्रमेंकरोनी राघवा ॥३८॥
तिघे गृहस्थ होऊन । तिघी स्त्रियांसीं विराजमान ।
क्रीडती वनोपवन । जेंवी मघवा अप्सरांसीं ॥३९॥
तिघांचा वंशविस्तार :
आता तया तिघांची वंशोत्पत्ती । सांगेन तुज जानकीपती ।
माल्यवंताची स्त्री सुकृती । तिसी सहा पुत्र एक कन्या ॥४०॥
वज्रमुष्टि विरुपाक्ष दुर्मुख । चवथा सुप्तघ्न पांचवा यज्ञकोप देख ।
मधुमंत ऐसे षट् क । सातवी कन्या अनळा पै ॥४१॥
आता सुमाळिपासाव उत्पत्ती । ऐके गा ये धरणिजापती ।
तयाची भार्या कुसुमावती । चंद्रासारिखें मुख जिचें ॥४२॥
सुमाळिवीर्ये जाणा । तियेचे उदरी संताना ।
तेरा पुत्र तिघी कन्या । त्यांच्या नामाभिधाना अवधारी ॥४३॥
प्रहस्त अंकपन विकट । कंकपत्र धूम्राक्ष कालिकामुख ।
सुपार्श्व महामती देख । घस प्रघस भासकर्ण ॥४४॥
पुण्योत्कट बळाहक । कैकसी शुचिस्मित एक ।
कुंभीनसी तिसरी देख । त्रयोदश पुत्र तिघी कन्या ॥४५॥
आता माळीचे संताना । सांगतसें पद्मिनीरमणा ।
तयाची स्त्री वसुमती नाम्ना । देखोनि वदना शशी विटे ॥४६॥
माळीचेनि वीर्ये संभूत । सुमतीस झाले चवघे सुत ।
तयांचीं नामे विख्यात । अनळ अनिळ हंस व संपाती ॥४७॥
हे चवघे राक्षसपुत्र । बिभीषणाचे मंत्री पुण्यवंत ।
यांसही झाले बहुसाल पुत्र । एकैकशत एकैका ॥४८॥
यांचे भयेंकरीं जाण । काळ तोही कंपायमान ।
शचीपति तेथे बापुडे दीन । दुर्धर अंगवण पै यांची ॥४९॥
माळिच्या पुत्रांच्या उन्मादानें देव व ऋषी त्रस्त :
हे अवलोकिती ऊर्ध्वदृष्टी । तंव हिमकर धाक धरी पोटी ।
भेणे दिग्गज लंघिती द्वीपांच्या शेवटी । यांशेवटीं वीर नाही ॥५०॥
ययांचे भयेकरून । मुनि ऋषी कंपायमान ।
विध्वंसिती महायज्ञ । जप ध्यान तेथे कैंचें ॥५१॥
ब्रह्मवरदे होवोनि उन्मत्त । सुरासुरा त्रास देत ।
यांचे दृष्टीस जो वीर पडत । तो पावत यमपुरा ॥५२॥
हे आपौले भुजबळेंसीं । स्व इच्छे हिंडती पृथ्वीसीं ।
ययांचिये अंगवणेंसीं । इंद्र तुळणेसी न पावे ॥५३॥
पुढिले अध्यायीं निरुपण । समस्त सुगरण मिळोन ।
प्रार्थितील शैलजारमण । दीनवदन हो उनी ॥५४॥
एका जनार्दना शरण । श्रीरामे रम्य रामयण ।
वदनी वदविता श्रीजनर्दन । पुढील निरुपण अतिरम्य ॥५५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सुमालिमाल्यवंतमालिजन्मकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥ ओंव्या ॥५५॥
