हेचि माझे चित्ती । र
3234.
हेचि माझे चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥
आणिक नाही मागणे । राज्यचाड संपत्ती धने । जिव्हे सुख तेणे । घेता देई नाम तुझे ॥धृपद॥
तुझे रूप सर्वाठायी । देखे ऐसे प्रमे देई । ठेवावा पायी । अनुभव चित्ताचा ॥२॥
जन्ममरणाचा बाध । समूळूनि तुटो कंद । लागो हाची छंद । हरी गोविंद वाचेसी ॥३॥
कायापालटे दर्शने । अवघे कोंदाटे चैतन्य । जीवशिवखंडण । होय तरे चिंतिता ॥४॥
तुका म्हणे याची भावे । आम्ही धालो तुझ्या नावे । सुख होत जन्मे । भलतेयाती भलतैसी ॥५॥
अर्थ :
आता माझ्या चित्तामध्ये हाच प्रीतीभाव राहो, तो म्हणजे असा की, विठ्ठल माझ्या सुशुप्ती, जागृती व स्वप्नात कायम राहावा. मग मला राज्य, संपत्ती, धन याविषयी आवड राहणार नाही व तसे माझे काही मागणेही नाही. जिव्हेने तुझे नाम जरी घेतले तरी माझ्या देहाला सुख होते. देवा सर्वत्र मला तुझे रुपच दिसावे असेच प्रेम तुम्ही मला दयावे. माझ्या चित्तामध्ये जो अनुभव येईल तो तुमच्या पायाजवळच ठेवावा. जन्ममरणाचा बाद होऊन त्याचा संबधच तुटून जावो. आणि माझ्या वाणीला हरी गोविंद या नामाचाच छंद लागो. देवा तुझे दर्शन झाले की माझा कायापालट होतो सर्वत्र चैतन्य आहे असा अनुभव मला येतो. देवा तुझे चिंतन केले असता जिवशिवातील खंडन होते आणि दु:स्तर असा भवसागर सहजच तरुन जाता येतो. तुकाराम महाराज म्हणतात याच भक्तीभावाने आम्ही तुझे नाम घेतले व समाधानी झालो. मग आता आम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जातीत व कोणत्याही जागेवर जन्म जरी घ्यावा लागला तरी आम्ही सुखाने तेथे जन्म घेवू.
