मलयानिळ शीतळू । पालव
261.
मलयानिळ शीतळू । पालवी नये गाळू ।
सुमनाचा परिमळु । गुंफिता नये ॥
तैसा जाणा सर्वेश्वरू । म्हणो सानाथरू ।
स्वरूपाचा निर्धारू । कवण जाणे ॥
मोतियाचे पाणी भरता नये राजणी ।
गगनासी गवसणी । घालिता नये ॥
डोळ्यांतील बाहुली । करिता नये वेगळी ।
सखी म्हणा अंचुळी । धरिता नये ॥
कापुरांचे कांडण । काढिता नये आड कण ।
साखरेचे गोडपण । पाखडता नये ॥
विठ्ठलरखुमाईचे भांडण । कोण करील बुझावण ।
निवृत्तिचे चरणी शरण ज्ञानदेव ॥
अर्थ :
मलयगिरी पर्वतावरिल शितळ वारा जसा गाळुन घेता येत नाही. तसा फुलाचा सुगंध हा गुंफता येत नाही. तसे कोणालाही सर्वेश्वर म्हणु शकत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही. गगनाला गवसणी घालता येत नाही. डोळ्यातील बुबळ वेगळे करता येत नाही. व मैत्रीण जरी असली तरी तिची अंचुली मागता येत नाही. कापराचे कांडण करुन कण काढता येत नाही. साखरेची गोडी पाखडता येत नाही. त्या प्रमाणे विठ्ठल रखुमाईतील भांडण कोण सोडवणार. म्हणुन मी माझे श्री गुरु निवृत्तिनाथांच्या चरणी शरण जातो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
