॥ पञ्चदशी ॥
॥ पञ्चदशी ॥
6 षष्ठः परिच्छेदः - चित्रदीपः
या प्रकरणास ''चित्रदीप'' असे नांव ठेवण्यांचे कारण हेंच की येथे आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांताने चांगल्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावून त्याजवरून मनुष्य, पशु पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र - काढून तयार केलेला एक नकाशा होय.
यथा चित्रपटे दृष्टमवस्थानां चतुष्टयम् ।
परमात्मनि विज्ञेयं तथावस्थाचतुष्टयम् ॥१॥
अर्थ :
ज्याप्रमाणें या चित्रपटामध्ये चार अवस्था दिसून येतात, त्याचप्रमाणे परमात्म्याचे ठायीही अवस्थाचतुष्टय समजावे. ॥१॥
यथा धौतो घट्टितश्च लाञ्छितो रञ्जितः पटः ।
चिदन्तर्यामि सूत्राणि विराट् चात्मा तथेर्यते ॥२॥
अर्थ :
पटामध्यें जशा धौत, घट्टित, लांछित आणि रंजित ह्या चार अवस्था आहेत, तशाच आत्म्याचे ठायीही चित्, अंतर्यामी, सूत्रात्मा व विराट्अशा चार अवस्था आहेत. ॥२॥
स्वतः शुभ्रोऽत्र धौतः स्याद्घट्टितोऽन्नविलेपनात् ।
मस्याकारैर्लाञ्छितः स्याद्रञ्जितो वर्णपूरणात् ॥३॥
अर्थ :
धौत म्हणजे स्वतःसिद्ध मूळचा शुभ्रपट, घट्टित म्हणजे खळ दिलेला, लांछित म्हणजे काजळाच्या किंवा कोळशाच्या वगैरे रेघांनी आखलेला, आणि रंजित म्हणजे यथायोग्य रंगविलेला, हा चित्रपटाचा प्रकार झाला. ॥३॥
स्वतश्चिदन्तर्यामी तु मायावी सूक्ष्मसृष्टितः ।
सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैष विराडित्युच्यते परः ॥४॥
अर्थ :
आणि चित् म्हणजे स्वतः चिद्रूपी, अंतर्यामी म्हणजे मायावी, सूत्रात्मा म्हणजे सूक्ष्मशरीरी, आणि विराट् म्हणजे स्थूलशरीरी, असा परमात्म्याचा प्रकार समजावा. ॥४॥
ब्रह्माद्याःस्तम्बपर्यन्ताः प्राणिनोऽत्र जडा अपि ।
उत्तमाधमभावेन वर्तन्ते पटचित्रवत् ॥५॥
अर्थ :
चित्रपटावरील चित्राप्रमाणें या आत्म्याचे ठायींही ब्रह्मदेवापासूनू तो अतिसूक्ष्म तृणापर्यंत सर्व स्थावरजंगमात्मक सृष्टि उत्तमाधम भावेकरून दृष्टीस पडते. ॥५॥
चित्रार्पितमनुष्याणां वस्त्राभासाः पृथक्पृथक् ।
चित्राधारेण वस्त्रेण सदृशा इव कल्पिताः ॥६॥
अर्थ :
चित्रांतील मनुष्यांना जसे वस्त्राभास निरनिराळे असून चित्रास आधारभूत जे वस्त्र तेंच ते असे आम्ही कल्पितो, ॥६॥
पृथक्पृथक्चिदाभासाश्चैतन्याध्यस्तदेहिनाम् ।
कल्पान्ते जीवनामानो बहुधा संसरन्त्यमी ॥७॥
अर्थ :
त्याप्रमाणे चिदाभासही निरनिराळे असून आधारभूत चैतन्याशी त्यांचे ऐक्य करून त्यांनी केलेला संसार चैतन्यगतच अशी आम्हास भ्रांति होते. ॥७॥
वस्त्राभासस्थितान्वर्णान्यद्वदाधारवस्त्रगान् ।
वदन्त्यज्ञास्तथा जीवसंसारं चिद्गतं विदुः ॥८॥
अर्थ :
कल्पित वस्त्रांचे रंग जसे आधारभूत वस्त्रासच लागलेले दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे अज्ञानी लोक भ्रमाने जिवाचा संसार आत्म्यास लावू पहातात. ॥८॥
चित्रस्थ पर्वतादीनां वस्त्राभासो न लिख्यते ।
सृष्टिस्थमृत्तिकादीनां चिदाभासास्तथा न हि ॥९॥
अर्थ :
चित्रांतील पर्वतादि जड पदार्थास जशी वस्त्रे नाहींत, त्याप्रमाणे सृष्टीतील काष्ठषाणादिकांसही चिदाभास नाही. ॥९॥
संसारः परमार्थोऽयं संलग्नः स्वात्मवस्तुनि ।
इति भ्रान्तिरविद्या स्याद्विद्ययैषा निवर्तते ॥१०॥
अर्थ :
वस्तुतः जीवास लागू असलेला संसार आत्म्यास लावू पहाणे, हीच अविद्या. तिची निवृत्ति विद्येवाचून होत नाही. ॥१०॥
आत्माभासस्य जीवस्य संसारो नात्मवस्तुनः ।
इति बोधो भवेद्विद्या लभ्यतेऽसौ विचारणात् ॥११॥
अर्थ :
हा संसार केवळ जीवांनाच लागू असून आत्म्याला त्याचा मुळींच संबंध नाही, असे जे ज्ञान त्यासच विद्या असे म्हणतात. ती विचारापासून प्राप्त होते. ॥११॥
सदा विचारयेत्तस्माज्जगत्ज्जीवपरात्मनः ।
जीवभावजगद्भावबाधे स्वात्मैव शिष्यते ॥१२॥
अर्थ :
याजकरितां जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, आणि आत्मा कसा आहे, याचा चांगला विचार करावा. ह्मणजे विचाराअंती जीव आणि जग या दोहींचा बाध झाला असता बाकी अबाधित राहिलेला आत्मा सत्य, हे अर्थातच सिद्ध झाले. ॥१२॥
नाप्रतीतिस्तयोर्बाधः किन्तु मिथ्यात्वनिश्चयः ।
नो चेत्सुषुप्तिमूर्च्छादौ मुच्येता यत्नतो जनः ॥१३॥
अर्थ :
वर, जीव आणि जग यांचा बाध करावा असे म्हटले त्यांत बाध शब्दाचा अर्थ त्यांचे मुळीच न दिसणे नव्हे, तर ती खोटी आहेत असा निश्चय झाला म्हणजे झाले. कारण असे जर न मानले, तर सुषुप्तिमूर्च्छादिकांचेठायी श्रमावांचून मोक्षप्राप्ति होईल. ॥१३॥
परमात्मावशेषोऽपि तत्सत्यत्वविनिश्चयः ।
न जगद्विस्मृतिर्नो चेज्जीवन्मुक्तिर्न सम्भवेत् ॥१४॥
अर्थ :
तसेंच आत्म्याचा अवशेष याचा अर्थ, तो सत्य आहे असा निश्चय करणे हा होय. जगाचे विस्मरण होणें असा त्याचा अर्थ केल्यास जीवन्मुक्ति म्हणून जी म्हणतात ती मुळीच संभवणार नाही. ॥१४॥
परोक्षा चापरोक्षेति विद्या द्वेधा विचारजा ।
तत्रापरोक्ष विद्याप्तौ विचारोऽयं समाप्यते ॥१५॥
अर्थ :
वर सांगितलेली जी विद्या (ज्ञान) ती दोन प्रकारची- परोक्ष आणि अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान झाले म्हणजे विचार संपला. ॥१५॥
अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्षज्ञानमेव तत् ।
अहं ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारः स उच्यते ॥१६॥
अर्थ :
"ब्रह्म आहे'' इतकेच केवळ गुरुमुखापासून किंवा श्रुतीपासून जे समजणें त्यास परोक्ष विद्या म्हणतात; आणि "ते ब्रह्म मीच आहे" असे जे प्रत्यक्ष अनुभवास येणे त्यास अपरोक्ष विद्या किंवा साक्षात्कार असे म्हणतात. ॥१६॥
तत्साक्षात्कारसिद्ध्यर्थमात्मतत्त्वं विविच्यते ।
येनायं सर्वसंसारात्सद्य एव विमुच्यते ॥१७॥
अर्थ :
हा साक्षात्कार झाला असता जन्ममरणापासून प्राणी तत्काल मुक्त होतो. म्हणून याच्या प्राप्तीकरितां आत्मतत्त्वाचें विवेचन आधी पुढे करतो. ॥१७॥
कूटस्थो ब्रह्मजीवेषावित्येवं चिच्चतुर्विधा ।
घटाकाशमहाकाशौ जलाकाशाभ्रखे यथा ॥१८॥
अर्थ :
ज्याप्रमाणें घटाकाश, महाकाश, जलाकाश आणि अभ्राकाश असे आकाशाचे चार प्रकार आहेत, त्याप्रमाणे कूटस्थ, ब्रह्म, जीव आणि ईश असे चैतन्याचे चार प्रकार आहेत. ॥१८॥
घटावच्छिन्नखे नीरं यत्तत्र प्रतिबिम्बितः ।
साभ्रनक्षत्र- आकाशो जलाकाश- उदीर्यते ॥१९॥
अर्थ :
ह्यापैकी घटाकाश हे प्रसिद्धच आहे, म्हणून त्याविषयी येथे विशेष सांगणे नलगे. महाकाश म्हणजे ज्यामध्ये सूर्य, चंद्र व नक्षत्रे प्रकाशित होतात अशी, अवाढव्य पोकळी. जलाकाश म्हणजे घटातील पोकळींत पाणी घालून तो आंगणांत ठेवला असता त्यांत साभ्र नक्षत्र (ढग आणि नक्षत्रे यांसहित) जे आभाळाचे प्रतिबिंब पडते ते. ॥१९॥
महाकाशस्य मध्ये यन्मेघमण्डलमीक्ष्यते ।
प्रतिबिम्बतया तत्र मेघाकाशो जले स्थितः ॥२०॥
अर्थ :
आणि अभ्राकाश म्हणजे पूर्वोक्त महाकाशामध्यें जे मेघमंडळ दिसते त्यांत जे महाकाशाचें प्रतिबिंब, ते होय. ॥२०॥
मेघांशरूपमुदकं तुषाराकारसंस्थितम् ।
तत्र स्वप्रतिबिम्बोऽयं नीरत्वादनुमीयते ॥२१॥
अर्थ :
हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैकी पहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत. परंतु चवथे जे अभ्राकाश ते कसें समजावे ? कारण, जेथे मुळी पाण्याचेच ज्ञान होण्याची पंचाईत, तेथे त्यांतील प्रतिबिंब कोठनू समजणार ? असे कोणी म्हणेल तर त्याविषयीची समजूत अशी - मेघ ही केवळ वाफ असल्यामुळे त्याचे घटकावयव उदकतुषारच आहेत. उदक म्हटले म्हणजे त्यांत प्रतिबिंब पडलेंच पाहिजे. या नियमावरून पूर्वोक्त जे मेघप्रतिबिंबित आकाश, ज्यास आधी अभ्राकाश असे नांव दिले, ते जरी स्पष्ट दिसले नाही, तरी ते तेथे आहे असे अनुमान होतें. ॥२१॥
अधिष्ठानतया देहद्वयावच्छिन्नचेतनः ।
कूटवन्निर्विकारेण स्थितः कूटस्थ- उच्यते ॥२२॥
अर्थ :
याप्रमाणे दृष्टांतभूत आकाशाचे चार प्रकार सांगितले. तसेच, आता चैतन्याचेही चार प्रकार स्पष्ट करून सांगतो. पंचीकृत स्थूल आणि अपंचीकृत सूक्ष्म अशा दोन शरीरांना आधारभूत असून ओतप्रो-त आत-बाहेर व्यापनू असणारा जो आत्मा त्यास कूटस्थ असे म्हणतात. यास कूटस्थ म्हणण्याचें कारण कूट म्हणजे पर्वताचे शिखर ते असे वादळादिकांच्या झपाट्याखालीं कांही विकार न पावतां जशाचे तसेंच रहातें, तसा आत्माही निर्विकार असतो. ॥२२॥
कूटस्थे कल्पिता बुद्धिस्तत्र चित् प्रतिबिम्बकः ।
प्राणानां धारणाज्जीवः संसारेण स युज्यते ॥२३॥
अर्थ :
कूटस्थाचे ठायी कल्पित अशी जी बुद्धि तीत पडलेले जे चैतन्याचें प्रतिबिंब तोच जीव. हा प्राण धारण करतो म्हणून याला जीव हे नांव दिलें. या जीवालाच संसार आहे; कूटस्थाला नाही. ॥२३॥
जलव्योम्ना घटाकाशोयथा सर्वस्तिरोहितः ।
तथा जीवेन कूटस्थः सोऽन्योऽन्याध्यास उच्यते ॥२४॥
अर्थ :
वरील दृष्टांतांत जे जलाकाश सांगितलें, त्याने जसें खरें घटाकाश झाकून टाकले, त्याप्रमाणे येथेही जीवाने कूटस्थाला अगदी झाकून टाकल्यामुळे खरा कूटस्थ प्रत्ययास येत नाही. हे जे जीवाचे ' नसून भासणे,' आणि कूटस्थाचे 'असून न दिसणे,' यासच भाष्यकारादिक अन्योन्यध्यास असे म्हणतात. ॥२४॥
अयं जीवो न कूटस्थं विविनक्ति कदाचन ।
अनादिरविवेकोऽयं मूलाविद्येति गम्यताम् ॥२५॥
अर्थ :
ह्या जीवकूटस्थामधील भेद जीवास मुळींच समजत नाही. हा अविवेक आजकालचा नव्हे, तर अनादि आहे. याला मूलाविद्या म्हणतात. ॥२५॥
विक्षेपावृतिरूपाभ्यां द्विधाविद्या प्रकल्पिता ।
न भाति नास्ति कूटस्थ इत्यापादनमावृतिः ॥२६॥
अर्थ :
या अविद्येची रूपे दोन - एक विक्षेप आणि दुसरें, आवृति (आवरण) कूटस्थ भासत नाही, व मुळींच तो नाही ह्या व्यवहारास जे हेतु तेंच आवरण समजावे. ॥२६॥
अज्ञानी विदुषा पृष्टः कूटस्थं न प्रबुध्यते ।
न भाति नास्ति कूटस्थ इति बुद्ध्वा वदत्यपि ॥२७॥
अर्थ :
अविद्या व तिजपासून झालेले आवरण या दोहींचाही अनुभव लोकांत आहे, तो कसा म्हणाल, तर त्यास उदाहरण - एका अज्ञानी मनुष्यास एका विद्वानानें विचारले की, कूटस्थ तू जाणतोस काय ? याजवर तो असे उत्तर देईल की, ''मला कूटस्थ ठाऊक नाही,'' हा त्याचा अविद्यानुभव झाला, व जेव्हा तो असे उत्तर देतो की, "कूटस्थ मला दिसतं नाही, व तो नाही,'' हा त्याचा आवरणानुभव झाला. ॥२७॥
स्वप्रकाशे कुतोऽविद्या तां विना कथमावृतिः ।
इत्यादितर्कजालानि स्वानुभूतिर्ग्रसत्यसौ ॥२८॥
अर्थ :
आत्मा स्वप्रकाश असून त्याचे ठायी अविद्या कशी आली ? कारण, प्रकाश आणि अंधकार यांचा एकत्र वास कसा संभवेल ! बरें, अविद्या नाही म्हटले तर मग तिने केलेले आवरण तरी कोठून येणार ? ते नाही तर विक्षेपही नाही, तेव्हा अर्थातच ज्ञान व्यर्थ झाले, व त्यामुळें तत्प्रतिपादक सर्व शास्त्रही निष्फळ, असे जे प्रतिपक्ष्यांचे नानातर्हेचे तर्क ते सर्व एका स्वानुभवानें नाहींसे होतात. ॥२८॥
स्वानुभूतावविश्वासे तर्कस्याप्यनवस्थिते ।
कथं वा तार्किकमन्यस्तत्त्वनिश्चयमाप्नुयात् ॥२९॥
अर्थ :
आता अनुभवावरही आमचा विश्वास नाही, असे कोणी म्हणेल, तर मग तर्काला आधारच राहिला नाही. तार्किक म्हणविणारास अनुभवावांचून तत्त्वनिश्चय तरी कसा व्हावा ? ॥२९॥
बुद्ध्यारोहाय तर्कश्चेदपेक्षेत तथा सति ।
स्वानुभूतियनुसारेण तर्क्यतां मा कुतर्क्यताम् ॥३०॥
अर्थ :
तर्कावांचून समजूत पडत नाही, असे जर कोणी म्हणत असेल, तर अवश्य तर्काचे साहाय्य घ्यावें; परंतु जो तर्क करणे तो अनुभवास अनुसरूनच करावा. व्यर्थ कुतर्क कधीही करू नये. ॥३०॥
स्वानुभूतिरविद्यायामावृतौ च प्रदर्शिता ।
अतः कूटस्थचैतन्यमविरोधीति तर्क्यताम् ॥३१॥
अर्थ :
आता येथे तो अनुभव कोणता म्हणाल तर अविद्या आणि आवरण याविषयींचा वर सांगितलाच आहे; म्हणून कूटस्थ आणि अविद्या यांत विरोध नाही, असे म्हणण्यास कोणती हरकत आहे ? ॥३१॥
तच्चेद्विरोधि केनएयमावृतिर्ह्यनुभूयताम् ।
विवेकस्तु विरोधीस्यात्तत्त्वज्ञानिनि दृश्यताम् ॥३२॥
अर्थ :
कारण, तसा जर विरोध असता, तर या आवरणाचा अनुभव कोणाला आला असता ? एवढ्यावरून या अविद्येस विरोधी कोणी नाही, असे मात्र समजू नये. हिला विवेकजन्य ज्ञानच विरोधी आहे. या गोष्टीचा अनुभव तत्त्वज्ञान्याच्याठायी पहावा. ॥३२॥
अविद्यावृतकूटस्थे देहद्वययुता चितिः ।
शुक्तौ रूप्यवदध्यस्ता विक्षेपाध्यास एव हि ॥३३॥
अर्थ :
अविद्येने वेष्टिलेल्या कूटस्थावर, स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांनी युक्त असा चिदाभास शिंपीवरील रुप्याप्रमाणें केवळ भ्रमाने दिसतो. यालाच विक्षेपाध्यास म्हणतात. ॥३३॥
इदमंशस्य सत्यत्वं शुक्तिगं रूप्य ईक्ष्यते ।
स्वयन्त्वं वस्तुता चैवं विक्षेपे वीक्ष्यतेऽन्यगम् ॥३४॥
अर्थ :
आरोपित रजतावर ज्याप्रमाणें शुक्तीचा ' इदं' अंश आणि सत्यत्व दिसून येतें, त्याप्रमाणे आरोपित चिदाभासावर कूटस्थाचेठायी असणारी स्वयंत्व आणि वस्तुत्व ही दोन दिसून येतात. ॥३४॥
नीलपृष्ठत्रिकोणत्वं यथा शुक्तौ तिरोहितम् ।
असङ्गानन्दताद्येवं कूटस्थेऽपि तिरोहितम् ॥३५॥
अर्थ :
शिंपीची निळी पाठ आणि त्रिकोण आकृति ही जशी शिंपीच्याठायी आच्छादित असतात, त्याप्रमाणे कूटस्थाचे असंगत्व आणि आनंदरूपता हे गुण त्याचेठायी झाकले जातात. ॥३५॥
