देव पाहो देव पाहो ।
1887.
देव पाहो देव पाहो । उंचे ठायी उभे राहो ॥१॥
देव देखिला देव देखिला । तो नाही कोणा भ्याला ॥धृपद॥
देवासी काही मागो मागो । जीव भाव त्यासी सांगो ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
देव कातर देव कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥
अर्थ :
आपण देव पाहू, आणि देव पाहण्याकरिता निष्काम कर्म, निष्काम भक्ती, विवेक, वैराग्य, शमादिषटक, जिज्ञासुत्व, गुरुशरणागती आणि महावाक्यश्रवण अशा क्रमाने अधिकाराची उंची वाढवून त्यावर आपण उभे राहू. ज्याने आत्मत्वाने देव बघितला, तो कोणालाही भीत नाही. कारण, त्याच्या दृष्टीने स्वभिन्न, स्वविरोधी, स्वपेक्षा बलवान कोणी राहात नाही. देवाला आपण काहीतरी मागावे, आणि आपल्या मनातील भाव त्याला सांगावा. देव भक्तांच्या मनातील जाणतो ; आणि गूढ इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव हा मायेत लपून अंगचोरपणा करतो. म्हणून त्याचे अभ्यंतर कोणाला कळत नाही.
