लोह कफ गारा सिद्ध हे
2484.
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसो येतो ॥१॥
सांगावे ते काई सांगावे ते काई । चित्ता होय ठायी अनुभव तो ॥धृपद॥
अन्ने सांगो येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊ हेवा ॥२॥
तुका म्हणे मिळे जीवनी जीवन । तेथे कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
अर्थ :
लोह म्हणजे लोखंड, कफ म्हणजे कापूस आणि गार म्हणजे गारगोटी या तीन सामुग्री जर सिद्ध असतील तर एक विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणे साधकाने आपले चित्त शुद्ध ठेवले की त्याला ब्रम्ह अनुभवाचा अनुभव येतो. ब्रह्मानुभवाचा जो आनंद प्राप्त होतो तो शब्दात कसा सांगावा तो आपल्या चित्ताच्या ठिकाणीच अनुभवायास मिळेल. सरस असे भोजन मिळाल्यानंतर त्या भोजनाचा आनंद वर्णन करता येत नाही त्याप्रमाणे ब्रम्हानुभव देखील आहे तो ब्रह्मानुभव आणखी प्राप्त व्हावा यासाठी आम्ही उपाय करू व त्याचाच हव्यास करू. तुकाराम महाराज म्हणतात गंगेतील पाणी व लोट्यातील पाणी हे दोन्ही एकत्र केले तर ते ओळखता येणार नाही त्याप्रमाणे मुमुक्षू जीव आणि ब्रम्हस्वरूप हे दोन्ही जर एकत्र झाले तर मग मुमुक्षू जीव कोणता आणि ब्रम्हस्वरूप कोणते हे कसे सांगता येईल?