आरोपितस्य दृष्टान्ते रूप्यं नाम यथा तथा ।
कूटस्थाध्यस्तविक्षेपनामाहमिति निश्चयः ॥३६॥
अर्थ :
तसेंच ज्याप्रमाणें दृष्टांतामध्ये आरोपितास 'रुपे' हे नांव पडलें, त्याप्रमाणे कूटस्थाचेठायीं अध्यस्त जो विक्षेपरूप चिदाभास त्याला ' अहं' असे नांव पडलें. ॥३६॥
इदमंशं स्वतः पश्यन् रूप्यमित्यभिमन्यते ।
तथा स्वं च स्वतः पश्यन्नहमित्यभिमन्यते ॥३७॥
अर्थ :
दृष्टांतामध्यें शुक्तिशकल प्रत्यक्ष पहात असून त्याला मनुष्य रुपे असे म्हणतो. त्याचप्रमाणे दार्ष्टांतिकामध्ये स्वतःला पहात असून तो मी मी असे म्हणतो. ॥३७॥
इदंत्वरूप्यते भिन्ने स्वत्वाहन्ते तथेक्ष्यताम् ।
सामान्यं च विशेषश्चेत्युभयत्रापि गम्यते ॥३८॥
अर्थ :
दृष्टांतांत इदंता आणि रूप्यता या जशा दोन्ही एकमेकांपासून भिन्न आहेत, त्याप्रमाणे दार्ष्टांतिकांतही स्वयंता आणि अहंता ह्या दोन्ही भिन्न आहेत. एक सामान्य आणि दुसरे विशेष हाच दोहोंमधील भेद. ॥३८॥
देवदत्तः स्वयं गच्छेत्त्वं वीक्षस्व स्वयं तथा ।
अहं स्वयं न शक्नोमीत्येवं लौके प्रयुज्यते ॥३९॥
अर्थ :
स्वयं शब्दास सामान्यत्व आहे. यास उदाहरण - तो देवदत्त स्वतः जातो, तू स्वतः पहातोस; आणि मी स्वतः करू शकत नाही. असा लोकांमध्ये बोलण्याचा परिपाठ आहे. ॥३९॥
इदं रूप्यमिदं वस्त्रमिति यद्वदिदं तथा ।
असौ त्वमहमित्येषु स्वयमित्यभिमन्यते ॥४०॥
अर्थ :
हे रुपें, हे वस्त्र ह्यांमध्यें "इदं'' जसे सामान्य आहे तसे हा मी, हा तू, या दोनही पुरुषांमध्ये स्वयं हे सामान्य आहे. ॥४०॥
अहन्त्वाद्भिद्यतां स्वत्वं कूटस्थे तेन कि तव ।
स्वयं शब्दार्थ एवैष कूटस्थ इति मे भवेत् ॥४१॥
अर्थ :
बरें, अहंपणा आणि स्वयंपणा यांमध्यें भेद ठरला; पणे त्याचा कूटस्थाशी काय संबंध ? तर येथे जो स्वयं शब्दाचा अर्थ तोच आमचा कूटस्थ. ॥४१॥
अन्यत्ववारकं स्वत्वमिति चेदन्यवारणम् ।
कूटस्थस्यात्मतां वक्तुरिष्टमेव हि तद्भवेत् ॥४२॥
अर्थ :
आता कोणी म्हणेल, स्वयं शब्दाचा अर्थ "दुसरा नव्हे'' असा होतो. तर त्याजवर आमचे असे म्हणणे आहे की, स्वयं शब्दाप्रमाणे आत्म्यालाही अन्यवारकत्व येतें. आता कूटस्थ आणि आत्मा हे दोन्ही ज्याअर्थां आमच्या मते एकच आहेत, त्याअर्था तो अर्थ आह्मांस इष्टच आहे. ॥४२॥
स्वयमात्मेति पर्यायस्तेन लोके तयोः सह ।
प्रयोगो नास्त्यतः स्वत्वमात्मत्वं चान्यवारकम् ॥४३॥
अर्थ :
स्वयं आणि आत्मा हे दोन शब्द एकार्थक आहेत म्हणूनच लोकांमध्यें त्याचा एकत्र प्रयोग आढळत नाही. त्याकरिता "स्वयं'' या शब्दाचा अर्थ जसा अन्यवारक होतो तसा आत्मशब्दाचाही होतो. ॥४३॥
घटः स्वयं न जानातीत्येवं स्वत्वं घटादिषु ।
अचेतनेषु दृष्टं चेद्दृश्यतामात्मसत्त्वतः ॥४४॥
अर्थ :
"घट स्वतः जाणत नाही'' इत्यादि प्रयोगावरून घटादिक अचेतन पदार्थास देखील स्वयं शब्द लागतो अशी शंका कोणी घेईल तर तीही आम्हाला विरुद्ध नाही. कारण आत्म्याची व्याप्ति स्फुरणरूपानें सर्वत्र असल्यामुळे स्वयं शब्द घटादिकांस लागणे हे योग्यच आहे. ॥४४॥
चेतनाचेतनभिदा कूटस्थात्मकृता न हि ।
किन्तु बुद्धिकृताभासकृतैवेत्यवगम्यताम् ॥४५॥
अर्थ :
सचेतन आणि अचेतन हा भेद आत्म्यामुळें झालेला नाही. म्हणजे, अमुक पदार्थात आत्मा असला म्हणजे त्यास सचेतन म्हणावें, व अमुकांत तो नसला म्हणजे त्याला अचेतन म्हणावे असे कांही नाही. आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे आत्म्याचे असणें नसणे हेंच मुळी अशक्य आहे. म्हणूनच वरील भेद बुद्धिप्रतिबिंबित चिदाभासामुळेंच झाला आहे. म्हणजे सजीव प्राण्याला अंतःकरण असतें. त्या अंतःकरणांत जे आत्म्याचे प्रतिबिंब तोच चिदाभास; तो जड पदार्थात नाही. म्हणून त्याचे असण्या नसण्यावर चेतनाचेतनभेद अवलंबून असतो. ॥४५॥
यथा चेतन आभासः कूटस्थे भ्रान्तिकल्पितः ।
अचेतनो घटादिश्च तथा तत्रैव कल्पितः ॥४६॥
अर्थ :
आत्मा सचेतन आणि अचेतन या दोनही कल्पनांस आधार आहे. ज्याप्रमाणे चिदाभास कूटस्थावर भ्रांतीने कल्पिलेला आहे, त्याप्रमाणे घटादिक अचेतन पदार्थही कूटस्थावरच कल्पिलेले आहेत. दोन्हीचेही अधिष्ठान तोच आहे. ॥४६॥
तत्त्वेदन्तेऽपि स्वत्वमिव त्वमहमादिषु ।
सर्वत्रानुगते तेन तयोरप्यात्मतेति चेत् ॥४७॥
अर्थ :
३ अशी एक शंका आहे की, तू, मी, इत्यादिक पुरुषांमध्ये स्वशब्द जसा सामान्य आहे तसेंच तत्ता आणि इदंता हे शब्दही सामान्यत्वेकरून लागतात. तेव्हा स्वयं शब्दाप्रमाणें यालाही आत्मत्व येईल. ॥४७॥
ते आत्मत्वेऽप्यनुगते तत्त्वेदन्ते ततस्तयोः ।
आत्मत्वं नैव सम्भाव्यं सम्यक्त्वादेर्यथा तथा ॥४८॥
अर्थ :
तर त्याचे समाधान हेच की, सत्ता वु इदंता हे शब्द अहमादिकांचीं जशी विशेषणे आहेत तशी आत्मत्वाचींही विशेषणे आहेत. म्हणून बरे, वाईट या विशेषणांस जसे आत्मत्व येत नाही, तसे यांसही येत नाही. ॥४८॥
तत्त्वेदन्ते स्वतान्यत्वे त्वन्ताअहन्ते परस्परम् ।
प्रतिद्वन्द्वितया लोके प्रसिद्धेनास्ति संशयः ॥४९॥
अर्थ :
तू, मी; ते, हे; आपण, दुसरा; ही शब्दयुग्में परस्पर विरुद्धार्थीं आहेत असे लोकांत प्रसिद्ध आहे यांत संशय नाही. ॥४९॥
अन्यतायाः प्रतिद्वन्द्वी स्वयं कूटस्थ इष्यताम् ।
त्वंतायाः प्रतियोग्येषोऽहमित्यात्मनि कल्पितः ॥५०॥
अर्थ :
अन्यतेचा प्रतियोगी जो "स्वयं'' शब्द तो कूटस्थवाची असे समजावे. त्या कूटस्थ आत्म्यावर तू या शब्दाचा प्र्तियोगी जो मी शब्द तो कल्पिलेला आहे. ॥५०॥
अहंतास्वत्वयोर्भेदे रूप्यतेदन्तयोरिव ।
स्पष्टेऽपि मोहमापन्ना एकत्वं प्रतिपेदिरे ॥५१॥
अर्थ :
इदंता आणि रूप्यता यामध्ये जसा भेद स्पष्ट आहे तसाच अहंता आणि स्वत्व यांमध्येही आहे. असे असूनही मनुष्य भ्रामामुळे ते एकच मानतो. ॥५१॥
तादात्म्याध्यास एवात्र पूर्वोक्ताविद्यया कृतः ।
अविद्यायां निवृत्तायां तत्कार्यं विनिवर्तते ॥५२॥
अर्थ :
असे जे जीवकूटस्थांचे ऐक्य मानणे यालाच तादात्म्याध्यास म्हणतात. तो पूर्वोक्त अविद्येपासून होतो. त्या अविद्येची निवृत्ति झाली असता तिचे कार्यही नाहीसे होते. ॥५२॥
अविद्यावृतितादात्म्ये विद्ययैव विनश्यतः ।
विक्षेपस्य स्वरूपं तु प्रारब्धक्षयमीक्ष्यते ॥५३॥
अर्थ :
अविद्येपासून होणारे आवरण आणि तादात्म्य ही विद्येचे योगाने नाश पावतात. परंतु विक्षेपाचे स्वरूप मात्र प्रारब्धक्षयापर्यंत असतें. ॥५३॥
उपादाने विनष्टेऽपि क्षणं कार्यं प्रतीक्ष्यते ।
इत्याहुस्तार्किकास्तद्वदस्माकं कि न सम्भवेत् ॥५४॥
अर्थ :
उपादान कारणाचा नाश झाला तरी त्याचे कार्य क्षणभर रहाते असे नैय्यायिकांचे मत आहे, त्याचा स्वीकार आम्ही का करू नये ? ॥५४॥
तन्तूनां दिनसंख्यानां तैस्तादृक्क्षण ईरितः ।
भ्रमस्यासंख्यकल्पस्य योग्यः क्षण इहेष्यताम् ॥५५॥
अर्थ :
आता कोणी म्हणेल की, तार्किकांच्या मतीं कार्य क्षणभर रहाते असे आहे. परंतु विक्षेपरूप कार्य वर्षानुवर्ष रहा हे कसें ? तर ह्याचे उत्तर हेंच की, वसांच्या प्रमाणाने त्यांनीं क्षण सांगितला; परंतु आमची भ्रांति असंख्य कल्पांपासून चालत आल्यामुळें येथे वर्षानुवर्ष हाच क्षण आहे. ॥५५॥
विना क्षोदक्षमं मानं तैर्वृथा परिकल्प्यते ।
श्रुतियुक्त्यनुभूतिभ्यो वदतां किन्नु दुःशकम् ॥५६॥
अर्थ :
येवढ्यावरून तार्किकांचें व आमचे मत एकच ! असे मात्र समजू नये. कारण तार्किक केवळ युक्तीवरच अवलंबून पाहिजे तसा तर्क करतात. तशी आमची गोष्ट नाही. श्रुति युक्ती आणि अनुभव ह्या तिन्हीविरून सिद्धांत करणारास काय भीति आहे ? ॥५६॥
आस्तां दुस्तार्किकैः साकं विवादः प्रकृतं ब्रुवे ।
स्वाहमोः सिद्धमेकत्वं कूटस्थपरिणामिनोः ॥५७॥
अर्थ :
आता हा तार्किकाशीं वाद पुरे. एकंदरींत कूटस्थवाची स्वयंशब्द आणि त्याजवर दिसणारा जो अहं शब्द या दोन्हींचे एकत्व अज्ञानी मानतात असे ठरलें. ॥५७॥
भ्राम्यन्ते पण्डितंमन्याः सर्वे लौकिकतार्किकाः ।
अनादृत्य श्रुतिं मौर्ख्यात्केवलां युक्तिमाश्रिताः ॥५८॥
अर्थ :
असे असून ही भ्रांति आहे, असे लोकांस का समजत नाही ? असे जर म्हणाल तर याचे कारण हेंच की, मोठमोठे पंडित म्हणविणारे केवळ युक्ति लढवून मूर्खपणाने श्रुतीचा अनादर करून भ्रांतींत पडतात. ॥५८॥
पूर्वापरपरामर्शविकलास्तत्र केचन ।
वाक्याभासान्स्वस्वपक्षे योजयन्त्यप्यलज्जया ॥५९॥
अर्थ :
ते, शास्त्राचा पूर्वापर संबंध मनांत न आणून वाक्याचे वरवर दिसणारे अर्थ आपापले पक्ष सिद्ध करण्याकरता निर्लज्जपणानें योजतात. ॥५९॥
कूटस्थादिशरीरान्तसंघातस्यात्मतां जगुः ।
लोकायताः पामराश्च प्रत्यक्षाभासमाश्रिताः ॥६०॥
अर्थ :
कूटस्थापासून स्थूल शरीरापर्यंत जो एक सगळा समुदाय त्यालाच लोकायत आणि पामर (अज्ञानी) हे आत्मा असे मानतात. कारण, प्रत्यक्ष तेवढे खरें असे त्यांना वाटतें. ॥६०॥
श्रौतीकर्तुं स्वपक्षन्ते कोषमन्नमयं तथा ।
विरोचनस्य सिद्धान्तं प्रमाणं प्रतिजज्ञिरे ॥६१॥
अर्थ :
लोकवंचनार्थ आपल्या पक्षास श्रुति प्रमाण आहे असे दाखविण्याकरितां ते "स वा एष पुरुषान्नेरसमयः'' इत्यादिक श्रुतिवाक्यें देऊन विरोचनसिद्धांताचा अनुवाद करतात ॥६१॥
जीवात्मनिर्गमे देहमरणस्यात्र दर्शनात् ।
देहातिरिक्त एवात्मेत्याहुर्लोकायताः परे ॥६२॥
अर्थ :
ह्या लोकांचेच आणखी दुसरे बंधु असे म्हणतात की, ज्याअर्थां प्राण गेला म्हणजे हे शरीर नाशाप्रत पावते, त्या अर्थां ह्या शरीराहून आत्माकोणी निराळा असावा. ॥६२॥
प्रत्यक्षत्वेनाभिमताहं धीर्देहातिरेकिणम् ।
गमयेदिन्द्रियात्मानं वच्मीत्यादिप्रयोगतः ॥६३॥
अर्थ :
हा देहाहून भिन्न आत्मा त्यांच्या मतें इंद्रियसमूह होय. कारण मी बोलतो पहातो, ऐकतो असे मनुष्य म्हणतो. त्यावरून इंद्रियेच आत्मा असे ते म्हणतात. ॥६३॥
वागादिनामिन्द्रियाणां कलहः श्रुतिषु श्रुतः ।
तेन चैतन्यमेतेषामात्मत्वं तत एव हि ॥६४॥
अर्थ :
ते यांवरून असे प्रतिपादन करतात की, श्रुतींमध्ये इंद्रियांमध्ये भांडण लागले दिसून येतें. यावरून त्यांस चैतन्य असलेंच पाहिजे. ज्यापेक्षां चैतन्य आहे, त्यापेक्षा त्यांना आत्मत्व सिद्ध झाले. ॥६४॥
हैरण्यगर्भाः प्राणात्मवादिनस्त्वेवमूचिरे ।
चक्षुराद्यक्षलोपेऽपि प्राणसत्त्वे तु जीवति ॥६५॥
अर्थ :
प्राणात्मवादी जे हैरण्यगर्भ यांचें म्हणणे असे की, मनुष्य जिवंत असण्यास इंद्रियांची गरज नाही. कारण, नेत्रादि इंद्रियांचा नाश झाला तरी प्राण असेपर्यंत तो जगतो. ॥६५॥
प्राणो जागर्ति सुप्तेषु प्राणश्रैष्ठ्यादिकं श्रुतम् ।
कोषः प्राणमयः सम्यग्विस्तरेण प्रपञ्चितः ॥६६॥
अर्थ :
मनुष्य निजला तरी प्राण जागृतच असतो. प्राणाचे श्रेष्ठत्व श्रुतीत वर्णिले आहे. प्राणमय कोशाचे वर्णन वेदांतविस्तारेंकरून केले आहे. ॥६६॥
मन आत्मा इति मन्यन्त उपासनपरा जनाः ।
प्राणस्याभोक्तृता स्पष्टा भोक्तृत्वं मनसस्ततः ॥६७॥
अर्थ :
दुसरे कित्येक उपासना करणारे लोक असे म्हणतात की, ज्या अर्थां प्राणास भोक्तेपणा नाही हे स्पष्ट आहे, त्या अर्थांं भोक्तृत्व जे मन तोच आत्मा होय. ॥६७॥
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
श्रुतो मनोमयः कोषस्तेनात्मेतीरितं मनः ॥६८॥
अर्थ :
ह्यास प्रमाण - "मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः'' हा अमृतबिंदु उपनिषदातील श्लोक. ह्याचा अर्थ मनुष्यांच्या बंधमोक्षांस कारण मनच आहे. शिवाय श्रुतींमध्ये मनोमय कोशाचे वर्णन आहेच, त्या अर्थां मनच आत्मा असे सिद्ध होतें. ॥६८॥
विज्ञानमात्मेति पर आहुः क्षणिकवादिनः ।
यतोविज्ञानमूलत्वं मनसो गम्यते स्फुटम् ॥६९॥
अर्थ :
क्षणिक वादी ( बौद्ध) असे म्हणतात की, विज्ञान म्हणजे बुद्धि, ती मनाचे मूळ आहे. म्हणून बुद्धि हाच आत्मा. ॥६९॥
अहं वृत्तिरिदं वृत्तिरित्यन्तःकरणं द्विधा ।
विज्ञानं स्यादहंवृत्तिरिदंवृत्तिर्मनो भवेत् ॥७०॥
अर्थ :
याची सिद्धि अशी की अंतःकरणाचे भाग दोन, एक अहंवृत्ति आणि दुसरी इदंवृत्ति. इथें अहंवृत्ति हे विज्ञान आणि इदंवृत्ति हे मन. ॥७०॥
अहंप्रत्ययबीजत्वमिदंवृत्तेरितिस्फुटम् ।
अविदित्वा स्वमात्मानं बाह्यं वेद न तु क्वचित् ॥७१॥
अर्थ :
मीपणाचा प्रत्यय आल्यावांतून बाहेरचें जग आम्हाला कदापि समजणार नाही, म्हणून इदंवृत्तीचे बीज अहंवृत्ति आहे.॥७१॥
क्षणे क्षणे जन्मनाशावहंवृत्तिर्मितौ यतः ।
विज्ञानं क्षणिकं तेन स्वप्रकाशं स्वतो मितेः ॥७२॥
अर्थ :
ज्या अर्थीं ह्या अहंवृत्तीस क्षणोक्षणी जन्म आणि नाश आहेत, त्या अर्थांं विज्ञान हे क्षणिक आहे अणि ते स्वयंकाश आहे, ह्याला तर दुसरे प्रमाणच नको.॥७२॥
विज्ञानमयकोशोऽयं जीव इत्यागमा जगुः ।
सर्वसंसार एतस्य जन्मनाशसुखादिकः ॥७३॥
अर्थ :
ह्या विषयी वेदांचे प्रमाण विज्ञानमय कोश जो श्रुतींत सांगितला आहे, तेंच आहे. कारण सुखदुःखादि सर्व संसार यालाच आहे. ॥७३॥
विज्ञानं क्षणिकं नात्मा विद्युदभ्रनिमेषवत् ।
अन्यस्यानुपलब्धत्वाच्छून्यं माध्यमिका जगुः ॥७४॥
अर्थ :
विज्ञान हे विद्युल्लता, अभ्र आणि निमेष यांसारखे क्षणिक आहे, म्हणून याला आत्मा म्हणता येत नाही. बरे त्यावांचून पाहू गेल्यास दुसरे कोणी दिसत नाही. म्हणून शून्यच आहे असे माध्यमिक म्हणतात. ॥७४॥
असदेवेदमित्यादाविदमेव श्रुतं ततः ।
ज्ञानज्ञेयात्मकं सर्वं जगद्भ्रान्तिप्रकल्पितम् ॥७५॥
अर्थ :
ते आपल्या पक्षास ''असदेवेदमग्र आसीत्'' इत्यादिक श्रुतीचे प्रमाण सांगतात. ज्ञानज्ञेयात्मक सर्व जग तर केवळ भ्रांतींच आहे. ॥७५॥
निरधिष्ठानविभ्रान्तेरभावादात्मनोऽस्तिता ।
शून्यस्यापि ससाक्षित्वादन्यथा नोक्तिरस्य ते ॥७६॥
अर्थ :
मूळ अधिष्ठानावाचनू भ्रांति होणें अशक्य आहें म्हणून आत्म्याचे अस्तित्व मानले पाहिजे, म्हणून शून्यवादी जो आहे त्याही आत्म्याचें अस्तित्व कबूल केले पाहिले. नाही तर शून्य आहे असे समजणारा कोणी असल्यावांचून तसे बोलणेंच संभवणार नाही. ॥ ७६॥
अन्यो विज्ञानमयत आनन्दमय आन्तरः ।
अस्तीत्येवोपलब्धव्य इति वैदिकदर्शनम् ॥७७॥
अर्थ :
विज्ञानमयाचे आंत दुसरा एक आनंदमय जो कोश तो आत्मा असा वैदिक सिद्धांत आहे. ॥७७॥
अणुर्महान्मध्यमो वेत्येवं तत्रापि वादिनः ।
बहुधा विवदन्ते हि श्रुतियुक्तिसमाश्रयात् ॥७८॥
अर्थ :
ही जशी आत्म्यांच्या स्वरूपाविषयीं निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मते आहेत, तशींच त्याच्या परिमाणाविषयीं ही आहेत. कोणी आत्मा अणु (लहान) म्हणतात. कोणी महान् म्हणतात, आणि कोणी मध्यम म्हणतात. याप्रमाणे श्रुतीचे व युक्तीचे एकदेशी सहाय्य घेऊन नानाप्रकारें वाद करतात. ॥७८॥
अणुं वदन्त्यन्तरालाः सूक्ष्मनाडीप्रचारतः ।
रोम्णः सहस्रभागेन तुल्यासु प्रचरत्ययम् ॥७९॥
अर्थ :
अणुवाद्यांस अंतराल असे म्हणतात. ते म्हणतात की, ज्या अर्थां एका रोमाच्या सहस्राव्या भागाइतक्या सूक्ष्म नाडीमध्ये आत्म्याचा संचार आहे त्या अर्थां आत्मा अणुरूप आहे. ॥७९॥
अर्थ :
अणोरणीयानेषोऽणुः सूक्ष्मात्सूक्ष्मतरं त्विति ॥
अणुत्वमाहुः श्रुतयः शतशोऽथ सहस्रशः ॥८०॥
अर्थ :
यास श्रुतीतील प्रमाण असे देतात की, ''अणोरणीयान्'' (लहानाहून लहान) ''एषोऽणुः'' ( हा अणु आहे) ''सूक्ष्मात् सूक्ष्मतरं'' ( सूक्ष्माहून अतिसूक्ष्म ) इत्यादिक शेकडो हजारों श्रुति आहेत. ही अणुवाद्यांची प्रमाणे होत. ॥८०॥
वालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।
भागो जीवः स विज्ञेय इति चाहपरा श्रुतिः ॥८१॥
अर्थ :
दुसरी श्रुति असे सांगते की, बालाग्राच्या शंभराव्या हिश्शाच्या शंभराव्या हिश्शाएवढा जीव आहे असे समजावे. ॥८१॥
दिगम्बरा मध्यमत्वमाहुरापादमस्तकम् ।
चैतन्यव्याप्तिसंदृष्टेरानखाग्रश्रुतेरपि ॥८२॥
अर्थ :
दिगंबरवादी आत्मा मध्यम असे म्हणतात. कारण चैतन्याची व्याप्ति आपादमस्तकपर्यंत आहे, व "आनखाग्रं प्रविष्टः'' असे श्रुतिप्रमाणही आहे. ॥८२॥
सूक्ष्मनाडी प्रचारस्तु सूक्ष्मैरवयवैर्भवेत् ।
स्थूलदेहस्य हस्ताभ्यां कञ्चुकप्रतिमोकवत् ॥८३॥
अर्थ :
वरील श्रुतिसिद्ध जो नाडीप्रचार तो येथे लागू पडत नाही असे समजू नये. जसा देहाचा अंगरख्यांत प्रवेश हस्तद्वारा होतो, त्याप्रमाणे येथेही सूक्ष्म अवयवाने आत्म्याचा प्रवेश का म्हणूं नये ॥८३॥
न्यूनाधिकशरीरेषु प्रवेशोऽपि गमाअगमैः ।
आत्मांशानां भवेत्तेन मध्यमत्वं सुनिश्चितम् ॥८४॥
अर्थ :
लहान मोठ्या देहांत याचा प्रवेश होणार नाही असे समजू नये. कारण, आत्म्याचे अंशही त्या त्या देहाप्रमाणे कमी जास्त होतात. तेव्हा तसे होण्यास कांही चिंता नाही. ॥८४॥
संशस्य घटवन्नाशो भवत्येव तथा सति ।
कृतनाशाकृताभ्यागमयोः को वारको भवेत् ॥८५॥
अर्थ :
परंतु ज्याला अंश आहेत त्याचा नाश झालाच पाहिजे. म्हणून आत्मा सांश मानल्यास घटासारखा तोही नाशवंत होईल. आत्मा अनित्य झाल्यास कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम हे दोष कसे निवारता येतील ? ॥८५॥
तस्मादात्मा महानेव नैवाणुर्नापि मध्यमः ।
आकाशवत्सर्वगतो निरंशः श्रुतिसंमतः ॥८६॥
अर्थ :
म्हणून ज्या अर्थां आत्मा अणुही म्हणता येत नाही आणि मध्यमही म्हणता येत नाही, त्या अर्थांं तो आकाशाप्रमाणें व्यापकच असला पाहिजे. त्याचे निरंशत्व तर श्रुतिसिद्धच आहे. ॥८६॥
इत्युक्त्वा तद्विशेषेऽपि बहुधा कलहं ययुः ।
अचिद्रूपोऽथ चिद्रूपाश्चिदचिद्रूप इत्यपि ॥८७॥
अर्थ :
अशी आत्म्याच्या पीरमाणाविषयी निरनिराळी मतें सांगून शेवटी आत्म्याचे विभुत्व ठरविलें. आता त्याच्या विशेष स्वरूपाविषयी निरनिराळ्या वाद्यांचे मत सांगतो. कोणी आत्मा चैतन्यरूप असे म्हणतात; कोणी जड असे म्हणतात; आणि कित्येक तो चिज्जड असे म्हणतात. ॥८७॥
प्राभाकरास्तार्किकाश्च प्राहुरस्याचिदात्मताम् ।
आकाशवद्द्रव्यमात्मा शब्दवत्तद्गुणश्चितिः ॥८८॥
अर्थ :
प्रभाकरमताचे लोक आणि तार्किक लोक आत्मा जड असे म्हणतात. आकाश द्रव्य असून त्याचा गुण जसा शब्द त्याप्रमाणे आत्मा द्रव्य असून चैतन्य हा त्याचा गुण आहे. ॥८८॥
इच्छाद्वेषप्रयत्नाश्च धर्माधर्मौ सुखासुखे ।
तत्संस्काराश्च तस्यैते गुणाश्चितिवदीरिताः ॥८९॥
अर्थ :
इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, सुख, दुःख आणि त्यांचे संस्कार हे चैतन्याप्रमाणें आत्म्याचेच गुण आहेत असे ते सांगतात. ॥८९॥
आत्मनो मनसा योगे स्वादृष्टवशतो गुणाः ।
जायन्तेऽथ प्रलीयन्ते सुषुप्तेऽदृष्टसंक्षयात् ॥९०॥
अर्थ :
आत्म्याचा आणि मनाचा संयोग झाला असता आपल्या अदृष्ट कर्माच्या योगाने वरील गुण उत्पन्न होतात; आणि अदृष्टाचा क्षय झाला असता सुषुप्तींत लीन होतात. ॥९०॥
चितिमत्त्वाच्चेतनोऽयमिच्छाद्वेषप्रयत्नवान् ।
स्याद्धर्माधर्मयोः कर्ता भोक्ता दुःखादिमत्त्वतः ॥९१॥
अर्थ :
असे असून तो सचेतन कसा भासतो या शंकेचे ते असे समाधान करतात की, तो स्वतः जड आहे तरी चैतन्यगुण त्याचे अंगी आहे, आणि इच्छा, द्वेष, प्रयत्न हेही पण गुण त्याचे अंगी आहेत, म्हणून तो चैतन्यरूप भासतो. तो धर्माधर्माचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोक्ता आहे. ॥९१॥
यथाअत्र कर्मवशतः कादादिकं मुखादिकम् ।
तथा लोकान्तरे देहे कर्मणेच्छादि जन्यते ॥९२॥
अर्थ :
ज्याप्रमाणें कर्मवशेंकरून या देहाचेठायी केव्हा केव्हा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यांच्या भोगाकरिता आत्मा रहातो असे म्हणतात, त्याप्रमाणे अन्यलोकीही कर्मवशें देहधारण करण्याची इच्छा वगैरे होते. असा आत्म्याविषयी औपचारिक व्यवहार आहे. ॥९२॥
एवं च सर्वगस्यापि सम्भवेतां गमागमौ ।
कर्मकाण्डः समग्रोऽत्र प्रमाणमिति तेऽवदन् ॥९३॥
अर्थ :
या दृष्टीने सर्वव्यापी जो आत्मा त्याला जाणे येणे संभवते, एतद्विषयीं सर्व कर्मकांड प्रमाण आहे असे ते म्हणतात. ॥९३॥
आनन्दमयकोषो यः सुषुप्तौ परिशिष्यते ।
अस्पष्टचित्स आत्मैषां पूर्वकोशोऽस्य ते गुणाः ॥९४॥
अर्थ :
आनंदमयकोश जो, सुष्प्तिकाळी रहातो त्यांत चैतन्य स्पष्ट नाही तोच आमचा आत्मा. तो पंचकोशात पहिला आहे. आणि पूर्वोक्त जे ज्ञानादिक ते त्याचे गुण आहेत. ॥९४॥
गूढं चैतन्यमुत्प्रेक्ष्य बोधाबोधस्वरूपताम् ।
आत्मनो ब्रुवते भाट्टाश्चिदुत्प्रेक्ष्योत्थितस्मृतेः ॥९५॥
अर्थ :
आत्म्याचेठायी अस्पष्ट चैतन्याचे अनुमान करून आत्मा चिज्जड आहे असे भाट्ट म्हणतात. कारण निजून उठलेल्याला जडत्वाची जी आठवण होते. ती पूर्वींच्या अनुभवावांचून होणार नाही. म्हणून आत्मा उभयात्मक आहे असे ते म्हणतात. ॥९५॥
जडो भूत्वा तदास्वाप्समिति जाड्यस्मृतिस्तदा ।
विना जाड्यानुभूतिं न कथंचिदुपपद्यते ॥९६॥
अर्थ :
निजून उठलेला असे म्हणतो की, मी इतका वेळ जड होऊन निजलो होतों. ही जाड्यस्मृति जाड्यांच्या अनुभवावांचून कशी होईल. ॥९६॥
द्रष्टुर्दृष्टेरलोपश्च श्रुतः सुप्तौ ततस्त्वयम् ।
अप्रकाशप्रकाशाभ्यामात्मा खद्योतवद्युतः ॥९७॥
अर्थ :
द्रष्ट्याच्या दृष्टीचा लोप सुषुप्तींत होत नाही असे श्रुतीत सांगितले आहे. म्हणून आत्मा काजव्याप्रमाणे प्रकाश व अप्रकाश या दोहोंनी युक्त आहे. ॥९७॥
निरंशस्योभयात्मत्वं न कथंचिद्घटिष्यते ।
तेन चिद्रूप एवात्मेत्याहुः सांख्या विवेकिनः ॥९८॥
अर्थ :
याजवर सांख्यवादी असे म्हणतात की, ज्याला अंश नाही त्याला उभयात्मकत्व कधींही संभवणार नाही, यास्तव आत्मा चिद्रूप आहे. ॥९८॥
जाड्यांशः प्रकृतेरूपं विकारि त्रिगुणं च तत् ।
चितो भोगापवर्गार्थं प्रकृतिः सा प्रवर्तते ॥९९॥
अर्थ :
जाड्यांशाची व्यवस्था कशी या प्रश्नाचें उत्तर ते असे देतात की, तो जाड्यांश प्रकृतीचे रूप आहे. ते रूप विकारी असून त्रिगुणात्मक आहे. चैतन्याला जे बंधमोक्ष भासतात त्यास कांही तरी कारण पाहिजे म्हणूनू प्रकृतीची कल्पना त्यांनी केली. ॥९९॥
असङ्गायाश्चितेर्बन्धमोक्षौ भेदाग्रहान्मतौ ।
बन्धमोक्षव्यवस्थार्थं पूर्वेषामिव चिद्भिदा ॥१००॥
अर्थ :
प्रकृति आणि पुरुष अत्यंत भिन्न असता असंग चैतन्याला बंधमोक्ष कसे ? या शंकेचे समाधान ते असे करतात की, तो भेद न समजल्यामळें बंधमोक्षांचा व्यवहार चालला आहे. आणि या व्यवस्थेकरिताच तार्किकांप्रमाणें सांख्यांनीही आत्मभेद मानला आहे. ॥१००॥
महतः परमव्यक्तमिति प्रकृतिरुच्यते ।
श्रुताक्सङ्गता तद्वदसङ्गो हीत्यतः स्फुटा ॥१०१॥
अर्थ :
"महतः परमव्यक्तं'' हे प्रमाण प्रकृतीविषयी आणि "असंगोहि'' हे प्रमाण पुरुषाविषयीं श्रुतीत आहे. ॥१०१॥
चित्सन्निधौ प्रवृत्ताया प्रकृतेर्हि नियामकम् ।
ईश्वरं ब्रुवते योगाः स जीवेभ्यः परः श्रुतः ॥१०२॥
अर्थ :
चैतन्याजवळ प्रवृत्त झालेली जी प्रकृति तिचे नियमन करणारा जो त्यास योगी ईश्वर असे म्हणतात. तो परमेश्वर जीवापासून भिन्न आहे, असे श्रुतीत आहे. ॥१०२ ॥
प्रधानक्षेत्रज्ञपतिर्गुणेश इति हि श्रुतिः ।
आरण्यके संभ्रमेण ह्यन्तर्याम्युपपादितः ॥१०३॥
अर्थ :
प्रधान ( प्रकृति) व क्षेत्रज्ञ ( जीव) यांचा पति आणि त्रिगुणांचा ईश अशी श्रुति आहे. याप्रमाणेंच आरण्यक उपनिषदांत अंतर्यामीचें उपपादन केले आहे. ॥१०३॥
अत्रापि कलहायन्ते वादिनः स्वस्वयुक्तिभिः ।
वाक्यान्यपि यथाप्रज्ञं दार्ढ्यायोदाहरन्ति हि ॥१०४॥
अर्थ :
याविषयीही वादी आपापल्या युक्ति लढवून कलह करतात, आणि आपला पक्ष दृढ करण्याकरितां यथामति श्रुतिवाक्येंही दाखवितात. ॥१०४॥
क्लेशकर्मविपाकैस्तदाशयैरप्यसंयुतः ।
पुंविशेषो भवेदीशो जीववत्सोऽप्यसङ्गचित् ॥१०५॥
अर्थ :
अविद्यादिक क्लेशकर्मांची फळे व कर्माचे संस्कार यांचा ज्याला स्पर्श मुळींच नाही असा जो पुरुषविशेष त्याला ईश असे म्हणतात. तो जीवात्म्याप्रमाणें असंग आणि चिद्रूप आहे, असे पतंजलि म्हणतात. ॥१०५॥
तथापि पुंविशेषत्वाद्घटतेऽस्य नियन्तृता ।
अव्यवस्थौ बन्धमोक्षावापतेतामिहान्यथा ॥१०६॥
अर्थ :
तथापि, हा एक विशेष पुरुष आहे असे श्रुतीने सांगितले म्हणून त्याला नियंतृता असली पाहिजे. कारण तसे जर न घेतले तर बंधमोक्षांची व्यवस्था होणार नाही. ॥१०६॥
भीषास्मादित्येवमादावसङ्गस्य परात्मनः ।
श्रुतं तद्युक्तमप्यस्य क्लेशकर्माद्यसङ्गमात् ॥१०७॥
अर्थ :
''भीषास्मात्'' इत्यादिक श्रुतीमध्ये असंग परमात्म्याला नितंतृत्व सांगितले आहे. आणि ईश्वर असंग असल्यामुळे क्लेशादिकांचा संभव नाही. यावरून श्रुतिप्रमाण युक्तही दिसते. ॥१०७॥
जीवानामप्यसङ्गत्वात्क्लेशादि न ह्यथापि च ।
विवेकाग्रहतः क्लेशकर्मादि प्रागुदीरितम् ॥१०८॥
अर्थ :
तर जीवही असंग आहे म्हणून त्यालाही क्लेशादिक नसावेत असे जर कोणी म्हणेल तर जीवांना तत्त्वज्ञान नसल्यामुळें क्लेशादिक होतात, असे पूर्वीच सांगितले आहे. ॥१०८॥
नित्यज्ञानप्रयत्नेच्छागुणानीशस्य मन्वते ।
असङ्गस्य नियन्तृत्वमयुक्तमिति तार्किकाः ॥१०९॥
अर्थ :
नित्यज्ञान, नित्यप्रयत्न, नित्यइच्छा इत्यादिक, गुण ईश्वराला आहेत, म्हणून तो असंग नव्हे. कारण, असंगाला नियंतृत्व अयोग्य आहे असे तार्किक मानितात. ॥१०९॥
पुंविशेषत्वमप्यस्य गुणैरेव न चान्यथा ।
सत्यकामः सत्यसंकल्प इत्यादिश्रुतिर्जगौ ॥११०॥
अर्थ :
त्यांचे म्हणणे असे - याला नित्यगुण असल्यामुळे विशेष पुरुष म्हणून जे वर म्हटले तेही योग्य आहे. सत्यकाम सत्यसंकल्प असे श्रुतीत प्रमाण आहेच. ॥११०॥
नित्यज्ञानादिमत्त्वेऽस्य सृष्टिरेव सदा भवेत् ।
हिरण्यगर्भ ईशोऽतो लिङ्गदेहेन संयुतः ॥१११॥
अर्थ :
ईश्वराचे ज्ञानादि गुण जर नित्य मानले तर सदा सृष्टीच होईल. म्हणून लिंगदेहाने संयुक्त असा हिरण्यगर्भच आमचा ईश असे कित्येक म्हणतात. ॥१११॥
उद्गीथब्राह्मणे तस्य माहात्म्यमतिविस्तृतम् ।
लिङ्गसत्त्वेऽपि जीवत्वं नास्य कर्माद्यभावतः ॥११२॥
अर्थ :
उद्गीथ ब्राह्मणांत हिरण्यगर्भाचे माहात्म्य विस्तारें करून सांगितले आहे. लिंग शरीर असल्यामुळे त्याला जीवत्व येईल अशी शंका नको. कारण, अविद्येमुळे होणारी कर्मे ती त्याला संभवत नाहींत. ॥११२॥
स्थूलदेहं विना लिङ्गदेहो न क्वापि दृश्यते ।
वैराजो देह ईशोऽतः सर्वतो मस्तकादिमान् ॥११३॥
अर्थ :
आता दुसरे मत - स्थूळ देहावाचून लिंगदेह कोठेच दिसत नाही. याकरिता सर्वत्र मस्तकें धारण करणारा असा जो विराट पुरुष तोच ईश्वर. ॥११३॥
सहस्रशीर्षेत्येवं हि विश्वतश्चक्षुरित्यपि ।
श्रुतमित्याहुरनिशं विश्वरूपस्य चिन्तकाः ॥११४॥
अर्थ :
ते विराड्उपासक आपल्या मतास "सहस्रशीर्षा'' "विश्वतश्चक्षु'' इत्यादिक प्रमाणे देतात ॥११४॥
