॥ श्रीएकनाथमहाराजकृत
17.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय सतरावा ॥
सहस्रार्जुनाचा वध व शिवधनुष्याची पूर्वकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
राजा व राजपुत्र यांच्याशी युद्ध व त्यांचा निःपात -
परशुराम पाहे दुरून । निर्नायकी दिसे सैन्य ।
राजा नाही आला आपण । राजपुत्र पूर्ण देखिले ॥१॥
रायाचे राजसुत । शोधोनि मारावे समस्त ।
हे मातेची आज्ञा समर्थ । तो मी कार्यार्थ साधीन ॥२॥
केला त्र्यंबकाचा टणत्कार । नादें मूर्छित झाले सुर ।
दुमदुमले गिरिकंदर । राजकुमार धाकिन्नले ॥३॥
धाके दचकला प्रधान । उभा ठेला धैर्य धरून ।
सैन्यें उभ्या उभ्या सांडीती प्राण । टणत्कारे पूर्ण नभ कोंदलें ॥४॥
बाण सोडिला सिंहमुख । तेणे गज मारिले निःशेष ।
रथांचे छेदोनि आंख । वाजीचीं मस्तकें फोडिली ॥५॥
बाणपिसारा सुटला वारा । कोटी कोटी रहंवरा ।
उडवोनि नेले अंबरा । वरिल्या वीरा आवर्तु ॥६॥
वरील वीर तळी पडत । तळी धुरा चूर होत ।
रथ अंगभारे आदळत । तेणे पीठ होत शूरांचें ॥७॥
बाण सोडिले संपूर्ण । आवर्तीं पडिले सैन्य ।
जो जिकडे सरे चुकवोन । तिकडेच बाण खडतरती ॥८॥
धाके धाके घायाबेणें । आडवी वोडवती वोडणें ।
वोडणें फोडोनियां बाणे । सर्वांग स्ंपूर्ण भेदिले ॥९॥
रामे मांडिली रणकळी । शिरांची केली चेंडुफळी ।
राजे मारिले अतुर्बळी । रुधिरांजुळी प्राशिती भूते ॥१०॥
सैन्य देखोनि महामार । खळबळिले राजकुमर ।
प्रधान धांविन्नले समोर । अतिदुर्धर निजयोत्रें ॥११॥
बाणांचिया झडाडा । प्रधान उडविला रोकडा ।
नेऊन टाकिलां रायापुढा । मस्तकी तडा पडोनि मेला ॥१२॥
चंड आणि प्रचंड । तिही युद्ध केले वितंड ।
त्यांचे छेदोनियां बाहुदंड । दोहींचें मुंड पाडिलें ॥१३॥
दोघे पाडिले अति दुर्धर । रणी उठिला हाहाकार ।
हाक दैत्यांचे छेदी वक्त्र । वीरे वीर आटिले ॥१४॥
मग लक्षिले राजकुमर । तेही चालिले अति दुर्धर ।
युद्ध चाले घोरांदर । शस्त्रास्त्रलाघवें ॥१५॥
बाणे बाणांते तोडित । शत्रे शत्रांतें झोडित ।
अस्त्रे अस्त्रांते मोडित । मग ओढित निर्वाणशस्त्रें ॥१६॥
रामे छेदिले त्यांचे रथ । सारथी मारिले शातानुशत ।
वीर मारोनियां तेथ । अवघे विरथ रणी केले ॥१७॥
अंतकांतक अर्धचेंद्रें । निःशेष छेदिली त्यांची शस्त्रे ।
सचेंचि निवटिलीं शिरें । अवनी रिधिर प्रवाहे ॥१८॥
राजपुत्र पडता क्षिती । पडल्या वीरांच्या पांथी ।
रामे रणी लाविली ख्याती । केली शांति सर्वांची ॥१९॥
रणांगणा जे जे आले । ते ते निःशेष निर्दाळिले ।
