॥ श्रीएकनाथमहाराजकृत
13.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय तेरावा ॥
रावणाचे अलकावतीस गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
तदनंतरे ब्रह्मलोकगुरू । रावणासि देवोन वरू ।
केला लंकेचा ईश्वरू । दोघा बंधूसमवेत ॥१॥
तिघांसि पाणिग्रहण झाले । रावणासी राज्य लाधले ।
मेघनादाचें जनन सांगितले । पुढील कथा अवधारा ॥२॥
राज्य करिता विबुधारिजनक । प्रजालोक स्वस्थ सकळिक ।
कोणी एके काळी घटश्रोत्र देख । विनविता झाला बंधूसी ॥३॥
अहो जी नृपति अवधारी । तुम्ही ज्येष्ठ बंधू आहां शिरी ।
मज निद्रा बाधी भारी । काळकूटासमान ॥४॥
मागणीप्रमाणे कुंभकर्णाला झोपण्यासठी रावणाने मंदिर बांधून दिले :
निद्रा बाधीतसे राजेंद्रा । आवडी नाही भोगापचारां ।
मजकारणें धाम करा । सुखशयन करावया ॥५॥
ऐकोनि अनुजाचें वचन । रावण हांसिला खदखदून ।
विश्वकर्मा मग पाचारोन । तया आज्ञा देता झाला ॥६॥
कुंभकर्णालागीं मंदिर । करावे उत्तम सपरिकर ।
तेणे आज्ञापिले शिल्पकार । ते मंदिर करिते झाले ॥७॥
लांब रूंद दीर्घ बहुत । अति रमणीय मन निवे तेथ ।
आगबाधा तस्कराघात । नाही तया मंदिरी ॥८॥
स्फटिकांचे खंब विचित्र । सुवर्णकरोनि लिहिलें चित्र ।
वैडुर्यशोभा सुंदर । किंकिणीज्वाळा लाविल्या ॥९॥
मुक्ताफळांची तोरणे । लाविलीं असती गहनें ।
पहाता उंच गगन ठेंगणें । ऐशा माने निर्मिलें ॥१०॥
देखता सर्व सुख पाविजे जेथे । राक्षसाचें मन निवे तेथे ।
देखता श्रमांपासून सुटिजे । निर्मिलें मेरूसमान गृहातें ॥११॥
देखोनि मनोहर स्वधाम । तेथे कुंभकर्ण करी विश्राम ।
बहुत वर्षे निद्रा परम । जागृती नोहे कदाकाळीं ॥१२॥
कुंभकर्ण निद्राभिभूत । देखोनि दशानन काय करित ।
ते अवधारिजे सावचित्त । श्रोतृजनीं सादर ॥१३॥
श्रोता उदास कथेसी । ते कथा होय विरसी ।
जीवनेंवीण धान्यें जैसी । सुकोनि जाती आपसया ॥१४॥
श्रोता कथेसी सादर । तरी वक्तयासि उल्लास थोर ।
ते कथा नव्हे क्षीरसागर । स्वाद विचित्र तेथींचा ॥१५॥
रावणाने देवांदिकांना संत्रस्त केले :
देव ऋषि यत्र गंधर्व । सिद्ध चारण मानव ।
यांसि त्रासिता झाला दशग्रीव । वारिता नाही पै कोणी ॥१६॥
आपुले स्व इच्छेसीं । क्रीडे उद्यानादि विचित्र वनांसीं ।
नंदनवनीं जळक्रीडेसी । करी बळेसीं रावण ॥१७॥
जेंवी नदीमध्ये गजपती । किंवा वायु झडपे वृक्षाप्रती ।
की व्रज झगटे पर्वती । तैसा राक्षस विध्वंसित ॥१८॥
कुबेराने रावणाकडे दूत पाठविला :
हे ऐकोनि कुबेर जाण । दूत पाचारिला अति सज्ञान ।
तयासि म्हणे तू जाऊन । रावणालागून सांगावे ॥१९॥
स्वधर्म अनुकूळ रायासी । दूता सांगशील क्षात्रधर्मासी ।
जेणे पूर्वज होती संतोषी । त्या प्रकारासी सांगावे ॥२०॥