सर्वतः पाणिपादत्वे कृम्यादेरपि चेशता ।
ततश्चतुर्मुखो देव एवेशो नेतरः पुमान् ॥११५॥
अर्थ :
जिकडून तिकडून हातपाय ज्याला आहेत तो ईश्वर असे मानल्यास कित्येक किड्यांना देखील ईश्वर म्हणावें लागेल. म्हणून चतुर्मुख जो ब्रह्मदेव तोच ईश्वर; त्यावाचून दुसरा पुरुष ईश्वर नाही. ॥११५॥
पुत्रार्थं तमुपासीना एवमाहुः प्रजापतिः ।
प्रजा असृजतेत्यादिश्रुतिश्चोदाहरन्त्यमी ॥११६॥
अर्थ :
हे मत जे लोक पुत्राकरितां उपासना करतात त्यांचे होय. "प्रजापतिः प्रजाः असृजत'' इत्यादिक श्रुतीच हे लोक प्रमाणास देतात. ॥११६॥
विष्णोर्नाभेः समुद्भूतो वेधाः कमलजस्ततः ।
विष्णुरेवेश इत्याहुर्लोके भागवता जनाः ॥११७॥
अर्थ :
ब्रह्मदेव विष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झाला आहे, म्हणून भागवतजन विष्णूच ईश्वर असे म्हणतात. ॥११७॥
शिवस्य पादावन्वेष्टुं शार्ङ्ग्यशक्तस्ततः शिवः ।
ईशो न विष्णुरित्याहुः शैवा आगममानिनः ॥११८॥
अर्थ :
शंकराचे पाय शोधण्यास विष्णू समर्थ झाला नाही. म्हणून शिवच ईश्वर होय, विष्णु नव्हे; असे आगमाला मुख्य मानणारे जे शैव ते म्हणतात. ॥११८॥
पुरत्रयं सादयितुं विघ्नेशं सोऽप्यपूजयत् ।
विनायकं प्राहुरीशं गाणपत्यमते रताः ॥११९॥
अर्थ :
त्या शिवानेंही त्रिपुराचा नाश करण्याकरतां विघ्नेशाची पूजा केली, म्हणून, गाणपत्य मताला अनुसरणारे विनायकालाच ईश्वर म्हणतात. ॥११९॥
एवमन्ये स्वस्वपक्षाभिमानेनान्यथान्यथा ।
मन्त्रार्थवादकल्पादीनाश्रित्य प्रतिपेदिरे ॥१२०॥
अर्थ :
ह्यी प्रकारे दुसरे, आपापली मते, अभिमानानें निरनिराळे मंत्र, अर्थवाद आणि कल्पना यांच्या आधाराने प्रतिपादन करतात. ॥१२०॥
अन्तर्यामिणमारभ्य स्थावरान्तेशवादिनः ।
सन्त्यश्वत्थार्कवंशादेः कुलदैवत्वदर्शनात् ॥१२१॥
अर्थ :
ह्या प्रकारे अंतर्यामीपासून स्थावरापर्यंत सर्व पदार्थांस ईश्वर मानणारे लोक आहेत. कित्येक लोकांचे अश्वत्थ, कित्येकांचे रुईचे झाड, कित्येकांचे वेळूं हे कुलदैवत असलेले जगात आढळते ॥१२१॥
तत्त्वनिश्चयकामेन न्यायागमविचारिणाम् ।
एकैव प्रतिपत्तिः स्यात्साप्यत्र स्फुटमुच्यते ॥१२२॥
अर्थ :
तत्त्वाचा निश्चय करण्याचे हेतूने न्याय आणि आगम यांच्या आधाराने तत्त्ववेत्त्यांनी ईश्वराविषयी सिद्धांत एकच ठरविला आहे; तो एथे स्पष्ट सांगतो. ॥१२२॥
मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।
अस्यावयवभूतैस्तु व्याप्त सर्वमिदं जगत् ॥१२३॥
अर्थ :
माया हीच प्रकृति (जगाचे उपादान कारण) आहे. आणि ही मायोपाधि ज्याणें धारण केली आहे तोच परमेश्वर (जगाचे निमित्त कारण) होय. आणि याच्या अंशरूपाने सर्व जग व्यापून गेले आहे. ॥१२३॥
इति श्रुत्यनुसारेण न्यायो निर्णय ईश्वरे ।
तथा सत्यविरोधः स्यात्स्थावरान्तेशवादिनाम् ॥१२४॥
अर्थ :
या श्रुतीच्या आधाराने ईश्वराविषयी निर्णय करणे योग्य आहे. असे केल्याने स्थावरापर्यंत ईश्वर मानणारांपैकी कोणाच्याही मतास विरोध येत नाही. ॥ १२४॥
माया चेयं तमोरूपा तापनीये तदीरणात् ।
अनुभूतिं तत्र मानं प्रतियज्ञे श्रुतिः स्वयम् ॥१२५॥
अर्थ :
ही माया तमोरूप (जड) आहे असे तापनीय उपनिषदांत सांगितले आहे. याविषयी अनुभूत प्रमाण आहे असे स्वतः श्रुतीच म्हणते. ॥ १२५॥
जडं मोहात्मकं तच्चेत्यनुभावयति श्रुतिः ।
आबालगोपं स्पष्टत्वादानन्त्यं तस्य साब्रवीत् ॥१२६॥
अर्थ :
"जड मोहात्मकं तच्च'' (ते मायारूप जड आणि मोहात्मक आहे) असे श्रुति अनुभवास आणते. ते बाळगोपाळांच्या अनुभवास आल्यामुळे ती अनंतही आहे असे श्रुति म्हणते. ॥१२६॥
अचिदात्मघटादिनां यत्स्वरूपं जडं हि तत् ।
यत्र कुण्ठीभवेद्बुद्धिः स मोह इति लौकिकाः ॥१२७॥
अर्थ :
घटादिक अचेतन पदार्थांचे जे स्वरूप ते जड असे समजावे. आणि जेथे बुद्धि कुंठित होते तोच मोह असे लोक म्हणतात. ॥१२७॥
इत्थं लौकिकदृष्ट्यैतत्सर्वैरप्यनुभूयते ।
युक्तिदृष्ट्या त्वनिर्वाच्यं नासदासीदितिश्रुतेः ॥१२८॥
अर्थ :
याप्रमाणे लौकिक दृष्ट्या हे मायारूप सर्वांच्या अनुभवास येते. परंतु युक्तीने पाहिले असता "नो सदासीत्'' या श्रुतीवरून ते अनिर्वाच्य आहे असे ठरतें. म्हणजे ते आहे असेही म्हणता येत नाही व नाही असेही म्हणता येत नाही. ॥१२८॥
नासदासीद्विभातत्वान्नो सदासीच्च बाधनात् ।
विद्यादृष्ट्या श्रुतं तुच्छं तस्य नित्यनिवृत्तितः ॥१२९॥
अर्थ :
ते भासते म्हणून नाही म्हणता येत नाही व बाधित होते म्हणून आहे असेही म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानदृष्टीने या मायेचे रूप तुच्छ आहे असे श्रुतीनें सांगितलें. कारण, त्याला नेहमी निवृत्ति (नाश) आहे. ॥१२९॥
तुच्छानिर्वचनीया च वास्तवी चेत्यसौ त्रिधा ।
ज्ञेया माया त्रिभिर्बोधैः श्रौतयौक्तिकलौकिकैः ॥१३०॥
अर्थ :
या प्रकारेंकरून श्रुति युक्ति आणि लौकिक या तीन दृष्टींनी मायेचे रूप तीन प्रकारचे आहे. म्हणजे श्रुतीने ती तुच्छ, युक्तीने ती अनिर्वाच्य आणि व्यवहारदृष्टीने ती खरी. ॥१३०॥
अस्य सत्त्वमसत्त्वं च जगतो दर्शयत्यसौ ।
प्रसारणाच्च संकोचाद्यथा चित्रपटस्तथा ॥१३१॥
अर्थ :
ज्याप्रमाण चित्रपट गुंडाळण्यानें व तो पसरण्याने चित्राचे नसणे व असणें अनुभवाला येतें, त्याप्रमाणे मायेमुळे जगाचे असणें व नसणे घडते. ॥१३१॥
अस्वतन्त्रा हि माया स्यादप्रतीतेर्विना चितिम् ।
स्वतन्त्रापि तथैव स्यादसङ्गस्यान्यथाकृतेः ॥१३२॥
अर्थ :
ब्रह्मावांचून मायेची प्रतीति नाही. म्हणून हिला स्वतंत्र म्हणता येत नाही. बरे असे जर म्हणावे, तर असंग जे ब्रह्म त्याला हिने ससंग केले म्हणून परतंत्रही म्हणता येत नाही. ॥१३२॥
कूटस्थासङ्गमात्मानं जडत्त्वेन करोति सा ।
चिदाभासस्वरूपेण जीवेशावपि निर्ममे ॥१३३॥
अर्थ :
असंगाची अन्यथा कृति कोणती म्हणाल तर कूटस्थ असंग जो आत्मा त्याला तिने जगाचे रूप आणलें; आणि चिदाभासरूपाने जीव आणि ईश यांना तिनेंच निर्माण केले. ॥१३३॥
कूटस्थमनुपाऋत्य करोति जगदादिकम् ।
दुर्घटैकविधायिन्यां मायायां का चमत्कृतिः ॥१३४॥
अर्थ :
एवढे जग करूनही तिचा कूटस्थास लवमात्र संपर्क नाही. मायेचा स्वभावच दुर्घट रचनेचा आहे. मग तिच्या या कृतीमध्ये नवल ते काय ? ॥१३४॥
द्रवत्वमुदके वह्नावुष्ण्यं काठिन्यमश्मनि ।
मायाया दुर्घटत्वं च स्वतः सिद्ध्यति नान्यथा ॥१३५॥
अर्थ :
ज्याप्रमाणें उदकाचा स्वभाव द्रवत्व, अग्नीचा स्वभाव उष्णता, आणि दगडाचा स्वभाव काठिन्य, त्याप्रमाणे दुर्घटत्व हा मायेचा स्वभावच आहे. स्वभावास दुसरे प्रमाण लागत नाही. ॥१३५॥
न वेत्ति मायिनं लोको यावत्तावच्चमत्कृतिम् ।
धत्ते मनसि पश्चात्तु मायैषेत्युपशाम्यति ॥१३६॥
अर्थ :
जोपर्यंत लोकांनी तिचा स्वभाव जाणला नाही तोपर्यंत तिचा चमत्कार त्यांस वाटतो. नंतर ही माया आहे असे समजले की, तत्काळ समाधान होते. ॥१३६॥
प्रसरन्ति हि चोद्यानि जगद्वस्तुत्ववादिषु ।
न चोदनीयं मायायां तस्याच्चोद्यैकरूपतः ॥१३७॥
अर्थ :
सृष्टिसंबंधीं शंका, जगाला खरें मानणारे जे नैय्यायिक आहेत त्यांच्यामध्यें मात्र पुष्कळ चालतात. मायावाद्यांपुढें त्यांची लटपट चालत नाही. कारण त्यांचे मते मायेचे रूप शंकात्मकच आहे. ॥१३७॥
चोद्येऽपि यदि चोद्यं स्यात्तच्चोद्ये चोद्यते मया ।
परिहार्यं ततश्चोद्यं न पुनः प्रतिचोद्यताम् ॥१३८॥
अर्थ :
शंकारूपी माया आहे असे आम्ही म्हटलें, त्याजवरही जर कोणी शंका घेईल तर त्याचे शंकेवर पुनः आम्ही शंका घेतो. म्हणून शंकेवर शंका घेणे हे योग्य नव्हे. तर शंका घेतल्यावर तिचे निवारणच केले पाहिजे. ॥१३८॥
विस्मयैकशरीराया मायायाश्चोद्यरूपतः ।
अन्वेष्यः परिहारोऽस्या बुद्धिमद्भिः प्रयत्नतः ॥१३९॥
अर्थ :
केवळ विस्मयाचीच पुतळी अशी जी माया तिचे रूप शंकामय असल्यामुळे तिचा परिहार काय आहे याचा शोध करण्याविषयी पंडितानी प्रयत्न करावा.॥१३९॥
मायात्वमेव निश्चेयमिति चेत्तर्हि निश्चिनु ।
लोकप्रसिद्धमायाया लक्षणं यत्तदीक्ष्यताम् ॥१४०॥
अर्थ :
ही मायाच आहे असे जर तुमचे मनांत समजावयाचे आहे तर लोकप्रसिद्ध मायेचे लक्षण समजून घेतलें म्हणजे झाले. ॥१४०॥
न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।
सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥१४१॥
अर्थ :
स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगता येत नाही. तीच माया असे लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥१४१॥
स्पष्टं भाति जगच्चेदमशक्यं तन्निरूपणम् ।
मायामयं जगत्तस्मादीक्षस्वापक्षपाततः ॥१४२॥
अर्थ :
हे लक्षण जगालाही कसें लागू पडते ते पहा. कारण तेही स्पष्ट भासून त्याची उपपत्ति कांही समजत नाही. याकरितां जग मायामय आहे ही गोष्ट निष्पक्षपात दृष्टीने मनांत आणा. ॥१४२॥
निरूपयितुमारब्धे निखिलैरपि पण्डितैः ।
अज्ञानं पुरतस्तेषां भाति कक्षासु कासुचित् ॥१४३॥
अर्थ :
आजपर्यंत पंडितानी या जगाचे निरूपण करण्यास पुष्कळ प्रयत्न केले. परंतु त्यांचे पुढे अज्ञानाचा परिघ शेवटी भासतोच. ॥१४३॥
देहेन्द्रियादयो भावा वीर्येणोत्पादिताः कथम् ।
कथं वा तत्र चैतन्यमित्युक्ते ते किमुत्तरम् ॥१४४॥
अर्थ :
वरील म्हणणे ज्यांना खरें वाटत नसेल त्यांनी आम्ही जे प्रश्न करतो त्यांची उत्तरे द्यावीत - वीर्यापासून देहेंद्रियादिक कशी उत्पन्न होतात ? व पुढे त्यांत चैतन्य प्रवेश कसा होतो ? ॥१४४॥
वीर्यस्यैष स्वभावश्चेत्कथं तद्विदितं त्वया ।
अन्वयव्यतिरेकौ यौ भग्नौ तौ व्यर्थवीर्यतः ॥१४५॥
अर्थ :
वीर्याचा हा स्वभावच असे जर म्हणाल तर ते तुम्हांला कसें समजले ? अन्वयव्यतिरेकाचे योगाने म्हणजे जेथे वीर्य तेथे देहादिक आहेत; आणि जेथे वीर्य नाही तेथे तेही नाहींत, या नियमांवरून आम्हांस समजलें, असे कदाचित् उत्तर येईल तर तसा नियम अनुभवास येत नाही. कारण, वीर्य हे पुष्कळदां निष्फळ होते. ॥१४५॥
न जानामि किमप्येतदित्यन्ते शरणं तव ।
अत एव महन्तोऽस्याः प्रवदन्तीन्द्रजालताम् ॥१४६॥
अर्थ :
यावर मला कांही ठाऊक नाही हेंच शेवटचे उत्तर येणार. म्हणूनच मोठमोठ्यांनी हे जग गारुड असे ठरविलें. ॥१४६॥
अर्थ :
एतस्मान्किमिवेन्द्रजालमपरं यद्गर्भवासस्थितम्
रेतश्चेतति हस्तमस्तकपदं प्रोद्भूतनानाङ्कुरम् ।
पर्यायेण शिशुत्वयौवनजरारोगैरनेकैर्वृतम्
पश्यत्यत्ति शृणोति जिघ्रति तथा गच्छत्यथागच्छति ॥१४७॥
अर्थ :
काय चमत्कार सांगावा ! गर्भीत असणाऱ्या रेताला हातपाय, डोके असे नानांकुर फुटून शेवटी ते चेतना पावते. नंतर क्रमाने बाल, यौवन आणि वृद्ध या दशा मनुष्य अनुभवतो. आणि पाहणे, ऐकणें, वास घेणे इत्यादिक क्रिया करून आला तसा जातो यापेक्षा दुसरे गा- रुड ते कोणचें ? ॥१४७॥
देहवद्वटधानादौ सुविचार्यावलोक्यताम् ।
क्व धाना कुत्र वा वृक्षस्तस्मान्मायेति निश्चिनु ॥१४८॥
अर्थ :
देहाप्रमाणेंच वटबीजादिकांचा विचार करून पहावा. कोणीकडे ते सूक्ष्म बीज, आणि कोणीकडे तो अफाट वृक्ष ! तस्मात् ही माया आहे अशा निश्चयांतच समाधान आहे. ॥१४८॥
निरुक्तावभिमानं ये दधते तार्किकादयः ।
हर्षमिश्रादिभिस्ते तु खण्डनादौ सुशिक्षिताः ॥१४९॥
अर्थ :
आम्हांला जरी याचे उत्तर देता आले नाही, तरी तार्किकादिक जे आहेत ते त्याचे उत्तर देण्यास समर्थ आहेत, असे जर म्हणाल, तर हर्षमिश्रादिक जे आहेत ते त्यांनाही वादांत हटविणारे आहेत. ॥१४९॥
अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केषु योजयेत् ।
अचिन्त्यरचनारूपं मनसापि जगत्खलु ॥१५०॥
अर्थ :
ह्याकरिता खरोखर जे तर्कापलीकडे आहे तेथे तर्काची योजना कधींही करू नये. हे जग असे आहे की, त्याजविषयीं बुद्धीचा तर्क कांहींच चालत नाही. मग उगीच बडबड करण्यांत काय अर्थ आहे ? ॥१५०॥
अचिन्त्यरचनाशक्तिबीजं मायेति निश्चिनु ।
मायाबीजं तदेवैकं सुषुप्तावनुभूयते ॥१५१॥
अर्थ :
ही जगाची गोष्ट झाली. परंतु मायेचा संबंध येथे काय आला ? असे जर म्हणाल तर अचिंत्य रचना शक्तिरूप जे जगाचे कारण तीच माया, हे मायाबीज सुषुप्तीमध्ये प्रत्ययास येतें. ॥१५१॥
जाग्रत्स्वप्नजगत्तत्र लीनं बीज इव द्रुमः ।
तस्मादशेषजगतो वासनास्तत्र संस्थिताः ॥१५२॥
अर्थ :
त्या कारणांत जाग्रत्स्वप्नरूप जे जग, ते बीजांत जसा वृक्ष लीन होतो. त्याप्रमाणे लीन होतें. याकरितां सर्व जगाच्या वासना त्या कारणांत आहेत असे म्हटले पाहिजे. ॥१५२॥
या बुद्धिवासनास्तासु चैतन्यं प्रतिबिम्बति ।
मेघाकाशवदस्पष्टश्चिदाभासोऽनुमीयताम् ॥१५३॥
अर्थ :
त्या बुद्धीच्या वासनांमध्यें चैतन्याचे प्रतिबिंब पडते. येथे अभ्राकाशाप्रमाणें अस्पष्ट चिदाभासाचे अनुमान करावे. ॥१५३॥
साभासमेव तद्बीजं धीरूपेण प्ररोहति ।
अतो बुद्धौ चिदाभासो विस्पष्टं प्रतिभासते ॥१५४॥
अर्थ :
ते मायारूप बीज बुद्धीच्या रूपाने प्रतिबिंब घेऊनच उदयास येतें. याकरिता बुद्धीच्याठायी चिदाभास स्पष्ट दिसतो. ॥१५४॥
मायाभासेन जीवेशौ करोतीति श्रुतौ श्रुतम् ।
मेघाकाशजलाकाशाविव तौ सुव्यवस्थितौ ॥१५५॥
अर्थ :
म्हणूनच श्रुतीत असे सांगितले आहे की, माया ही प्रतिबिंबाच्या योगाने जीव आणि ईश यांस करते. जलाकाश व मेघाकाशाप्रमाणें त्यांचा भेद समजावा. ॥१५५॥
अर्थ :
मेघवद्वर्तते माया मेघस्थिततुषारवत्.
धीवासनाश्चिदाभासस्तुषारस्थखवत्स्थितः ॥१५६॥
अर्थ :
येथे मेघांप्रमाणें माया. तुषारांप्रमाणें धीवासना, आणि तुषारांत असलेल्या आकाशाप्रमाणें चिदाभास समजावा. ॥१५६॥
धीवास्नाश्चिदाभासः श्रुतो मायी महेश्वरः ।
अन्तर्यामी च सर्वज्ञो जगद्योनिः स एव हि ॥१५७॥
अर्थ :
माया ज्याच्या आधीन आहे त्यालाच श्रुतीमध्ये मायी, अंतर्यामी, सर्वज्ञ आणि जगद्योनि, असे नांव दिले आहे. ॥१५७॥
सौषुप्तमानन्दमयं प्रक्रम्यैवं श्रुतिर्जगौ ।
एष सर्वेश्वर इति सोऽयं वेदोक्त ईश्वरः ॥१५८॥
अर्थ :
ह्याप्रमाणें सुषुतीसंबंधी जो आनंदमय कोश तो ईश्वर असे श्रुतीनें सांगितलें. वेदोक्त ईश्वर हाच. ॥१५८॥
सर्वज्ञत्वादिके तस्य नैव विप्रतिपद्यताम् ।
श्रौतार्थस्यावितर्क्यत्वान्मायायां सर्वसम्भवात् ॥१५९॥
अर्थ :
हा ईश्वर मानला तर त्याचे ठायी सर्वज्ञत्वादि गुण कसे आले अशी शंका नको. कारण श्रुतीचा अर्थ तर्कास योग्य नाही. आणि मायेचेठायी सर्व संभव आहे. ॥१५९॥
अयं यत्सृजते विश्वं तदन्यथयितुं पुमान् ।
न कोऽपि शक्तस्तेनायं सर्वेश्वर इति ईरितः ॥१६०॥
अर्थ :
ईश्वर जी सृष्टि उत्पन्न करतो ती अन्यथा करण्यास कोणी समर्थ नाही. म्हणून याला सर्वेश्वर असे म्हणतात. ॥१६०॥
अशेषप्राणिबुद्धीनां वासनास्तत्र संस्थिताः ।
ताभिः क्रोडीकृतं सर्वं तेन सर्वज्ञ ईरितः ॥१६१॥
अर्थ :
अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठायी एकत्र झालेल्या आहेत, आणि त्या सर्व वासनांला हे सर्व जग विषय आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलें. ॥१६१॥
वासनानां परोक्षत्वात्सर्वज्ञत्वं न हीक्ष्यते ।
सर्वबुद्धिषु तद्दृष्ट्वा वासनास्वनुमीयताम् ॥१६२॥
अर्थ :
वासना परोक्ष आहेत म्हणून सर्वज्ञत्व अनुभवास येत नाही खरें; तथापि, तेंच सर्वांच्या बुद्धींत असल्यामुळे वासनांतही त्याचे अनुमान होतें. ॥१६२॥
विज्ञानमयमुख्येषु कोषेष्वन्यत्र चैव हि ।
अन्तस्तिष्ठन्यमयति तेनान्तर्यामितां व्रजेत् ॥१६३॥
अर्थ :
विज्ञानमयादिक कोशांमध्ये आणि पूथ्व्यादिक जड पदार्थांमध्ये आंत राहून नियमन करतो म्हणून तो अंतर्यामी. ॥१६३॥
बुद्धौ तिष्ठन्नान्तरोऽस्याधियानीक्ष्यश्च धीवपुः ।
धियमन्तर्यमयतीत्येवं वेदेन घोषितम् ॥१६४॥
अर्थ :
बुद्धीच्या ठायी राहून बुद्धीला अदृश्य, बुद्धि हेंच त्याचे शरीर, असे असून तो बुद्धीचे नियमन करतो असा श्रुतीचा डांगोरा आहे.॥१६४॥
तन्तुः पटे स्थितो यद्वदुपादानतया तथा ।
सर्वोपादानरूपत्वात्सर्वत्रायमवस्थितः ॥१६५॥
अर्थ :
ज्याप्रमाणें पटामध्यें तंतु उपादानरूपानें असतो त्याप्रमाणे ईश्वरही सर्व सृष्टीचे उपादान असल्यामुळे तो सर्वत्र व्यापक आहे. ॥१६५॥
पटादप्यान्तरस्तन्तुस्तन्तोरप्यंशुरान्तरः ।
आन्तरत्वस्य विश्रान्तिर्यत्रासावनुमीयताम् ॥१६६॥
अर्थ :
पटाच्या आंत तंतु, तंतुच्या आत अंशु, या रीतीने जेथे आंतपणाची सीमा संपून बुद्धि विश्रांति घेते तेथे ईश्वराचे अनुमान करावयाचे. ॥१६६॥
द्वित्र्यान्तरत्वकक्षाणां दर्शनेऽप्ययमान्तरः ।
न वीक्ष्यते ततो युक्तिश्रुतिभ्यामेव निर्णयः ॥१६७॥
अर्थ :
एकीच्या आंत दुसरी, दुसरीच्या आंत तिसरी, याप्रमाणे कक्षा किती जरी दृष्टीस पडल्या, तरी अंतर्यामी परमेश्वर दिसत नाही; म्हणून त्याचा निर्णय युक्ति आणि श्रुति या दोहोंच्या साहाय्यानेंच केला पाहिजे. ॥१६७॥
पटरूपेण संस्थानात्पटस्तन्तोर्वपुर्यथा ।
सर्वरूपेण संस्थानात्सर्वमस्य वपुस्तथा ॥१६८॥
अर्थ :
तंतु पटरूपाने असतो म्हणून पट हे तंतूचे बनले असे एक शरीरच आहे, त्याप्रमाणे सर्वरूपाने ईश्वर आहे म्हणून सर्व जगच याचे शरीर आहे. ॥१६८॥
तन्तोः संकोचविस्तारचलनादौ पटस्तथा ।
अवश्यमेव भवति न स्वातन्त्र्यं पटे मनाक् ॥१६९॥
अर्थ :
तंतूचा संकोच, विस्तार आणि चलन हे जसजसे होतील तसतसा पटही संकोचादिक दशा पावतो. पटाच्याठायीं स्वातंत्र्य मुळींच नाही. ॥१६९॥
तथान्तर्याम्ययं यत्र यया वासनया यथा ।
विक्रीयते तथावश्यं भवत्येव न संशयः ॥१७०॥
अर्थ :
त्याप्रमाणे हा अंतर्यामी जेथे जेथे ज्या वासनेने जसा जसा विकार पावतो, त्या त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडतात यांत संशय नाही. ॥ १७०॥
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन !तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥१७१॥
अर्थ :
भगवंतानी अर्जुनास असे सांगितले आहे की, सर्व भूतांच्या हृदयांमध्ये ईश्वर वास करतो. आणि जणु यंत्रावरच बसविलेली भूते आपल्या मायारूप किल्लीने फिरवीत आहे. ॥१७१॥
सर्वभूतानि विज्ञानमयास्ते हृदये स्थिताः ।
तदुपादानभूतेशस्तत्र विक्रियते खलु ॥१७२॥
अर्थ :
येथे "सर्वभूतांना'' याचा अर्थ हृदयांत असलेले विज्ञानमय जे कोश तेच येथे भूते समजावी त्यांचे उपादान कारण जो ईश तोच विकारातें पावतो. ॥१७२॥
देहादिपञ्जरं यन्त्रं तदारोहोऽभिमानिता ।
विहितप्रतिसिद्धेषु प्रवृत्तिर्भ्रमणं भवेत् ॥१७३॥
अर्थ :
येथे देह, मन, बुद्धि आदिक जे पंजर तेंच यंत्र होय. त्याजवरील जो अभिमान हाच आरोह ( चढणे) आणि विधिनिषेधात्मक कर्माविषयी जी प्रवृत्ति तेंच भ्रमण होय. ॥१७३॥
विज्ञानमयरूपेण तत्प्रवृत्तिस्वरूपतः ।
स्वशक्त्येशो विक्रियते मायया भ्रामणं हि तत् ॥१७४॥
अर्थ :
आता "भ्रामयन्'' ही प्रयोजक क्रिया व माया या दोन शब्दांचा अर्थ सांगतो त्या कर्माची प्रवृत्ति विज्ञानमयरूपानें असल्यामुळे ईश आपल्या शक्तीच्या योगाने जो विकार करतो त्यालाच मायेचे योगाने फिरविणे असे म्हणतात. ॥१७४॥
अन्तर्यमयतीत्युक्त्या यमेवार्थः श्रुतौ श्रुतः ।
पृथिव्यादिषु सर्वत्र न्यायोऽयं योज्यतां धिया ॥१७५॥
अर्थ :
श्रुतींत "अंतर्यमयति'' असे जे वचन आहे त्याचाही अर्थ हाच आहे. हाच न्यायबुद्धीनें पृथिव्यादिकांना लावावा. ॥१७५॥
अर्थ :
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति-
र्जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ।
केनापि देवेन हृदि स्थितेन
यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥१७६॥
अर्थ :
मी धर्म जाणतो म्हणून माझी धर्माकडे प्रवृत्ति आहे असे नाही. व अधर्म जाणतो म्हणून अधर्मापासून माझी निवृत्ति आहे असेही नाही. तर हृदयांत बसलेला कोणी एक देव मजकडून जसे करवितो तसे मी करीत आहें, असे पुराणांत वचन आहे. ॥१७६॥
नार्थः पुरुषकारेणेत्येवं मा शंक्यतां यतः ।
ईशः पुरुषकारस्य रूपेणापि विवर्तते ॥१७७॥
अर्थ :
तर मग मनुष्य-प्रयत्न व्यर्थ अशी शंका कोणी घेईल तर त्याचे समाधान इतकें की, ईश्वर हा प्रयत्नरूपानेंच असतो. ॥१७७॥
ईदृग्बोधेनेश्वरस्य प्रवृत्तिर्मैव वार्यताम् ।
तथापीशस्य बोधेन स्वात्मासङ्गत्वधीजनिः ॥१७८॥
अर्थ :
याप्रमाणें मानल्यास "अंतर्यमयति'' या वाक्याने जी प्रेरणा सांगितली ती व्यर्थ असे मात्र म्हणू नये. कारण, तशा प्रकारचे ईश्वराचे ज्ञानही आम्हांस असंगत्वज्ञान होण्यास पुरे आहे. ॥१७८॥
तावता मुक्तिरित्याहुः श्रुतयः स्मृतयस्तथा ।
श्रुतिस्मृती ममैवाज्ञे इत्यपीश्वरभाषितम् ॥१७९॥
अर्थ :
अशा आत्मज्ञानानें मुक्ति मिळते असे श्रुतिस्मृतीत सांगितले आहे. श्रुति व स्मृति या माझ्याच आज्ञा असे भगवतांनी प्रत्यक्ष म्हटले आहे. म्हणून ते अप्रमाण म्हणता येत नाही. ॥१७९॥
आज्ञाया भीतिहेतुत्वं भीषास्मादिति हि श्रुतम् ।
सर्वेश्वरत्वमेतत्स्यादन्तर्यामित्वतः पृथक् ॥१८०॥
अर्थ :
भीतीला हेतु आज्ञा आहे, एतद्विषयी "भीषास्मात्'' ही श्रुति प्रमाण आहे. परमेश्वर अंतर्यामी असल्यामुळे तो सर्व जगाहनू निराळा आहे. ॥१८०॥
एतस्य वा अक्षरस्य प्रशासन इति श्रुतिः ।
अन्तः प्रविष्टः शास्तायं जनानामिति च श्रुतिः ॥१८१॥
अर्थ :
ईश्वर आंत बाहेर सर्वत्र व्यापला आहे असे म्हणण्यास "एतस्य वा अक्षरस्य'' व "अंतःप्रविष्टः शास्ता'' अशा दोन श्रुति प्रमाण होत. ॥१८१॥
जगद्योनिर्भवेदेष प्रभवाप्ययकृद्यतः ।
आविर्भावतिरोभावावुत्पत्तिप्रलयौ मतौ ॥१८२॥
अर्थ :
ह्याच्यापासून जगाची उत्पत्ति आणि नाश होतात. म्हणून जगद्योनि (जगाचे कारण) असे त्यास म्हणतात. उत्पात आणि प्रलय याचा अर्थ दिसणे आणि गुप्त होणें असा आहे. ॥१८२॥
आविर्भावयति स्वस्मिन्विलीनं सकलं जगत् ।
प्राणिकर्मवशादेष पटो यद्वत्प्रसारितः ॥१८३॥
अर्थ :
ज्याप्रमाणें घडी घातलेला पट स्वतःच्या पसरण्यानें आपल्याठायी असलेली चित्रे प्रकट करतो, तद्वत ईश्वरही आपल्याठायीं लीन झालेले जग प्राण्याच्या कर्मभोगास्तव प्रकट करतो. ॥१८३॥
पुनस्तिरोभावयति स्वात्मन्येवाखिलं जगत् ।
प्राणिकर्मक्षयवशात्संकोचितपटो यथा ॥१८४॥
अर्थ :
आणि ज्याप्रमाणें तो पट गुंडाळण्याच्या योगाने, आपल्या ठायीची चित्रें आपल्यामध्येच झांकतो, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्याठायीचे जग प्रत्ययाच्या कर्मक्षयामुळे आपल्याठायींच लीन करतो. ॥१८४॥
रात्रिघस्रौ सुप्तिबोधावुन्मीलननिमीलने ।
तूष्णींभावमनोराज्ये इव सृष्टिलयाविमौ ॥१८५॥
अर्थ :
ज्या- प्रमाणे रात्रं-दिवस, निद्रा-जागृति, उघडणे-झाकणें, मनाचा स्तब्धपणा आणि कल्पना ही द्वंद्वे आहेत, त्याप्रमाणेंच सृष्टि आणि लय ही समजावी. ॥१८५॥
आविर्भावतिरोभावशक्तिमत्त्वेन हेतुना ।
आरम्भपरिणामादिचोद्यानां नात्र सम्भवः ॥१८६॥
अर्थ :
आविर्भाव, तिरोभाव करण्याची शक्ति ईश्वराचेठायी आहे एवढ्या कारणाने आरंभवादाची व परिणामवादाची शंका येण्याचा संभव आहे. ह्या दोनही शंकाचे निवारण विवर्तवादाचा स्वीकार केल्याने होते ॥१८६॥
अचेतनानां हेतुः स्याज्जाड्यांशेनेश्वरस्तथा ।
चिदाभासांशतस्त्वेष जीवानां कारणं भवेत् ॥१८७॥
अर्थ :
एकच परमेश्वर चेतनाचेतनरूप द्विविध जगाला कारण कसा झाला, असे कोणी पुसेल, तर जडांशानें तो अचेतनाचे कारण आणि चिदाभासाच्या अंशाने चेतनाचें कारण आहे हेंच त्याचे उत्तर. ॥१८७॥
तमः प्रधानः क्षेत्राणां चित्प्रधानाश्चिदात्मनाम् ।
परः कारणतामेति भावनाज्ञानकर्मभिः ॥१८८॥
अर्थ :
तमःप्रधान जो परमात्मा तो भावना, ज्ञान व कर्म यांही करून क्षेत्राचे कारण आहे; आणि चित्प्रधान जो परमात्मा तो चिदाभासाचे कारण आहे. ॥१८८॥
इति वार्तिककारेण जडचेतनहेतुता ।
परमात्मन एवोक्ता नेश्वरस्येति चेच्छ्हृणु ॥१८९॥
अर्थ :
या रीतीनें वार्तिककारांनीं जड चेतनाचे कारण परमात्म्याकडेच लावले आहे. म्हणून ईश्वर कांही जगत्कारण नव्हे असे जर म्हणाल, तर ॥१८९॥
अन्योन्याध्यासमत्रापि जीवकूटस्थयोरिव ।
ईश्वरब्रह्मणोः सिद्धं कृत्वा ब्रूते सुरेश्वरः ॥१९०॥
अर्थ :
येथेही जीव कूटस्थाप्रमाणे ईश्वर आणि ब्रह्म यांचा अन्योन्याध्यास सिद्ध करून सुरेश्वराचार्य बोलले आहेत ते असेंः-॥१९०॥
सत्यं ज्ञानमनन्तं यद्ब्रह्म तस्मात्समुत्थिताः ।
खं वाय्वग्निजलोर्व्योषध्यन्नदेहाः इति श्रुतिः ॥१९१॥
अर्थ :
ब्रह्म हे सत्यज्ञानस्वरूपी असून अनंत आहे. त्यापासून आकाशादि देहापर्यंत भाव उत्पन्न झाले अशी श्रुति आहे. ॥१९१॥
आपातदृष्टितस्तत्र ब्रह्मणो भाति हेतुता ।
हेतोश्च सत्यता तस्मादन्योन्याध्यास इष्यते ॥१९२॥
अर्थ :
केवळ बाह्यदृष्टीने, ब्रह्म हे जगाचे कारण नसून ते आहे असे दिसते, आणि जगाचे जे कारण मायाधीन चिदाभास तो खोटा असून खरा दिसतो. यालाच अन्योन्याध्यास म्हणतात. ॥१९२॥
अन्योन्याध्यासरूपोऽसावन्नलिप्तः पटो यथा ।
घट्टितेनैकतामेति तद्वद्भ्रान्तैकतांगतः ॥१९३॥