बोंब सांगावया नाही उरले । रामे केले निक्षत्री ॥२०॥
अश्व गज रथ पदपदाती अतिरथी महारथी । जे जे आले युद्धाप्रती ।
त्यांची समूळ शांति । भार्गवे केली ॥२१॥
राजाची उद्विग्नता :
प्रधान पाडिला राजभवनीं । पुत्र पादिले रणांगणी ।
राजा क्षोभला ऐकोनी । युद्धालागोनि उठवला ॥२२॥
सैन्य निमाले समस्त । उरले पार्षद पाच शत ।
राजा एकाकी युद्धार्थ । बैसला त्वरित रथावरी ॥२३॥
राजा मनी करी विचार । म्या गाई ब्राह्मणां लाविले शस्त्र ।
तेणे मी जाहलो अपयशःपात्र । आता करां क्षात्र क्षात्रधर्मे ॥२४॥
दावीन क्षात्रधर्म रणी । परशुराम त्रासीन बाणी ।
कटाक्षें बिडेन रणांगणी । निजनिर्वाणीं युद्धार्थीं ॥२५॥
तो सूड मागेल पित्याचा । मी सूड घेईन पुत्रांचा ।
पाहो पराक्रम दोहींचा । गर्जोनि वाचा उठावला ॥२६॥
परशुरामाकडून राजाचा धिःकार :
परशुराम सतेज बोले । जेवोनियां घर घेतलें ।
ते तुवांचि दुष्टा साच केले । निर्वैरा मारिले जमदग्नी ॥२७॥
जमदग्नीनें सांदिला कोप । त्यावरी त्वा केला प्रताप ।
वृथा करिसी बळाचा जल्प । तू अति अल्प लघुत्वें ॥२८॥
स्त्रियावरी तुज पुरुषार्थ । माझी माता पडली मूर्छित ।
तो तू सांपडलासी येथे । तुज निःपात मी करीन ॥२९॥
दोघांचे युद्ध :
ऐसा ऐकता वचनपुंज ।कोपें चालिला सहस्रभुज ।
त्यावरी लोटला द्विभुज । धरावया गज केसरी जैसा ॥३०॥
जमदग्नीचा अति क्रोध । होता परशुरामीं प्रसिद्ध ।
तो खवळला अति विरुद्ध । रायाचा कंडू छेदावया ॥३१॥
कोपे धनुष्या वाहिला गुण । काधिले अति तीक्ष्ण बाण ।
सरसावला सहस्रार्जुन । युद्ध दारुण मांदिलें ॥३२॥
दोहींचे बाण तिखट । बळे पिच्छांचा झुंझाट ।
गगनी बाणांचा खणखणाट । हव्यवाट उठिला ॥३३॥
बाणे बाणातें निवारी । शस्त्रे शस्त्रातें संहारी ।
अस्त्र अस्त्राते स्वये वारी । शस्त्रास्त्रीं प्रवीण ॥३४॥
सहस्र भुजांचा धनुर्वाड । द्विभुजें लाविलेला वेढा ।
बाणांचिया झडाडां । कांही कैवाडा स्मरेना ॥३५॥
त्याचि लाघवामाजि देख । रामे रथाचा चेदिला आंख ।
सारथि मारिला निःशेष । वारू अमोलिक पाडिले रणी ॥३६॥
मागूनियां रथांची भरनी । तेही वीर छेदिले रामे बाणी ।
साहाय्यकारी नाहींकोणी । एकला रणी उरे राव ॥३७॥
अस्त्रांनी द्वंद्वयुद्ध :
विरथी राजा उरे आपण । क्रोधे मांडिले निर्वाण ।
अस्त्रे अनिवार योजून । त्यांचे निवारण नेणती कोणी ॥३८॥
दंडास्त्र आणि चंदास्त्र । सवेंचि सोडिले प्रचंडास्त्र ।
वेगे मोकली वितंडास्त्र । घोर घोरास्त्र अनिवार ॥३९॥
देखोनि शस्त्रांचा संभार । रामनेटका धनुर्धर ।
शस्त्रे शस्त्रांचा संहार । करी तो प्रकार अवधारा ॥४०॥