ऐकोनि वैश्रवणवचन । दूतें मस्तक खालावून ।
प्रवेशला लंकाभवन । प्रथम बिभीषण भेटला ॥२१॥
बिभीषण म्हणे दूतासी । तू कोठींचा कोण कोणा कार्यासी ।
आलासि हे आम्हांसी । किंनिमित्त सांगिजे ॥२२॥
दूत म्हणे बिभीषणा । मज वैश्रवणें पाठविले जाणा ।
बिभीषण म्हणे धर्मज्ञा । सकळ कुशळ आहेत की ॥२३॥
बिभीषण म्हणे दूतासी । पैल रावण पाहे सिंहासनासी ।
येरें देखोनि जयजयशब्देंसीं । रावणासी स्तविले हो ॥२४॥
राजाधिराज लंकापती । यशस्वी भुजा तुझ्या हाती ।
वैरी अपधाकें पळती । इतुके बोलोनि लीन राहिला ॥२५॥
हेमपर्यंक रत्नजडित । वरी पासोडा क्षीरोदक शोभत ।
वरी दशग्रीव बैसला तेथे । दूत बोलता झाला ते वेळीं ॥२६॥
दूताकडून रावणाला स्वधर्माचरणाचा संदेश :
अहो जी ऐके लंकेश्वरा । मी सांगतो सर्व समाचारा ।
तुमचा श्रेष्ठ बंधु निर्धारा । नांव कुबेर जयाचे ॥१७॥
तयानें मजला पाठविले । मुखवचेनें निरूपलें ।
अवधारिजे भूपाळें । उभयकुळधर्मार्था ॥१८॥
राये स्वधर्मातें पाळावें । दुष्टांतें दिगंतराबाहेरी घालावें ।
साधुसज्जनातें सेवावे । भावबळेंकरोनी ॥१९॥
पुण्याचा संग्रह कीजे । पातकातें न स्पर्शिजे ।
गाईग्राह्मणां प्रतिपाळिजे । क्षात्रधर्मा न टाळिजे प्राण गेलिया ॥३०॥
तुम्ही दोघे ऐश्वर्य समान । तुम्हा दोघा एक व्रत नेम ।
तुमचे कुळ पूज्य परम । तपोनुष्ठान अधिक तुमचें॥३१॥
कुबेरें जे ऐकिलें । ते मज हाती सांगविलें ।
ते अवधारिजे भूपाळें । सावधान होऊनी ॥३२॥
नंदनवना करोनि भग्न । ऋषीश्वरातें मारून ।
देवांचे अधिकार हिरोन । राक्षसांलागून वांटिले त्वा ॥३३॥
सुहृद सोयरे लहानथोर । बंधु आणि महावीर ।
हे तो घालूनी बाहेर । बहु अपूर्व त्वा केले ॥३४॥
परी एक असे नीती । बंधु ज्येष्ठ कनिष्ठ असती ।
तयांतें रक्षावें भूपती । सुहृदस्थिति या नांवे ॥३५॥
कुबेराची आत्मकथा दूत रावणाला सांगतो :
मी तुझे आज्ञेकरून । गेलो हिमाद्रिपर्वता जाण ।
तेथे नित्यनेम अनुष्ठान । इंद्रियनिग्रहण म्या केले ॥३६॥
सदाशिवासमीप संतत । आचरता झालों तप व्रत।
करोनिया एकाग्र चित्त । कित्येक दिवस क्रमियेले ॥३७॥
पुढे कर्मानुसार बुद्धी । भ्रम झाला मज ते संधी ।
पार्वती रूपे अनुपम नीधी । शिवसहित क्रीडत होती ॥३८॥
रुद्राणिच्या रूपाची सीमा । वर्णू न शके स्वये ब्रह्मा ।
जियेतें देखोनि सुरांगना व्योमा । लाजोनि ऊर्ध्व पंथे गेलिया ॥३९॥
जिच्या स्वरूपाचे प्रभावीं । चंद्र सूर्य झाले दिवी ।
उमेसि वर्णीं ऐका कवी । कोण कोठे असेल ॥४०॥
आपण सव्य नेत्रकरीं। तिये काळी अवलोकीं गौरी ।
ते गौरीचे प्रभावेंकरीं । सव्य नेत्र पडला तळी ॥४१॥
पार्वतीचे अवलोकन मात्र । माझा भस्म झाला सव्य नेत्र ।
वडस वाढला पिंगळाकार । काणा सत्वर मी झालों ॥४२॥
तया गिरीच्या पाठारीं । मग मी तप करी ।
आठ शत वर्षे होता पुरी । तंव महादेव गौरीसहित आला ॥४३॥
माझे देखोन तप दारूण । कृपाळु ते उमारमण ।
म्हणे झालों मी सुप्रसन्न । वैश्रवणा जाय ये समयी ॥४४॥
तुझी देखोन तपःस्थिती । मी सुखावलों बहुत चित्ती ।
तू माझा सखा निश्चिती । तुजवरी प्रीती मज बहु ॥४५॥
उमेचे क्रोधेंकरीं । तुझ्या नेत्राची झाली बोहरी ।
दृष्टी देतो तया नेत्री । चराचर देखावया॥४६॥
उमेसि देखिले नेत्रेंकरीं । ते तुझे नाम एकाक्ष निर्धारी ।
पिंगळेक्षण चराचरी । दुसरे नाम पै तुझे ॥४७॥
ऐसे शंकरासीं सख्यत्व । करोनि कुबेर नगरा येत ।
तंव मार्गी झाले श्रुत । रावण पाप आचरला ॥४८॥
नंदनवन करोनि भग्न । मारिले ऋषी तपोधन ।
ऋषीश्वरांते त्रास देवोन । बंधुजन दडविले ॥४९॥
तुझिया मरणाचा उपाय । चिंतिताति सुरसमुदाय ।
तुज येथोनि नाही जय । सत्य जाण शक्रजिज्जनका ॥५०॥
रावणाकडून दूताची अवहेलना व स्वसामर्थ्याबद्दल दर्पोक्ती :
दूताच्य मुखीचें वचन । ऐकोनि रावण क्रोधायमान ।
दांत खाय करकरून । काय आपण बोलिला ॥५१॥
क्रोधेकरून नयन । ओष्ठ चावोनि राअण ।
दूताप्रति कठिण वचन । काय आपण बोलिला ॥५२॥
दूतासि म्हणे रावण । तू बोलिलासि जयाचे वचन ।
तया आणिक दूत न मिळे जाण । तुज नंपुसका पाठविले ॥५३॥
तू नपुंसकाहूनि हीन । तुज ज्यानें पाठ्विलें तो अज्ञान ।
ते तुम्ही माझे अहित लक्षोन । आनेंआन बडबडितां ॥५४॥
ज्येष्ठ बंधु वैश्रवण । तया मारिता नलगे क्षण ।
होईल शब्द कुळदूषण । सत्य जाण पै दूता ॥५५॥
शिवासहित असुरारी । मी मारीन क्षणामाझारीं ।
स्वर्गमृत्युपाताळाभीतरीं । निर्वैर सृष्टी करीन मी ॥५६॥
हे करिता मज अर्ध क्षण । न लगे दूता सत्य जाण ।
तुज मी मारीन रावण । राक्षस भक्षण करिती तुझे ॥५७॥
आणि हे अष्तौ लोकपाळ । करीन किंकर मी सकळ ।
हे मज करिता न लगे वेळ । कोपे प्रबळ चालिला ॥५८॥
दूताला ठार करून अलकावतीला निघाला :
आठवोनि दूताचें वचन । रावण अत्यंत कोपायमान ।
करी खड् ग घेवोनि जाण । घाये दूत मारिला ॥५९॥
राक्षसांसि म्हणे रावण । यांच्या अस्थि-मांस करी भक्षण ।
तदनंतरे काय आपण । करिता झाला अवधारा ॥६०॥
पाचारोनि सार्थियासी । रथ संजोगोनि वेगेंसीं ।
जाणे आहे अलकावति नगरीसी । जेथे वैश्रवण पै असे ॥६१॥
मग सज्जोनिया रथ । वरी आरूढला लंकानाथ ।
शस्त्रसामग्री घेवोनि त्वरित। अलकावतीये चालिला ॥६२॥
एका विनवी जनार्दन । पुढे गोड निरूपण ।
वाल्मिकीचें वाग्रत्न । सावधान अवधार ॥६३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावण अलकावतीगमनं नाम त्रयोगशोऽध्यायः ॥१३॥ ओंव्या ॥६३॥