अर्थ :
ज्याप्रमाणें खळ लावलेल्या पटांत खळ कोणती आणि पट कोणता हे समजत नाही, त्याप्रमाणे भ्रांतीमुळें वर सांगितलेल्या अन्योन्याध्यासरूप हेतूमुळे ब्रह्म आणि ईश यांचा भेद समजत नाही. ॥१९३॥
मेघाकाशमहाकाशौ विविच्येते न पामरैः ।
तद्वद्ब्रह्मएशयोरैक्यं पश्यन्त्यापातदर्शिनः ॥१९४॥
अर्थ :
मेघाकाश कोणते आणि महाकाश कोणते हे असे अज्ञानी लोकांस समजणे कठिण, त्याप्रमाणे वरवर पहाणारांना ब्रह्म आणि ईश हे दोन्ही एकच दिसतात. ॥१९४॥
उपक्रमादिभिर्लिङ्गैस्तात्पर्यस्य विचारणात् ।
असङ्गं ब्रह्म मायावी सृजत्येष महेश्वरः ॥१९५॥
अर्थ :
उपक्रमादि लिंगांहींकरून श्रुतीचे तात्पर्य काढलें असता ब्रह्म असंग आहे आणि सृष्टिकर्ता ईश्वर आहे असे समजले. ॥१९५॥
सत्यं ज्ञानमनन्तं चेत्युपक्रम्योपसंहृतः ।
यतो वाचो निवर्तन्ते इत्यसङ्गत्वनिर्णयः ॥१९६॥
अर्थ :
"सत्यं ज्ञानमनंतं'' या श्रुतीने (उपक्रम) करून "यतो वाची निवर्तंते'' या श्रुतीनें उपसंहार (समाप्ति) करून ब्रह्माच्या असंगत्वाविषयीं शास्त्रांत निर्णय केला आहे. ॥१९६॥
मायी सृजति विश्वं संनिरुद्धस्तत्र मायया ।
अन्य इत्यपरा ब्रूते श्रुतिस्तेनेश्वरः सृजेत् ॥१९७॥
अर्थ :
मायावी ईश्वर जग उत्पन्न करतो आणि त्या जगांत जीव मायेने बद्ध झाला आहे अशी दुसरी एक श्रुति आहे. त्यावरून ईश्वर जगाचा उत्पन्नकर्ता, असे होतें. ॥१९७॥
आनन्दमय ईशोऽयं बहु स्यामित्यवैक्षत ।
हिरण्यगर्भरूपोऽभूत्सुप्तिः स्वप्नो यथा भवेत् ॥१९८॥
अर्थ :
आनंदमय जो ईश तोच "बहुस्यां'' असा संकल्प करून निद्रा जशी स्वप्न होते त्याप्रमाणे हिरण्यगर्भ झाला. ॥१९८॥
क्रमेण युगपद्वैषा सृष्टिर्ज्ञेया यथाश्रुति ।
द्विविधश्रुतिसद्भावाद्द्विविधस्वप्नदर्शनात् ॥१९९॥
अर्थ :
ही सृष्टि दोन प्रकारची घ्यावी. एक क्रमसृष्टि आणि दुसरी युगपत्सृष्टि. कारण, त्याला दोन प्रकारच्या श्रुतीही प्रमाण आहेत. आणि ज्या स्वप्नाचा आम्ही दृष्टांत दिला, ते स्वप्नही दोन प्रकारचे अनुभवास येतें. ॥१९९॥
सूत्रात्मा सूक्ष्मदेहाख्यः सर्वजीवघनात्मकः ।
सर्वाहंमानधारित्वात्क्रियाज्ञानादिशक्तिमान् ॥२००॥
अर्थ :
सूक्ष्म देहाख्य जो सुत्रात्मा तो सर्व जीवाचे समष्टिरूप आहे. कारण, आम्ही जसे एकेका देहाविषयी अभिमानी आहोंत, त्याप्रमाणे तो सर्व जगाचा अभिमानी आहे. आणि क्रियाज्ञान आदिकरून शक्ति त्याच्यामध्यें आहेत. ॥२००॥
प्रत्यूषे वा प्रदोषे वा मग्नो मन्दे तमस्ययम् ।
लोको भाति यथा तद्वदस्पष्टं जगदीक्ष्यते ॥२००॥
अर्थ :
पहांटेस अथवा सायंकाळी मंद अंधकारांत जग जसे अस्पष्ट भासते तसेंच हिरण्यगर्भावस्थेमध्यें भासते. ॥२००॥
सर्वतो लाञ्छितो मस्या यथा स्याद्घट्टितः पटः ।
सूक्ष्माकारैस्तथेशस्य वपुः सर्वत्र लाञ्छितम् ॥२०२॥
अर्थ :
ज्याप्रमाणें खळ दिलेला पट मषीने आसलेला सर्वत्र असतो, त्याप्रमाणे ईश्वराचे शरीर या अवस्थेमध्ये सूक्ष्म आकारानीं लांछित झालेले असते. ॥२०२॥
शस्यं वा शाकजातं वा सर्वतोऽङ्कुरितं यथा ।
कोमलं तद्वदेवैष पेलवो जगदङ्कुरः ॥२०३॥
अर्थ :
अथवा ज्याप्रमाणें धान्य .अथवा भाजीपाला यांचे कोवळे अंकुर भूमीवर उगवतात, त्याप्रमाणे या अवस्थेंत जगाचा अंकुर फार कोंवळा असतो. ॥२०३॥
आतपाभातलोको वा पटो वा वर्णपूरितः ।
शस्यं वा फलितं यदवत्तथा स्पष्टवपुर्विराट् ॥२०४॥
अर्थ :
आता हिरण्यगर्भ अवस्थेला वर जे तीन दृष्टांत दिले त्यांच्याच क्रमेंकरून स्पष्ट दशा पाहिल्या असता विराट्-स्वरूप चांगले ध्यानांत येईल. म्हणजे मदांधकार जाऊन ऊन पडले असता जग जसे स्पष्ट भासते, पट रंगविला असता चित्रे जशी स्पष्ट भासतात, अथवा शेते पक्व झाली असता धान्यफळें जशी स्पष्ट भासतात; त्याप्रमाणे हिरण्यगर्भ विराट्-रूपाने स्पष्ट भासूं लागतो. ॥२०४॥
विश्वरूपाध्याय एष उक्तः सूक्तेऽपि पौरुषे ।
धात्रादिस्तम्बपर्यन्तानेतस्यावयवान् विदुः ॥२०५॥
अर्थ :
विश्वरूपाध्यायामध्ये आणि पुरुषसूक्तांतही ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत या विराटाचे सर्व अवयव आहेत असे म्हटले आहे. ॥२०५॥
ईशसूत्रविराट्वेधोविष्णुरुद्रएन्द्रवह्नयः ।
विघ्नभैरवमैरालमारिका यक्षराक्षसाः ॥२०६॥
अर्थ :
ईश, सूत्र, विराट्, ब्रह्मदेव, विष्णु, रुद्र, इंद्र, अग्नि, विघ्नेश, भैरव, मैराल, मारिका, यक्ष व राक्षस. ॥२०६॥
विप्रक्षत्रियविट्शूद्रा गवाश्वमृगपक्षिणः ।
अश्वत्थवटचूताद्या यववृहितृणादयः ॥२०७॥
अर्थ :
विप्र, क्षत्रिय, विट्, शूद्र, गाय, घोडा, मृग, पक्षी, अश्वत्थ, वट, आम्रवृक्षादि, यवादि, धान्यतृणादि ॥२०७॥
जलपाषाणमृत्काष्ठवास्याकुद्दालकादयः ।
ईश्वराः सर्व एवैते पूजिताः फलदायिनः ॥२०८॥
अर्थ :
जल, पाषाण, माती, काष्ठ, वास्याकुद्दालकादिपर्यंत ईश्वर मानून पूजिले असता फलदायी होतात. ॥२०८॥
यथा यथोपासते तं फलमीयुस्तथा तथा ।
फलोत्कर्षापकर्षौ तु पूज्यपूजानुसारतः ॥२०९॥
अर्थ :
जशी जशी उपासूना करावी तसे तसे फळ मिळतें. कमीजास्त फळ मिळणे हे पूज्य देवता आणि पूजेचा प्रकार यांवर अवलंबन आहे. ॥२०९॥
मुक्तिस्तु ब्रह्मतत्त्वस्य ज्ञानादेव न चान्यथा ।
स्वप्रबोधं विना नैव स्वस्वप्नं हीयते यथा ॥२१०॥
अर्थ :
परंतु मुक्ति ही ब्रह्मतत्त्वाच्या ज्ञानावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मिळणार नाही. पहा, स्वप्न जर नाहींसे करावयाचें आहे, तर जागेच झाले पाहिजे; त्यावाचून दुसरा उपाय नाही. ॥२१०॥
अद्वितीयब्रह्मतत्त्वे स्वप्नोऽयमखिलं जगत् ।
ईशजीवाद्रूपेण चेतनाचेतनात्मकम् ॥२११॥
अर्थ :
एथे स्वप्नाचा दृष्टांतही योग्य आहे. कारण, अद्वितीय ब्रह्मतत्त्वाचेठायी ईशजीवादिरूपानें असणारे सर्व चराचर जग स्वप्नाप्रमाणेंच आहे. ॥२११॥
आनन्दमयविज्ञानमयावीश्वरजीवकौ ।
मायया कल्पितावेतौ ताभ्यां सर्वं प्रकल्पितम् ॥२१२॥
अर्थ :
आनंदमय ईश्वर अणि विज्ञानमय जीव हे आदिमायेने कल्पिले आणि त्या उभयतांनी बाकी जगाची कल्पना केली. आता मायेने कल्पिले तेही जगच आहे; तेव्हा जीव आणि ईश हे जगापैकीच झाले. ॥२१२॥
ईक्षणादिप्रवेशान्ता सृष्टिरीशेन कल्पिता ।
जाग्रदादिविमोक्षान्तः संसारो जीवकल्पितः ॥२१३॥
अर्थ :
इच्छादिकरून प्रवेशापर्यंत जी सृष्टि आहे ती ईश्वराने केलेली, आणि जागृतीपासून मोक्षापर्यंत जी सृष्टि ती जीवानें केलेली आहे. ॥२१३॥
अद्वितीयं ब्रह्मतत्त्वमसङ्गं तन्न जानते ।
जीवएशयोर्मायिकयोर्वृथैव कलहं ययुः ॥२१४॥
अर्थ :
असंग, अद्वितीय जे ब्रह्मतत्त्व, ते न जाणता मायीक जे जीव आणि ईश यांविषयी लोक व्यर्थ कलह करतात. ॥२१४॥
ज्ञात्वा सदा तत्त्वनिष्ठाननुमोदामहे वयम् ।
अनुशोचाम एवान्यान्न भ्रान्तैर्विवदामहे ॥२१५॥
अर्थ :
आता यांना बोध करून मार्गास लावावे असे कोणी म्हणेल, तर आमची रीती अशी आहे. तत्त्वनिष्ठांना पाहून आम्ही मान डोलवितों. अज्ञान्यांना पाहून आम्हांस वाईट वाटतें, आणि भ्रमिष्टांशी आम्ही वादच करीत नाही. ॥२१५॥
तृणार्चकादियोगान्ता ईश्वरभ्रान्तिमाश्रिताः ।
लोकायतादिसांख्यान्ता जीवविभ्रान्तिमाश्रिताः ॥२१६॥
अर्थ :
तृणार्चकापासून योगवाद्यापर्यंत सारे ईश्वराविषयी भ्रांतींत पडले आहेत, आणि लोकायत म्हणजे देहात्मवाद्यांपासून सांख्यवाद्यांपर्यंत सगळे जीवाविषयी भ्रांतींत पडले आहेत. ॥२१६॥
अद्वितीयब्रह्मतत्त्वं न जानन्ति यदा तदा ।
भ्रान्ता एवाखिलास्तेषां क्व मुक्तिः क्वेह वा सुखम् ॥२१७॥
अर्थ :
हे भ्रांत कसे जर म्हणाल तर जोपर्यंत अद्वितीय ब्रह्मतत्त्व समजलें नाही, तोपर्यंत सर्व भ्रमांतच आहेत असे म्हटले पाहिजे. अशा लोकांस मुक्तीही नाही आणि ऐहिक सुखही नाही. ॥२१७॥
उत्तमाधमभावश्चेत्तेषां स्यादस्तु तेन किम् ।
स्वप्नस्थराज्यभिक्षाभ्यां न बुद्धः स्पृश्यते खलु ॥२१८॥
अर्थ :
कोणी म्हणेल की, त्यांस ब्रह्मज्ञान जरी कदाचित् नसलें, तरी इतर विद्येच्या संबंधाने लहानमोठेपणा आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना सुखाची प्राप्तीही आहे; तर तसे सुख असून नमून सारखेच, त्याचा आम्हास काय उपयोग ? स्वप्नांत राज्यप्राप्ति आणि भिक्षा मागणें या दोन्ही गोष्टींचा संपर्क जागृताला मुळींच नाही. ॥२१८॥
तस्मान्मुमुक्षिभिर्नैव मतिर्जीवेशवादयोः ।
कार्या किंतु ब्रह्मतत्त्वं विचार्य बुध्यतां च तत् ॥२१९॥
अर्थ :
म्हणून मुमुक्षूंनी जीव आणि ईश याविषयींचा वाद सोडून देऊन ब्रह्मतत्त्वाचा विचार करावा, आणि ते नीट समजून घ्यावे. ॥२१९॥
पूर्वपक्षतया तौ चेत्तत्त्वनिश्चयहेतुताम् ।
प्राप्नुतोऽस्तु निमज्जस्य तयोर्नैतावता वशः ॥२२०॥
अर्थ :
ब्रह्मतत्त्वाचा निश्चय करण्याकरितां तरी या दोन्ही वादांची आवश्यकता आहे की नाही असा जर कोणी प्रश्न करील, तर त्यास असे सांगतो की गरजेपुरता त्याचा उपयोग करून स्वीकार करावा. अविचाराने त्यांतच गढून बसू नये. २२० ॥
असङ्गचिद्विभुर्जीवः सांख्योक्तस्तादृगीश्वरः ।
योगोक्तस्तत्त्वमोरर्थौ शुद्धौ ताविति चेच्छृणु ॥२२१॥
अर्थ :
असंग चिद्रूप आणि विभु असा सांख्यांनी वर्णिलेला जीव आणि तसाच योगांत सांगितलेला ईश्वर हे दोन्हीही "तत्'' आणि "त्वं'' या दोन पदांचे जे तुम्ही अर्थ केले आहेत त्यापासून भिन्न नाहींत. मग त्यांस पूर्व पक्ष तरी का म्हणावे असे जर कोणाचे म्हणणे असेल तर त्यावर आमचें असे उत्तर आहे की, ॥२२१॥
न तत्त्वमोरुभावार्थावस्मत्सिद्धान्ततां गतौ ।
अद्वैतबोधनायैव सा कक्षा काचिदिष्यते ॥२२२॥
अर्थ :
त्यांनीं केलेले अर्थ आमच्या सिद्धांतापासून भिन्न आहेत. आता आम्ही जे "तत्'' आणि "त्वं'' पदांचे अर्थ केले आहेत ते केवळ अद्वैताचा बोध व्हावा म्हणून. ॥२२२॥
अनादिमायया भ्रान्ता जीवेशौ सुविलक्षणौ ।
मन्यन्ते तद्व्युदासाय केवलं शोधनं तयोः ॥२२३॥
अर्थ :
अनादि मायेने मोहित होऊन जीव आणि ईश हे निराळे आहेत असे लोक समजतात, ती समजूत काढून टाकण्याकरितां आम्ही त्या दोन पदार्थांचे शोधन केले आहे. ॥२२३॥
अत एवात्र दृष्टान्तो योग्यः प्राक्सम्यगीरितः ।
घटाकाशमहाकाशजलाकाशाभ्रखात्मकः ॥२२४॥
अर्थ :
याकरितांच पूर्वी सांगितलेला, घटाकाश, महाकाश, जलाकाश व अभ्राकाश या चोहोंचा दृष्टांत येथे चांगला जुळतो. ॥२२४॥
जलाभ्रोपाध्यधीने ते जलाकाशाभ्रखे तयोः ।
आधारौ तु घटाकाशमहाकाशौ सुनिर्मलौ ॥२२५॥
अर्थ :
यांत जलाकाश आणि अभ्राकाश ही दोन्ही जल आणि अभ्र या उपाधींवर अवलंबून आहेत. या उभय आकाशांना आधारभूत घटाकाश आणि महाकाश ही अत्यंत निर्मल आहेत. ॥२२५॥
एवमानन्दविज्ञानमयौ मायाधियोर्वशौ ।
तदधिष्ठानकूटस्थब्रह्मणी तु सुनिर्मले ॥२२६॥
अर्थ :
त्याचप्रमाणे आनंदमय ईश आणिविज्ञानमय जीव हे उभयता क्रमेंकरून मायाआणि बुद्धि यांवर अवलंबून आहेत. आणि त्या दोहोंस अधिष्ठानभूत कूट आणि ब्रह्म हे अत्यंत निर्मल आहेत. ॥२२६॥
एतत्कक्षोपयोगेन सांख्ययोगौ मतौ यदि ।
देहोऽन्नमयकक्षत्वादात्मत्वेनाभ्युपेयताम् ॥२२७॥
अर्थ :
एवढा तुम्हीउपयोग करून घेतला म्हणून तरी सांख्य व योग हे तुम्हाला मान्य आहेत की नाहींत असे जर कोणी पुसेल, तर आम्ही म्हणतों की सांख्य व योगच का ? आम्ही अन्नमयकोशाचे वर्णन केल्याने देहात्मत्वसुद्धां स्वीकारलें असे होईल ॥२२७॥
आत्मभेदो जगत्सत्यमीशोऽन्य इति चेत्त्रयम् ।
त्यज्यते तैस्तदा सांख्ययोगवेदान्तसंमतिः ॥२२८॥
अर्थ :
