अंबुला होता तो लेंकर
925.
अंबुला होता तो लेंकरु जाला ।
घराचार बुडविला बाईयांनो ॥१॥
झणी अकुळी म्हणाल उणे ।
तुम्ही जाणते जाणा परमार्थ खुणे ॥२॥
रखुमादेविवरे विठ्ठले भोगियेले ।
लंपट जहालिये सहजानंदी ॥३॥
अर्थ :
अंबुला म्हणजे माझा पति होता तोच माझा लेकरु होऊन म्हणजे लेंकरु जसे आईला प्रेमाचे विषय असते त्याप्रमाणे तो प्रेमाचा विषय होऊन मी माझ्या घरादाराचे वाटोळे केले. ही गोष्ट मी वाईट केल्यामुळे मी कुलवान असता मी कुलवान नाही असे तुम्ही मला म्हणाल परंतु जाणते असाल तर ती परमात्म्याची खूण जाणाल. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझा भोग घेतला आणि त्या आनंदात मी अगदी आनंदी होऊन गेले. असे माऊली सांगतात.
