हे नव्हे आजिकालिचे ।
41.
हे नव्हे आजिकालिचे । युगे अठ्ठाविसांचे ।
मज निर्धारिता साचे । हा मृत्युलोकुचि नव्हे ।
हाचि मानी रे निर्धारु । येर सांडि रे विचारु ।
जरी तु पाहासी पराप्तरु । तरी तु जाये पंढरीये ॥१॥
बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी ।
भक्त पुंडलिकाचे द्वारी । कर कटावरी राहिला ॥२॥
काशी अयोध्या अवंती । कांची मथुरा माया गोमती ।
ऐसी तीर्थे इत्यादिके आहेती । परि सरी न पवती ये पंढरी ॥३॥
हाचि मानि रे विश्र्वासु । येर सांडी रे हव्यासु ।
जरि तू पाहासी वैकुंठवासु । तरि तू जाये पंढरिये ॥४॥
आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा ।
पैलथडीये परमात्मा । मध्ये राहिला पुंडलीक ॥५॥
या तिहींचे दरुशन । प्राण्या नाही जन्ममरण ।
पुनरपि आगमन । येथे बोलिलेंचि नाही ॥६॥
पंढरी म्हणजे भूवैकुंठ । ब्रम्ह तंव उभेचि दिसताहे नीट ।
या हरिदासांसी वाळवंट । जागरणासी दिधले ॥७॥
म्हणोनि करा करा रे क्षीरापति । नटा नटा कीर्तन वृत्ति ।
ते नर मोक्षाते पावती । ऐसे बोलती सुरनर ॥८॥
हे चोविसा मूर्तीचे उद्धरण । शिवसहस्त्र नामासी गहन ।
हेचि हरिहराचे चिंतन । विश्र्ववंद्य हे मूर्तीते ॥९॥
तो हा देवाधिदेव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा ।
बापरखुमादेविवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥१०॥
