जेणे हा जीव दिला दान
4022.
जेणे हा जीव दिला दान । तयाचे करीन चिंतन । जगज्जीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
जो या भीवरेच्या तिरी । कट धरूनिया करी । पाउले समचि साजिरी । अंतरी धरोनि राहेन ॥धृपद॥
जो या असुरांचा काळ । भक्तभजनप्रतिपाळ । खेळे हा लाघवे सकळ । तयाच्या भाळ पायावरी ॥२॥
जो या गोपाळांच्या मेळी । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळी स्वामी माझा ॥३॥
जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगी सकळ कळा । जयाचे गळा वैजयंतीमाळा । तया वेळोवेळा दंडवत ॥४॥
जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावे त्यासि तुका शरण ॥५॥
अर्थ :
ज्याने मला दान म्हणून हा जीव दिला आहे त्याचे मी चिंतन करीन. नारायण जगाचे जीवन आहे आणि त्याचेच गुणगान मी गाईन. जो आपले दोन्हीही कर कमरेवर धरुन भीवरेच्या तीरी उभा आहे, ज्याची साजरी अशी समचरण पाऊले आहेत त्या हरीलाच मी माझ्या अंत:करणात धरुन राहीन. जो असुरांचा काळ आहे व भक्तजणांचा सांभाळ करणारा आहे, जो मोठया कौशल्याने हा खेळ खेळत आहे त्याच्या पायावर माझे मस्तक असो. जो वनमाळी या गोपाळांच्या बरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळत आहे, त्या हरीने बळीच्या मस्तकावर पाय देऊन त्याला रसातळाला नेले व त्याच्या दाराचे रक्षण करण्याकरता तो पाताळातच राहिला. जो लावण्याचा पुतळा आहे आणि ज्याच्या अंगी सर्व कला आहेत, आणि ज्याच्या गळयामध्ये वैजयंती माळा आहेत अशा या भगवान विष्णूला वेळोवेळी माझे दंडवत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लक्ष्मी म्हणजे सर्व ऐश्वर्याची स्वामीनी ज्याची दासी आहे आणि ज्याचे नाम सर्व पापाचा नाश करते, आणि जो सर्व तेजाच्या राशी
