गौळणीचा थाट निघाला म
106.
गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । ते देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगी ॥१॥
कान्हयां सरसर परता नको आरुता येऊ । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ ॥धृ.॥
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊ दे रे हरी । बहु वेळ लागता सासु सासरे कोपतील घरी ॥२॥
आम्ही बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथे । हृदयमंदिरी ठेऊनी तुंते जाऊ मथुरांपथें ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
