आणिकाच्या घाते मानित
3175.
आणिकाच्या घाते मानिता संतोष । सुखदुःख दोष अंगी लागे ॥१॥
ऐसे मनी वाहू नयेती संकल्प । करू नये पाप भांडवल ॥धृपद॥
किल्मीशाची चित्ती राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥
तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार ते होय प्रारब्धेचि ॥३॥
अर्थ :
इतरांचा घात झाला आणि आपण त्यामध्ये संतोष व्यक्त केला तर सुखदु:खे व दोष आपल्याला लागतात. त्यामुळे इतरांचे वाईट व्हावे किंवा त्यांच्याविषयी वाईट भावना मनात ठेवण्याचे संकल्प मनामध्ये वाहू नयेत आणि पापाचे भांडवल आपल्याजवळ गोळा करु नयेत. मनामध्ये जर आपण केलेले पाप राहिले तर ते विचार आपल्या मनात सारखे चालू असतात व ते आपल्याला बोचत असतात व त्यामुळे आपल्या मनाच्या अंगी ते कायमच राहाते व आपल्या सुखसमाधानाचा ठावच ते जाळून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, जर आपण एखादयावर रागावलो तर त्यामुळे आपल्या पुण्याचा क्षय होतो आपले पुण्य विलास पावते त्यामुळे काय होईल ते प्रारब्धानुसारच होईल.