दंडें दंडिले दंडास्त्रा । खंडे खंडिले खंडास्त्रा ।
चंडें छेदिलें प्रचंडास्त्रा । छेदिलें घोरास्त्र अघोरास्त्रें ॥४१॥
निर्वाणास्त्रें समस्त । रामे केली वाताहत ।
मग अनिवार अति अत्यंत । ते चामुंडास्त्र घेतलें राये ॥४२॥
पूर्वी मर्दिले चंडमुंडासी । ते चामुंडास्त्र हातवसी ।
राम आव्हानी काळिकेसी । चामुंडा दासी तियेची ॥४३॥
चामुंडेचे माघारी येणे :
चामुंडेसी म्हणे काळिका । माझे स्वरूप ते रेणुका ।
तिच्या पतीच्या घातका । तू आवश्यक निर्दाळी ॥४४॥
चामुंडा काळिकेची दासी । हे सत्य न मानेल ज्यासी ।
तिही पहावे शप्तशतीसी । चंडमुंडांसी हेथें वधिले ॥४५॥
काळिकेसी करोनिया नमन । घेवोनि तिचे आज्ञापन ।
चामुंडा परतली आपण । करावया निर्दळण रायाचे ॥४६॥
चामुंडा वळली उफराटी । सहस्रार्जुन देखे चृष्टीं ।
माझी अस्त्रे लागतीं मजचिपाठीं । धाके पोटी गजबजिला ॥४७॥
चामुंडेचें निवारण । माझे मी नेणे आपण ।
अवश्य मज आले मरण । धाके संपूर्ण कांपत ॥४८॥
रामे त्याचि क्षणामाझारीं । परशु घेवोनि करी ।
सहस्र बाहूंची कांडोरी । धरणीवरी पाडिलीं ॥४९॥
सहस्रार्जुनाचा वध, परशुरामस्तवन :
साधोनि निर्वाणीचा आवो । मग मस्तकी घालता घावो ।
तेणे घाये महाबाहो । पडिला पहा हो क्षितितळीं ॥५०॥
शिर उडालें अंतराळीं । जीवे परशुरामासी ओंवाळी ।
मग उतरले पायांजवळी । चरणाची धूळी वंदावया ॥५१॥
सद्भावे आदरिली स्तुती । मी गोब्राह्मण परमघाती।
त्या मज शस्त्रधारातीर्थीं । पापनिष्कृती निजकरें केली ॥५२॥
छेदिला सहस्रभुजांचा भार । छेदिला माझा अहंकार ।
छेदिला वासनासंभार । जीवोद्धार तुवा केला ॥५३॥
छेदिलें माझे कर्माकर्म । छेदिले माझे धर्माधर्म ।
छेदोनि माझा मोहभ्रम । ब्रह्म परम मज केले ॥५४॥
छेदिले माझे नांवरूप । छेदिलें माझे पुण्यपाप ।
छेदूनिया संकल्पविकल्प । ब्रह्म निर्विकल्प मज केले ॥५५॥
छेदिलें अहंसोहंपण । निःशेष छेदिले मीपण ।
छेदोनि एकत्वाचें एकपण । ब्रह्म परिपूर्ण मज केले ॥५६॥
ऐसे करिती स्तवन । प्रेमे पूर्ण जाले नयन ।
मस्तकी वंदूनि चरण । सांडिला प्राण सहस्रार्जुने ॥५७॥
मातेचि आज्ञा अति सधर । पहिले छेदावे सहस्रकर ।
मग छेदावें त्याचे शिर । तोचि प्रकार रामे केला ॥५८॥
सहस्रार्जुन पडिला रणक्षेत्रीं । सवेंचि तीन सप्तकें धरित्री ।
परशुरामे केली निःक्षत्री । आज्ञेवरी मातेच्या ॥५९॥
एकाजनार्दना शरण । जाले रेणुकापुराण ।
आता जानकीचे लग्न । सावधान अवधारा ॥६०॥
सांगता धनुष्यप्रकरण । प्रसम्गें आले रेणूकाआख्यान ।
