पाहणे जे काही त्यासी
521.
पाहणे जे काही त्यासी मुळी पाहे ।
मग सुखी राहे योगीराया ॥१॥
मी तू द्वैत भ्रांती पहा रे काढुनी ।
आत्मा तो गिवसुनी राहे सुखे ॥२॥
अविद्या नाथिली रज्जु सर्पापरी ।
भासली विचारी अनुभवे ॥३॥
तेंव्हा हे उपाधि राहिली सौरस ।
ज्ञानदेवदास पूर्ण धाला ॥४॥
अर्थ :
जगांतील दृश्य पदार्थांना अधिष्ठानरूपाने असणाऱ्या मूळच्या आत्मवस्तुकडे तुला पाहिले पाहिजे. अशारितीने दृश्यपदार्था वरील दृष्टि जाऊन अधिष्ठानाकडे तुझी दृष्टी आली म्हणजे मग योगीराजा तू सुखाने खुशाल काळ घालव. आत्मज्ञान प्राप्त करून मी व तू हे द्वैत काढून सुखाने राहा. ज्याप्रमाणे भ्रांतीने दोरीवर सर्पाचा भास होतो. त्याप्रमाणे जिला अस्तित्वच नाही अशी अविद्या आत्म्यावर भासली असे अनुभवाने समजावून घे. असे आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर देहरूप उपाधिची आसक्ती नाहीशी होते व जीव ब्रह्माचे पूर्ण ऐक्य होऊन तृप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