आत्मे निरनिराळे आहेत. जग सत्य आहे, आणि ईश्वर निराळा आहे. ह्या तीन गोष्टी जर वगळल्या, तर सांख्य, योग आणि वेदान्त ह्या तिहींची संमति होते. ॥२२८॥
जीवासङ्गत्वमात्रेण कृतार्थ इति चेत्तदा ।
स्रक्चन्दनादिनित्यत्वमात्रेणापि कृतार्थता ॥२२९॥
अर्थ :
असंगत्वमात्रेंकरून जीव कृतार्थ आहे असे जर म्हणाल, स्रक्चंदनादि जे विषय आहेत त्यांच्या नित्यत्वेंकरूनही तो कृतार्थ होईल. ॥२२९॥
यथा स्रगादिनित्यत्वं दुःसम्पाद्यं तथात्मनः ।
असङ्गत्वं न सम्भाव्यं जीवतोर्जगदीशयोः ॥२३०॥
अर्थ :
परंतु स्रगादि विषयांचे नित्यत्व सिद्ध होणे अशक्य आहे, तसे जग आणि ईश हे प्रत्यक्ष असतांना जीवाचे असंगत्वही असंभाव्य आहे. ॥२३०॥
अवश्यं प्रकृतिः सङ्गं पुरेवापादयेत्तथा ।
नियच्छत्येतमीशोऽपि कोऽस्य मोक्षस्तथा सति ॥२३१॥
अर्थ :
जरी सांख्य ज्ञानाने तात्कालिक असंगता वाटली, तरी प्रकृतीच्या योगाने जीवास पुनः संग लागणारच. आणि पुनः त्याचे ईश्वर तर नियमन करतो; मग त्यास मोक्ष कोठून मिळणार ? ॥२३१॥
अविवेककृतः सङ्गो नियमश्चेति चेत्तदा ।
बलादापतितो मायावादः सांख्यस्य दुर्मतेः ॥२३२॥
अर्थ :
जीवाचा संग आणि ईश्वराचे नियमन या दोहोंस कारण अविवेक आहे असे जर सांख्यवादी म्हणेल तर त्या कुबुद्धि सांख्यांच्या मतांत बळेंच मायावाद आला. ॥२३२॥
बन्धमोक्षव्यवस्थार्थमात्मनानात्वमिष्यताम् ।
इति चेन्न यतो माया व्यवस्थापयितुं क्षमा ॥२३३॥
अर्थ :
आता कोणी म्हणेल की, आत्मे जे निरनिराळे मानले ते केवळ बंधमोक्षाची व्यवस्था करण्याकरितां. तर त्यावर आमचे असे म्हणणे की, ती व्यवस्था करण्यास सांख्यशास्त्र कशाला पाहिजे ? एक आत्मा जरी मानला तरी ती व्यवस्था करण्यास माया समर्थ आहे. ॥२३३॥
दुर्घटं घटयामीति विरुद्धं कि न पश्यसि ।
वास्तवौ बन्धमोक्षौ तु श्रुतिर्न सहतेतराम् ॥२३४॥
अर्थ :
दुर्घटाचीच मी घटना करते. असे विरुद्ध वाक्य तुम्ही पहात नाही काय ? एथे मोक्ष मायिक नव्हे असे समजू नये. बंधाप्रमाणेंच मोक्षालाही सत्यता देणे हे श्रुतीस अगदी सहन होत नाही. ॥२३४॥
न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥२३५॥
अर्थ :
नाश नाही, उत्पत्ति नाही, बद्ध नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही आणि मुक्तही नाही हाच परमार्थ. ॥२३५॥
मायाख्याया कामधेनोर्वत्सौ जीवेश्वरावुभौ ।
यथेच्छं पिबतां द्वैतं तत्त्वं त्वद्वैतमेव हि ॥२३६॥
अर्थ :
मायानामक कामधेनूचे जीव आणि ईश हे दोन वत्स आहेत. तिचे द्वैतरूप दुग्ध ते यथेच्छ प्राशन करोत बापडे. पण खरें तत्त्व जर म्हणाल तर अद्वैतच आहे. ॥२३६॥
कूटस्थब्रह्मणोर्भेदो नाममात्रादृते न हि ।
घटाकाशमहाकाशौ वियुज्येते न हि क्वचित् ॥२३७॥
अर्थ :
कूटस्थ आणि ब्रह्म यांमधील भेद केवळ नांवाचा आहे, वस्तुतः भेदच नाही. जसें घटाकाश आणि महाकाश यांचा वियोग कधींच झालेला नाही, त्याप्रमाणे त्या दोहोंमध्ये वियोगच नाही. ॥२३७॥
यदद्वैतं श्रुतं सृष्टेः प्राक्तदेवाद्य चोपरि ।
मुक्तावपि वृथा माया भ्रामयत्यखिलान् जनान् ॥२३८॥
अर्थ :
सृष्टीच्या पूर्वी जे अद्वैत होते म्हणून श्रुतीत सांगितले आहे तेंच आज आहे, आणि यानंतरही तेंच असणार; आणि तेंच मुक्तीनंतरही असणार. मायेनें सर्व लोकांस व्यर्थ भूमांत पाडलें आहे. ॥२३८॥
ये वदन्तीत्थमेतेऽपि भ्राम्यन्तेऽविद्ययात्र किम् ।
न यथा पूर्वमेतेषामत्र भ्रान्तेरदर्शनात् ॥२३९॥
अर्थ :
प्रपंच खोटा आणि अद्वैत खरें असे जे बोलतात ते देखील संसार करतात, मग तुमचे ब्रह्मज्ञान घेऊन करावयाचें काय अशी शंका कोणी घेण्याचे कारण नाही. कारण, जरी त्यांनीं पूर्व कर्माच्या ओघानें संसार केला तरी त्यांस पूर्वीप्रमाणे भ्रांति नसते. ॥२३९॥
ऐहिकामुष्मिकः सर्वः संसारो वास्तवस्ततः ।
न भाति नास्ति चाद्वैतमित्यज्ञानिविनिश्चयः ॥२४०॥
अर्थ :
ऐहिक आणि पारलौकिक संसार खरा आहे, आणि अद्वैत भासत नाही इतकेच नव्हे तर ते मुळींच नाही असा अज्ञानी लोकांचा निश्चय असतो. ॥२४०॥
ज्ञानीनां विपरीतोऽस्मान्निश्चयः सम्यगीक्ष्यते ।
स्वस्वनिश्चयतो बद्धो मुक्तोऽहं वेति मन्यते ॥२४१॥
अर्थ :
हा जो अज्ञानी लोकांचा निश्चय सांगितला, त्याच्या उलट ज्ञान्यांचा निश्चय स्पष्ट दिसून येतो. ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघेही आपापल्या निश्चयांप्रमाणें मी मुक्त आणि मी बद्ध असे मानतात. ॥२४१॥
नाद्वैतमपरोक्षं चेन्न चिद्रूपेण भासनात् ।
अशेषेण न भातं चेद्द्वैतं कि भासतेऽखिलम् ॥२४२॥
अर्थ :
अद्वैत युक्तीनेच सिद्ध होतें. अनुभवास ते येत नाही, मग निश्चय कसा करावा असे जर कोणी म्हणेल तर तशी शंका घेणे नलगे. कारण, घटादिक जे आम्हांस भासतात त्यांत ज्ञानरूपाने ते प्रत्यक्ष अनुभवास येतें; परंतु ते समग्र भासत नाही, असे जर कोणी म्हणेल तर आम्ही त्यास पुसतो की, तुमची द्वैतसृष्टि तरी समग्र भासते काय ? समग्र न भासण्याचे संबंधाने द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही सारखीच आहेत. ॥२४२॥
दिङ्मात्रेण विभानं तु द्वयोरपि समं खलु ।
द्वैतसिद्धिवदद्वैतसिद्धिस्त्वेतावता न किम् ॥२४३॥
अर्थ :
दिङ्मात्रेकरून जसे तुमचे द्वैत भासते, तसे आमचे अद्वैतही भासते. ही गोष्ट दोहींलाही साधारणच आहे. परंतु तेवढ्याने जर तुमची द्वैतसिद्धि होते, तर मग आमची अद्वैतसिद्धि ही का न व्हावी ? ॥२४३॥
द्वैतेन हीनमद्वैतं द्वैतज्ञाने कथं त्विदम् ।
चिद्भानं त्वविरोध्यस्य द्वैतस्यातोऽसमे उभे ॥२४४॥
अर्थ :
या लोकांत पूर्वपक्षी अद्वैतसिद्धि होत नाही अशी शंका अन्य प्रकाराने करतो की, अद्वैत म्हणजे द्वैतरहित; म्हणून द्वैत आणि अद्वैत ही परस्पर अत्यंत विरुद्ध आहेत; आणि हे जर सत्य आहे, तर सांप्रत द्वैतप्रतीति असता अद्वैत कसें संभवेल ? संभवणारच नाही. आता, हे सिद्धांती जर तू असे म्हणशील की, अद्वैत हे द्वैतविरोधी आहे, तर मग अद्वैतप्रतीतिकालीं द्वैतही असिद्ध आहे असा तुझा समान प्रश्न मला होणारच; यावर मी (पूर्वपक्षी) असे सांगतो की, हे सिद्धांती, तुझ्या मनांत चिद्रूपप्रतीति म्हणजेच अद्वैतप्रतीति आहे, आणि ती चिद्रूपप्रतीति तर ह्या प्रत्यक्ष द्वैताच्या विरोधी नाही; याकरिता उभयसाम्य नाही. या बोलण्यांत पूर्वपक्ष्याचा इतकाच अभिप्राय की, चिद्रूप जे अद्वैत, त्याच्या प्रतीतिकाली द्वैतभान संभवते. ॥२४४॥
एवं तर्हि शृणु द्वैतमसन्मायामयत्वतः ।
तेन वास्तवमद्वैतं परिशेषाद्विभासते ॥२४५॥
अर्थ :
याचे समाधान हेंच की, द्वैत मायाकल्पित असल्यामुळे ते मुळीच खोटे आहे; म्हणून खरें उरले जे अद्वैत तेंच भासते असे म्हणावयाचे. ॥२४५॥
अचिन्त्यरचनारूपं मायैव सकलं जगत् ।
इति निश्चित्य वस्तुत्वमद्वैते परिशेष्यताम् ॥२४६॥
अर्थ :
ज्याच्या रचनेची कल्पनाच करता येत नाही असे जे जग ते मायाकल्पित आहे म्हणून ते मिथ्या असा निश्चय करून उर्वरीत जे अद्वैत तेंच खरें असे समजावे. ॥२४६॥
पुनर्द्वैतस्य वस्तुत्वं भाति चेत्त्वं तथा पुनः ।
परिशीलय को वात्र प्रयासस्तेन ते वद ॥२४७॥
अर्थ :
सिद्धांतानें जगन्मिथ्यात्व जरी भासले, तरी ते पुनः पुनः खरेंच भासतें असे जर कोणी म्हणेल, तर पुनः त्याचाच निदिध्यास करावा यांत श्रम तो काय ? ॥२४७॥
कियन्तं कालमिति चेत्खेदोऽयं द्वैत इष्यताम् ।
अद्वैते तु न युक्तोऽयं सर्वानार्थनिवारणात् ॥२४८॥
अर्थ :
अशीच किती दिवस याची घोंटणी करावी अशी जर कोणास चिंता असेल तर तीच चिंता द्वैताविषयी "हे देवा, हे द्वैत किती दिवस मला भासणार" अशी चिंता करावी. अद्वैताविषयी चिंता नको. कारण, त्याने सर्व खेदाचे निवारण होते. ॥२४८॥
क्षुत्पिपासादयो दृष्टा यथापूर्वं मयीति चेत् ।
मच्छब्दवाच्येऽहङ्कारे दृश्यतां नेति को वदेत् ॥२४९॥
अर्थ :
इतके मला ज्ञान होऊन क्षुधातृषादि प्राणधर्म मला पूर्वीप्रमाणेंच भासतात, असे जर कोणी म्हणेल, तर आम्ही नाही कोठे म्हणतों ? जरी ते भासले, तरी मी म्हणणारा जो अहंकार त्याचेठायी ते भासतात, तर भासेनात बापडे. ॥२४९॥
चिद्रूपेऽपि प्रसज्येरन् तादात्म्याध्यासतो यदि ।
माध्यासं कुरु किन्तु त्वं विवेकं कुरु सर्वदा ॥२५०॥
अर्थ :
आत्म्यालाही तादात्म्याध्यासामुळे त्यांचा संपर्क लागेल अशी जर भीति वाटत असेल, तर तशी वाटण्याचें कारण नाही. कारण, तसा अभ्यास न होऊं देता विवेकच केला म्हणजे झाले. ॥२५०॥
झटित्यध्यास आयाति दृढवासनयेति चेत् ।
आवर्तयेत्द्विवेकं च दृढं वासयितुं सदा ॥२५१॥
अर्थ :
आता फार दिवसांची दृढवासना असल्यामुळे विवेक केला तरी पुनः पुनः अध्यास होतो हे खरें आहे. पण त्याजवर विवेकावाचून दुसरा उपाय नाही. विवेकाचे पुनः पुनः आवर्तन करून तेंच दृढ करावे ॥२५१॥
विवेके द्वैतमिथ्यात्वं युक्त्यै वेति न मण्यताम् ।
अचिन्त्यरचनात्वस्यानुभूतिर्हि स्वसाक्षिकी ॥२५२॥
अर्थ :
विवेकाने जे जगाचे मिथ्यात्व ठरते ते कवळ युक्तिसिद्ध होय. प्रत्यक्ष अनुभवास येत नाही. ही शंका योग्य नाही. कारण, जगाची अचिंत्य रचना प्रत्यक्ष अनुभवास येते; तेव्हा त्याचे मिथ्यात्व ज्ञान प्रत्यक्षच म्हटले पाहिजे. ॥२ ५२ ॥
चिदप्यचिन्त्यरचना यदि तर्ह्यस्तु नो वयम् ।
चितिं स्वचिन्त्यरचनां ब्रूमो नित्यत्वकारणात् ॥२५३॥
अर्थ :
तुमच्या चैतन्याची रचनाही अचिंत्यच आहे असे म्हणाल, तर आम्ही नाही कोठे म्हणतो ? द्वैत व अद्वैत ही दोनीही अचिंत्यच आहेत; परंतु हेतु मात्र निराळे. एकाला अनित्यत्व कारण, आणि दुसऱ्याला नित्यत्व कारण. अनित्य म्हणजे पदार्थांचा प्रागभाव ज्यास आहे ते. ॥२५३॥
प्रागभावो नानुभूतश्चितेर्नित्या ततश्चितिः ।
द्वैतस्य प्रागभावस्तु चैतन्येनानुभूयते ॥२५४॥
अर्थ :
तुमच्या चैतन्याला तरी नित्यत्व कोठे आहे असे जर कोणी म्हणेल तर आमचे उत्तर असे की, ज्या पदार्थाला प्रागभावआहे तोअनित्य. चैतन्याचा प्रागभाव कोणाच्याचअनुभवास येत नाही. परंतु द्वैतसृष्टीचा अभाव निद्रेमध्यें साक्षी चैतन्याचे अनुभवास येतो. ॥२५४॥
प्रागभावयुतं द्वैतं रच्यते हि घटादिवत् ।
तथापि रचना चिन्त्या मिथ्या तेनेन्द्रजालवत् ॥२५५॥
अर्थ :
म्हणून घटादिकांप्रमाणें सकल द्वैत प्रागभावानें युक्त असून त्याची रचनाही पुनः अचिन्त्य आहे म्हणून इंद्रजालाप्रमाणे ते मिथ्या आहे हे सिद्ध. ॥२५५॥
चित्प्रत्यक्षा ततोऽन्यस्य मिथ्यात्वं चानुभूयते ।
नाद्वैतमपरोक्षं चेत्येतन्न व्याहतं कथम् ॥२५६॥
अर्थ :
याप्रमाणे चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येते व द्वैताचे मिथ्यात्वही तसेंच अनुभवसिद्ध आहे. असे असून अद्वैत प्रत्यक्ष नाही म्हणणे हा विरोध नव्हे काय ? ॥२५६॥
इत्थं ज्ञात्वाप्यसन्तुष्टाः केचित्कुत इतीर्य ताम् ।
चार्वाकादेः प्रबुद्धस्याप्यात्मा देहः कुतो वद ॥२५७॥
अर्थ :
इतकें समजूनही कित्येक लोक असंतुष्ट का दिसतात, असा जर कोणी प्रश्न करीत असेल तर त्याजवर आम्ही असा प्रश्न करतो की चार्वाकादिक पंडित इतके विद्वान ते देहाला आत्मा का मानतात ? ॥२५७॥
सम्यग्विचारो नास्त्यस्य धीदोषादिति चेत्तथा ।
असन्तुष्टाश्च शास्त्रार्थं न त्वीक्षन्ते विशेषतः ॥२५८॥
अर्थ :
चार्वाकादिकांना कामक्रोधादि बुद्धिदोषांमुळे चांगला विचार होत नाही असे जर म्हणाल, तर आमचेही तसेंच उत्तर आहे. जे लोक असंतुष्ट दिसतात असे तुम्ही म्हणता ते केवळ शास्त्राचा चांगला विचार न केल्यामुळें तसे दिसतात. ॥२५८॥
यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः ।
इति श्रौतं फल दृष्टं नेति चेद्दृष्टमेव तत् ॥२५९॥
अर्थ :
तर मग "यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायेस्य हृदि श्रिताः'' (जेव्हा हदयांतील सर्व काम नष्ट होतात) हे श्रुतीचे फळ कोठे अनुभवास येत नाही, असे कोणी म्हणू नये. सर्व श्रुतींची एकवाक्यता करून विचार केला असता ते फल सिद्ध होतें. ॥२५९॥
यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयग्रन्थयस्त्विति ।
कामा ग्रन्थिस्वरूपेण व्याख्याता वाक्यशेषतः ॥२६०॥
अर्थ :
"ज्या काळी सर्व हदयग्रंथि सुटतात'' असे दुसरे एके ठिकाणी वाक्य आहे, तेथे हदयग्रंथिरूपाने कामाची व्याख्या केली आहे. ॥२६०॥
अहङ्कारचिदात्मानवेएकीकृत्याविवेकतः ।
इदं मे स्यादिदं मे स्यादितीच्छाः कामशब्दिताः ॥२६१॥
अर्थ :
अहंकार आणि चिदात्मा या दोहोंचे एकीकरण करून अविवेकाने हे मला असावे, हे मला असावे अशा ज्या इच्छा होतात त्यांसच काम असे म्हणतात. ॥२६१॥
अप्रवेश्य चिदात्मानं पृथक्पश्यन्नहङ्कृतिम् ।
इच्छस्तु कोटिवस्तूनि न बाधो ग्रन्थिभेदतः ॥२६२॥
अर्थ :
अहंकाराचा संग चिदात्म्याला न लावतां अहंकारास पृथक् पाहिले असता कोटी वस्तूंची जरी इच्छा झाली तरी ग्रंथिभेद झाल्यामुळे त्या बाधक होत नाहींत. ॥२६२॥
ग्रन्थिभेदेऽपि सम्भाव्या इच्छाः प्रारब्धदोषतः ।
बुध्वापि पापबाहुल्यादसन्तोषो यथा तव ॥२६३॥
अर्थ :
अध्यास गेल्यावर इच्छा मुळींच होऊं नयेत. परंतु त्या होतात त्यास कारण प्रारब्ध होय. याला उदाहरण दुसरे नको. तुझी आपणाकडे पहा म्हणजे झाले. इतके जाणून बुजून तुमच्या पूर्व जन्मींच्या पातकामुळे तुमची खात्री होत नाही हेच याला प्रमाण. ॥२६३॥
अहङ्कारगतेच्छाद्यैर्देहव्याधिदिभिस्तथा ।
वृक्षादिजन्मनाशैर्वा चिद्रूपात्मनि किं भवेत् ॥२६४॥
अर्थ :
वृक्षादिकांचा जन्मनाश झाला असता त्यामुळे असे मला कांहींच होत नाही, त्याप्रमाणे देहामध्ये असणारे रोगादिक व अहंकारामध्यें असणारे इच्छादिक यांहींकरून मी जो चिद्रूपात्मा; त्याला काय होणार आहे ? असा ज्ञान्याचा अनुभव असतो. ॥२६४॥
ग्रन्थिभेदात्पुराप्येवमिति चेत्तन्न विस्मर ।
अयमेव ग्रन्थिभेदस्तव तेन कृती भवान् ॥२६५॥
अर्थ :
ग्रंथिभेदाच्या पूर्वी देखील अशीच माझी स्थिति होती. असे जर कोणी म्हणेल तर हे मात्र विसरू नये. कारण, अशा प्रकारच्या समजुतीलाच आम्ही ग्रंथिभेद म्हणतो. आणि तो तर तुझ्या ठायी झालाच, म्हणून तू कृतार्थ आहेस. ॥२६५॥
नैवं जानन्ति मूढाश्चेत्सोऽयं ग्रन्थिर्नचापरः ।
ग्रन्थितद्भेदमात्रेण वैषम्यं मूढबुद्धयोः ॥२६६॥
अर्थ :
हे मृढाला समजत नाही. म्हणून हे न समजणेच ग्रंथि, दुसरा नाही. अज्ञानी आणि ज्ञानी यांमध्ये भेद म्हणून इतकाच की, पहिल्यामध्ये तो ग्रंथि असतो आणि दुसऱ्यामध्यें तो असत नाही. ॥२६६॥
प्रवृत्तौ वा निवृत्तौ वा देहेन्द्रियमनोधियाम् ।
न किंचिदपि वैषम्यमस्त्यज्ञानिविबुद्धयोः ॥२६७॥
व्रात्यश्रोत्रिययोर्वेदपाठापाठकृताभिदा ।
नाहारादवस्ति भेदः सोऽयं न्यायोऽत्र योज्यताम् ॥२६८॥
अर्थ :
ज्याप्रमाणें व्रात्य आणि श्रोत्रिय या दोघांमध्ये भेद इतकाच की, एकाला वेदाध्ययन आहे आणि दुसऱ्याला नाही; परंतु एरव्ही आहारविहारादिकांमध्यें दोघेही सारखेच; त्याप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञानी यांची गोष्ट आहे. प्रवृत्ति असो किंवा निवृत्ति असो, उभयतांच्या देह, इंद्रिय, मन, बुद्धि इत्यादिकांमध्यें मुळींच अंतर नाही. ॥ २६७-२६८ ॥
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ।
उदासीनवदासीन इति ग्रन्थिभिदोच्यते ॥२६९॥
अर्थ :
प्राप्त झालेल्या दुःखाचा द्वेष न करणे आणि अप्राप्त वस्तूची इच्छा न करणे व उदासीनाप्रमाणे असणें हे जे स्थितप्रज्ञाचे लक्षण गीतेत सांगितले आहे, त्यालाच ग्रंथिभेद म्हणतात. ॥२६९॥
औदासीन्यं विधेयं चेद्वच्छशब्द व्यर्थता तदा ।
न शक्ता ह्यस्य देहाद्या इति चेद्रोग एव सः ॥२७०॥
अर्थ :
औदासीन्य हे विधिपर आहे असे म्हणता येत नाही; कारण, तसे मानल्यास "वत्'' हा शब्द व्यर्थ होईल. आता कोणी म्हणेल ज्ञान झाल्यावर देहादिक कर्मे करण्यास असमर्थच होतात, तर अशा लक्षणास ज्ञान म्हणण्यापेक्षां रोगच म्हणावें हे बरें ॥२७०॥
तत्त्वबोधं क्षयव्याधिं मन्यन्ते ये महाधियः ।
तेषं प्रज्ञातिविशदा किं तेषां दुःशकं वद ॥२७१॥
अर्थ :
तत्त्वबोध हा क्षयरोग आहे असे म्हणणारे जे बुद्धिमान त्यांच्या शहाणपणाची कमाल झाली. त्यांना असाध्य काय ? ॥२७१॥
भरतादेरप्रवृत्तिः पुराणोक्तेति चेत्तदा ।
जक्षत्क्रीडन्रतिं विन्दन्नित्यश्रौषीर्न कि श्रुतिम् ॥२७२॥
अर्थ :
आता कोणी म्हणेल की, भरतादिक साधुक्रिया न करिता केवळ जडाप्रमाणें रहात असत असे पुराणांत सांगितलेले आढळतें. म्हणून अक्रिय असणें हेंच ज्ञान्याचें लक्षण. परंतु ही शंका घेणारास पुढील श्रुति अवगत असती तर अशी शंका त्याने घेतलीच नसती. "जक्षन् क्रीडन् रतिं विंदन्'' अशी श्रुति आहे तिचे तात्पर्य - ज्ञान्याने आहारविहारादि क्रीडा जरी केल्या, तरी त्या बाधक होत नाहींत. ह्या श्रुतिप्रमाणापुढे पुराणोक्तीची मातब्बरी. किती ? ॥२७२॥
न ह्याहारादि सन्त्यज्य भरताद्याः स्थिताः क्वचित् ।
काष्ठपाषाणवत्किन्तु सङ्गभीता उदासते ॥२७३॥
अर्थ :
पुराणांत जे सांगितले त्याचे तरी तात्पर्य असे की, भरतादिक साधु जे एकांती अक्रिय होऊन बसले ते केवळ लोकसंगाच्या भीतीस्तव. ते म्हणजे आहारादि अवश्य क्रिया टाकून काष्ठपाषाणाप्रमाणे उगीच बसले असे नाही. ॥२७३॥
सङ्गी हि बाध्यते लोके निःसङ्गः सुखमश्नुते ।
तेन सङ्गः परित्याज्यः सर्वदा सुखमिच्छता ॥२७४॥
अर्थ :
कारण, जगांत लोकसंसर्गाने फार दुःख होतें. निःसंग मनुष्यास सुख होतें. याकरिता सुखाची इच्छा करणाराने लोक-संसर्ग सोडून दिला पाहिजे. ॥२७४॥
अज्ञात्वा शास्त्रहृदयं मूढो वक्त्यन्यथान्यथा ।
मूर्खाणां निर्णय स्वास्तामस्मत्सिद्धान्त उच्यते ॥२७५॥
अर्थ :
शास्त्राचे हृदय न जाणता मूढ लोक पाहिजे तसे बहकतात. त्यांच्या मताशी आम्हांस काय करावयाचें आहे ? आमचा जो सिद्धांत तो आम्ही येथे सांगतो म्हणजे झाले.॥२७५॥
वैराग्यबोधोपरमाः सहायास्ते परस्परम् ।
प्रायेण सह वर्तन्ते वियुज्यन्ते क्वचित्क्वचित् ॥२७६॥
अर्थ :
वैराग्य, ज्ञान आणि उपरति ही तीनही परस्परांस साहाय्यभूत आहेत. ती बहुतकरून एकत्र मिळून असतात; परंतु केव्हा केव्हा ह्यांचा वियोगही होतो. ॥२७६॥
हेतुस्वरूपकार्याणि भिन्नान्येषामसंकरः ।
यथावदवगन्तव्यः शास्त्रार्थप्रविविच्यता ॥२७७॥
अर्थ :
ह्यापैकीं प्रत्येकाचे हेतु, स्वरूप आणि कार्ये निरनिराळी आहेत. म्हणून शास्त्रार्थाचा चांगला विचार करून बुद्धींत त्याचा संकर होऊं देऊं नये. ॥२७७॥
दोषदृष्टिर्जिहासा च पुनर्भोगेष्वदीनता ।
असाधारणहेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोऽप्यमी ॥२७८॥
अर्थ :
विषयाविषयी जी दोषदृष्टि तीच वैराग्याला हेतु म्हणजे कारण होय., त्याविषयी जी त्यागबुद्धि ते त्याचे स्वरूप, आणि पुनः त्याच्या भोगाविषयीं जी अप्रवृत्ति ते त्याचे कार्य म्हणजे फळ होय. ॥२७८॥
श्रवणादित्रयं तद्वत्तत्त्वमित्थाविवेचनम् ।
पुनर्ग्रन्थेरनुदयो बोधस्येते त्रयो मताः ॥२७९॥
अर्थ :
त्याचप्रमाणे ज्ञानालाही ही तीन आहेत. श्रवण, मनन आणि निदिध्यास ही तिन्ही मिळून ज्ञानास हेतु आहेत. तत्त्व-मिथ्या-विवेचन हे ज्ञानाचे स्वरूप, आणि एकदा ग्रंथिभेद झाल्यावर पुनः तिचा उदय न होणे हेंच त्याचे कार्य. ॥७९॥
यमादिर्धीनिरोधश्च व्यवहारस्य संक्षयः ।
स्युर्हेत्वाद्या उपरतेरित्यसंकर ईरितः ॥२८०॥
अर्थ :
तशींच यमनियमादिक जी योगाची साधने ती उपरतीचे हेतु. चित्ताचा निरोध म्हणजे कोंडणे हे तिचे स्वरूप आणि व्यवहाराचा लोप हे तिचे कार्य. ह्याप्रमाणें पृथक पृथक जाणावें ॥२८०॥
तत्त्वबोधः प्रधानं स्यात्साक्षान्मोक्ष प्रदत्वतः ।
बोधोपकारिणावेतौ वैराग्योपरमावुभौ ॥२८१॥
अर्थ :
या तिहींमध्यें तत्त्वज्ञानं हे मुख्य समजावे. कारण, त्यापासून प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ति होते, आणि इतर दोन म्हणजे वैराग्य आणि उपरति ही केवळ तत्त्वज्ञानास साहाय्य करतात; म्हणून त्यांस प्राधान्य देता येत नाही. ॥८१॥
त्रयोऽप्यत्यन्तपक्वाश्चेन्महतस्तपसः फलम् ।
दुरितेन क्वचित्किंचित्कदाचित्प्रतिबध्यते ॥२८२॥
अर्थ :
कोणा पुरुषाचेठायी ही तीन्ही पूर्णपणें असतील, तर ते मोठ्या तपाचे फळ समजले पाहिजे. केव्हा केव्हा कित्येकांमध्ये ह्यांपैकी एका गोष्टीची उणीव असते त्याला पूर्वजन्मीचे पातकच कारण. ॥८२॥
वैराग्योपरती पूर्णे बोधस्तु प्रतिबध्यते ।
यस्य तस्य न मोक्षोऽस्ति पुण्यलोकस्तपोबलात् ॥२८३॥
अर्थ :
वैराग आणि उपरति ही दोन साधने ज्या पुरुषाचे ठायी पर्णूपणें आहेत, परंतु ज्ञानाची मात्र उणीव आहे, अशा पुरुषाला मोक्षप्राप्ति होत नाही. त्याला तपोबलाने पुण्यलोकाची प्राप्ति मात्र होते. ॥८३॥
पूर्णे बोधे तदन्यौ द्वौ प्रतिबद्धौ यदा तदा ।
मोक्षो विनिश्चितः किन्तु दृष्टदुःखं न नश्यति ॥२८४॥
अर्थ :
आता याच्या उलट ज्या पुरुषाचे ठायी तत्त्वज्ञान मात्र पूर्ण आहे, परंतु दुसऱ्या दोन साधनांची उणीव आहे, त्याला मोक्षप्राप्ति खचित आहे. जीवमुक्तिसुख मात्र मिळत नाही. ॥८४॥
ब्रह्मलोकतृणीकारो वैराग्यस्यावधिर्मतः ।
देहात्मवत्परात्मत्वदार्ढ्ये बोधः समाप्यते ॥२८५॥
अर्थ :
आता तिहींची पूर्णता सांगतो. ब्रह्मलोकही तुच्छ वाटावा म्हणजे वैराग्याची कमाल झाली. अज्ञातकाळीं मी देह ही बुद्धि जशी दृढ असते, तशीच मी ब्रह्म ही बुद्धि दृढ व्हावी म्हणजे ज्ञानाची पूर्णता झाली. ॥८५॥
सुप्तिवद्विस्मृतिः सीमा भवेदुपरमस्य हि ।
दिशानया विनिश्चेयं तारतम्यमवान्तरम् ॥२८६॥
अर्थ :
आणि निद्रे इतकी विस्मृति झाली म्हणजे उपरमाची सीमा झाली. या दिग्दर्शनावरून बाकीचे तारतम्य समजावे. ॥२८६॥
आरब्धकर्मनानात्वाद्बुद्धानामन्यथान्यथा ।
वर्तनन्तेन शास्त्रार्थे भ्रमितव्यं न पण्डितैः ॥२८७॥
अर्थ :
प्रारब्ध कर्मे नानाप्रकारचीं असल्यामुळे तत्त्वज्ञान्याचीं आचरणेंही निरनिराळी दृष्टीस पडसात. म्हणून शास्त्रार्थ चांगला न जाणता पंडितांनी व्यर्थ भ्रमांत राहू नये. ॥२८७॥
स्वस्वकर्मानुसारेण वर्ततन्तां ते यथा तथा ।
अविशिष्टः सर्वबोधः समा मुक्तिरिति स्थितिः ॥२८८॥
अर्थ :
आपापल्या कर्मानुसारेंकरून ज्ञान्याचे वर्तन निराळे असलें, तरा त्या सर्वांमध्ये असणारें आत्मज्ञान एकच आहे. म्हणून सर्वांस मुक्ति ही सारखीच मिळते. ॥२८८॥
जगच्चित्रं स्वचैतन्ये पटे चित्रमिवार्पितम् ।
मायया तदपेक्षैव चैतन्ये परिशिष्यताम् ॥२८९॥
अर्थ :
आपल्या स्वरूपाचेठायी पटावर चित्र काढल्याप्रमाणे हे जगद्रूप चित्र मायेने काढलें आहे, त्याची उपेक्षा करून बाकी राहिलेलें चैतन्य पहावे. ॥२८९॥
चित्रदीपमिमं नित्यं येऽनुसन्दधते बुधाः ।
पश्यन्तोऽपि जगच्चित्रं ते मुह्यन्ति न पूर्ववत् ॥२९०॥
अर्थ :
इति चित्रदीपोनाम षष्ठः परिच्छेदः ॥६॥
अर्थ :
आता या प्रकरणाची फलश्रुति सांगून हा विषय आटपतो. जो मनुष्य या चित्रदीपाचें नित्य अनुसंधान करील त्यास हे जगच्चित्र दिसत असूनही पहिल्याप्रमाणे तो भ्रमांत पडणार नाही ॥२९०॥
अर्थ :
श्रीशंकरार्पणमस्तु ॥
चित्रदीपः समाप्त ।
