वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › २२. दंडकवनाची उत्पत्ती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088308 · अभंग क्र. २२

22.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बाविसावा ॥
रावणाची सुटका

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची दुर्दशा :

माहिष्मतीनामें नगरी । तेथे सहस्त्रार्जुन राज्य करी ।
तयाचे बंदीं श्रीराघवारी । कित्येक दिवस पडियेला ॥१॥
श्वानावाणी शूकरावाणी । जाई मार्गे खरावाणी ।
दाही शिरी वाहे पाणी । अनालागोनी रावण ॥२॥
ऐसा कित्येक दिवसपर्यंत । माहिष्मतीनगरी भीक मागत ।
विसांहाती कांती सूत । उदरार्थ दशानन ॥३॥
तंव येरीकडे प्रहस्त प्रधान । पौलस्तिमुनीसी स्वर्गी जाऊन ।
सांगितले स्वामी रावणालागून । सहस्त्रार्जुने बंधन केले ॥४॥
माहिष्मतीनगराआंत । रावण असे भीक मागत ।
नगराबाहेर येवो नेदित । कोंडोनि तेथ राखिला ॥५॥

रावणाचा पिता माहिष्मतीला निघाला :

ऐकोनि रावणासि बंधन । कोपे खवळला ब्रह्मनंदन ।
पुत्रस्नेहें कळवळोन । वायुवेगें चालिला ॥६॥
मनोवेग सांडोनि मागे । त्वरे चालिला बहुत रागे ।
माहिष्मतीप्रांतास वेगे । येवोनि नगर देखिले ॥७॥
दूरोनि देखिली नगरी । जैसी इंद्राची अमरापुरी ।
जेथे अर्जुन वसे महाक्षत्री । सहपरिवारी मिळोनी ॥८॥
नगरी नाही दुःखदैन्य । नगरी नाहींत दरिद्री जन ।
लोक वसती धार्मिक संपन्न । स्वप्नी अधर्म पै नाही ॥९॥
पौलस्ति ब्रह्मयाचा नंदन । तपस्तेजें देदीप्यमान ।
जैसा गगनी सहस्त्रकिरण । पुरी प्रवेश पै केला ॥१०॥
आला महाद्वारासंमुख । द्वारपाळां जाणवी मुनिटिळक ।
म्हणे रायासि सांगा आवश्यक । पौलस्ति ऋषि आलासे ॥११॥
द्वाररक्षकें नृपनथा । जाणविली ते व्यवस्था ।
म्हणे राया पुलस्ति तत्वता । आला असे महाद्वारी ॥१२॥

पौलस्तीचा अर्जुनाकडून सत्कार :

द्वारपाळमुखें वचन । राये ऐकोनि तेचि क्षण ।
पाचारोनि पुरोहित ब्राह्मण । सर्व आमोग्रीसीं निघाला ॥१३॥
सवे पूजेचा संभार । राये जोडोनि दोन्ही कर ।
निघालासे ऋषीसमोर । अति नम्र होवोनी ॥१४॥
पुढे पुरोहित मागे नृपती । शीघ्र आले ऋषीपती ।
साष्टांगें नमूनि पुलस्ती । मग पूजा पै केली ॥१५॥
ब्राह्मणा दिधले गोदान । मंगलतुरें वाद्ये लावून ।
पुढे पुलस्ति मुनि करुन । राजमंदिरीं प्रवेशला ॥१६॥
पुनरपि मंदिरी मागुतीं । पूजा केली अति निगुतीं ।
स्नाने करवोनि पिप्रपंक्ती । समस्ता भोजन पै झाले ॥१७॥
हात जोडोनि पुलस्तीप्रती । अर्जुन करीतसे विनंती ।
म्हणे स्वामी तुम्ही आलेती । म्हणोनि चरणांप्रती लागला ॥१८॥
आजि माझे सफळ जन्म । आजि माझे सफळ कर्म ।
आजि माझे सफळ धाम । स्वामीनें आगमन पै केले ॥१९॥
आजि माझी सफळ नगरी । आजि मी सफळ संसारी ।
तुम्ही आलेति येथवरी । जे नाना तपीं न भेटा ॥२०॥
राजा म्हणे ऋषीप्रती । हे राज्य ऐश्वर्य पुत्र संपत्ती ।
सर्व स्वामीचेनि निश्चिती । मी आज्ञाधार किंकर ॥२१॥
ऐकोनि रायाचे धर्मवचन । नगरी देखोनि सज्जन जन ।
काय बोलिला ब्राह्मण । ते सावधान अवधारिजे ॥२२॥
मुनि म्हणे नृपसत्तमासी । राया कमळनयना परियेसी ।
तुझ्या तुळणे न पावती रविशशी । पराक्रमियांमाजि पंचानन ॥२३॥
ऐक राया सावधान । तुझ्या पराक्रमासि ठेंगणे गगन ।
यक्ष गंधर्व सिद्ध चारण । आज्ञाधारक जयाचे ॥२४॥
जेणे वरदबळें सृष्टी जाण । जिंतिले सकळही नृपगण ।
जयाचे बंदी सुरगण । इंद्र आदिकरोनियां ॥२५॥
ऐसा पराक्रमी दशानन । तुवा जिंतिला न लागता क्षण ।
तुझी कीर्ति मी ऐकोन । तुझिये भेटीस पै आलो ॥२६॥

पौलस्तीच्या मागणीप्रमाणे अर्जुनाने रावणाला मुक्त केले :

माझे मागणें नाही अर्थ । माझे मागणें एक लंकानाथ ।
तो द्यावा मजलागी त्वरित । उदार चित्त करोनिया ॥२७॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राये आदरे सोडिला दशानन ।
रत्नजडित मुकुट देवोन । सर्वालंकारीं शृंगारिला ॥२८॥
मैत्री करोनि रावणासीं । ब्राह्मण देव अग्नि साक्षीसीं ।
करोनि राये सोडिले त्यासी । श्रीराम ऐसी काथा झाली ॥२९॥
मग पुलस्ति मुनिवर । आलिंगून दशशिर ।
म्हणे बा रे श्रमलासि थोर । नगरी विपत्ति फार भोगूनी ॥३०॥
ऐकोनि पित्याचे वचन । लाजिला तो दशानन ।
म्हणे वाचल्याचें फळ कोण । याहूनि मरण पै भलें ॥३१॥
पुलस्तीनें यया रीती । सोडवोनि लंकापती ।
आपण गेला ब्रह्मलोकाप्रती । सावध वृत्ती करोनिया ॥३२॥
दश इंद्रियीं जो अति समर्थ । तयासि म्हणती लंकानाथ ।
तो पुलस्तीनें करोनि मुक्त । आपण ब्रह्मलोका पै गेला ॥३३॥
याउपरी तो लंकापती । मागुतेन विचरता झाला क्षिती ।
पुढे कथा वर्तली ते श्रोती । सावधवृत्ती श्रवण कीजे ॥३५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणबंधमुक्तिर्नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥ ओंव्यां ॥३५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग