रीघ नाही कोणा पाहुं
913.
रीघ नाही कोणा पाहुं आले जना । फिटले पारणा लोचनाचे ॥१॥
नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव दाविताती ॥२॥
स्तुति करीशेष न वर्णवें वेदांसी । स्तवन विरिंची करीतसे ॥३॥
करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी त्यासी न्हाणिताती ॥४॥
नीति नाही गुण विश्वाचा जनिता । तयाचिया माथा पाणी घाली ॥५॥
घाली तेल माथा माखील ते टाळू । दीनाचा दयाळू कुर्वाळिती ॥६॥
तीर्थे वास करिती जयचिये चरणी । पायांवरी न्हाणी त्यासी माता ॥७॥
लाउनी पालव रामासी पुसिले । वेगी फुंकियेले कान दोन्ही ॥८॥
दोघांदोहीकडे सिद्धि बुद्धि जाणा । घातिले पाळणां रामराजा ॥९॥
त्यांनी धणीवरी गाईला पाळणा । एका जनार्दनी पहुडविले ॥१०॥