कथेंसी जाले विलक्षण । श्रोती संपूर्ण क्षमा कीजे ॥६१॥
परशुरामाचे मिथिलेला आगमन :
रामे निःक्षत्री पृथ्वी करिता । मिथुळेसी आला अवचितां ।
ऋषिवृंदासी होय पुसता । येथे राज्यकर्ता कोण होय ॥६२॥
ऋषि सांगती परशुरामा । हा चक्रवर्ती धर्मात्मा ।
देही असोनि विदेहीधर्मा । अगाध महिमा पै याचा ॥६३॥
जनकाकडून सत्कार :
ऐसे ब्राह्मण बोलिले उत्तर । तंव जनक सामोरा आला सत्वर ।
आलिंगोनी परमादर । रामासहित ऋषीश्वर गृहा नेले ॥६४॥
जनक राजा ब्रह्माधिकारी । परशुराम त्याते न मारी ।
एकात्मता प्रीतीकरीं । त्याचे घरी राहिला ॥६५॥
जनकें परशुरामासी । राहविलें भोजनासी ।
रामासवें अपार ऋषी । जनकें त्यांसी निमंत्रिलें ॥६६॥
रामे ठेवोनि धनुष्यबाण । स्वये केले संध्यास्नान ।
भीतरी करावया भोजन । ऋषिपंक्ति पूर्ण बैसली ॥६७॥
भोजनाचे वर्णन :
ताटें वाढिलीं चोखंडी । अवघ्या रसां एकचि गोडी ।
जनकें अत्यंत आवडी । केली परवडी भृगुवर्या ॥६८॥
ते देखतांचि परिपक्वान्न । देखणे देखती निजनयन ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । समरसे लोचन सुखी जाले ॥६९॥
स्वानंदी भोजना देता मिठी । शब्दी निःशब्दता श्रवनीं उठी ।
तेणे भवणाचिये पोटी । सुखसंतुशाह्टी स्वानंदे ॥७०॥
यापरी पक्वान्नाचा वास । सबाह्य समरसीं परेश ।
तो येतांचि सुवास । सुखउल्लास घ्राणासी ॥७१॥
ते सदन्न स्पर्शतां । हाता आली अकर्मात्मता ।
क्षुधा तृषा नित्यतृप्तता । क्रिया चित्सत्ता । स्वये जाली ॥७२॥
तो सेवितांचि रसास्वाद । रसनेमाजि निजानंद ।
उदरी कोंदला परमानंद । सबाह्य स्वानंद रसास्वादीं ॥७३॥
ऐसे करिता भोजन । मने मनचि उन्मन ।
समाधीसी समाधान । अन्नचि चैतन्य स्वये जाले ॥७४॥
सकळ साधनेंसी वरी लवण । तंव तृप्ति जाली संपूर्ण ।
श्रीरामाचे पंक्तीस जे भोजन । अपूर्णपण असेना ॥७५॥
यापरी स्वये तृप्त जाले । स्वयेंचि संसारा आंचवले ।
तृप्तिसुखें सुखी जाले । स्वस्थ राहिले स्वस्थानीं ॥७६॥
तांबूलवर्णन :
फळाशा फोडोनियां फोडी । वासनाशि=रा काढोनि बुडी ।
शांतिपरिपक्वा पानाची विडी । स्वलीला तोंडे घातली ॥७७॥
जाळूनि अहंकार कथिणपणा । सोहं गाळींव शुद्ध चुना ।
लागोनि शांतिपरिपक्व पाना । तांबूलस्वादना सुस्वादु ॥७८॥
सर्व साराचे निजसार । तेंचि सेविती खदिरसार ।
श्रीरंगरंगाकार । अति पवित्र तांबूल ॥७९॥
अर्पिले सुमन चंदन । दीपावली नीरांजन ।
यथोक्त करिता पूजन । सुखसंपन्न भार्गव ॥८०॥
सीता शिवधनुष्याचा घोडा घोडा करून खेळते :
परशुरामाचा निजमेढा । सीतेने स्वये करोनि घोडा ।
सीताचा करोनि वोढा । बाणाचा गाधा जाणा केला ॥८१॥
त्या धनुष्यावरी बैसोनी । गोढा नाचवी राजांगणीं ।
स्वेच्छा क्रीडे राजभवनीं । राजविंदीतूनि धांवडी ॥८२॥
ठेविले ठायी धनुष्यबाण । राम न देखे आपण ।
मग रायावरी कोपायमान । काय वद्चन बोलिला ॥८३॥
माझ्या धनुष्याची चोरी करी । ऐसा बळिया कोण क्षत्री ।
तुवा लपविला आहे घरी । तो झडकरी मज दावी ॥८५॥
ऐकोनि क्रूर रामवचन । राजा जनक कंपायमान ।
आजि मज आले पूर्ण विघ्न । राम क्षत्रघ्न कोपला ॥८६॥
राजा त्या धनुष्याचा लाग । स्वये गिवसू लागला चांग ।
राजांगणी देखोनि रेघ । तोचि माग घेत आला ॥८७॥
तंव धनुष्याचा करोनि घोडा । सीता खेळता देखे पुढा ।
राजबिंदी घेतला दवडा । बालक्रीडा क्रीडत ॥८८॥
राजा म्हणे अगे कुवारी । हा त्वा अन्याय केला भारी ।
ते धनुष्य सांडी क्षितीवर । ते राया करी उचलेना ॥८९॥
मग राजा अति प्रीतीकरीं । सीतेते पोटासीं धरी ।
म्हणे बैस या घोड्यावरी । ते हरिखें वरी बैसली ॥९०॥
सीतेचा विक्रम पाहून परशुरामास परमाश्चर्य :
करोनि धनुष्याचा घोडा । नाचवीत तडातडां ।
आली परशुरामापुढां । देखोनि गाढा तो विस्मित ॥९१॥
तो म्हणे ही आदिशक्ती । आणिकां धनुष्य नुचले हाती ।
इसी आदिपुरुष होईल पती । आणिकासी प्राप्ती नव्हे इचे ॥९२॥
राम रायासी पुसे विचार । इसी कोण नेमिला वर ।
तो म्हणे नाही केला निर्धार । इचें स्वयंवर करणे आहे ॥९३॥
परशुराम म्हणे रायासी । स्वयंवर करनें सीतेसी ।
मी सांगेन त्या प्रकारासी । जो सर्वांसी दुर्घट ॥९४॥
हे आदिईश्वरीचा अवतार । आदिपुरुष इसी वर ।
मी सांगेन तो पणप्रकार । तो सादर अवधारी ॥९५॥
स्वयंवरीं हाचि पण । जो या धनुष्यासी वाहील गुण ।
त्यासीच द्यावी हे आपण । आज्ञा संपूर्ण ब्घार्गवाची ॥९६॥
तेणे सीतेच्या स्वयंवरासी । धनुष्य ठेविले जनकापासी ।
जेणे धनुष्यें त्रिपुरासी । एके बाणेंसी छेदिलें ॥९७॥
शिवे येणेंचि धनुष्येंसी । विध्वंसिले दक्षयागासी ।
पळवूनी सुरनरऋषी । यज्ञभंगासी पै केले ॥९८॥
हेंचि शिवचाप घेवोनि करी । एकवीस वेळा निःक्षत्री ।
परशुरामे केली धरित्री । ते हे स्वयंवरीं ठेविले चाप ॥९९॥
हे धनुष्याची मूलवार्ता । अतिशयेंसीं रसाळ कथा ।
शतानंद जाला साम्गतां । ऐकोनि समस्ता आश्चर्य ॥१००॥
आता जनकाच्या निजघरीं । स्वयंवरसभेची परी ।
जे महासभेमाझारी । रामप्रतापथोरी धनुर्भंगें ॥१॥
त्या स्वयंवराचें निरूपण ।रसाळ कथेचे गोडपण ।
एकाजनार्दना शरण । श्रोते सज्ञान अवधान देत ॥२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
चापनिरूपणं नाम सप्तदशोध्यायः ॥१७॥
॥ ओव्या १०२ ॥
