अलक्षलक्षी मी लक्षी
104.
अलक्षलक्षी मी लक्षी । तेथे दिसती दोही पक्षी ।
वेदा शास्त्रा हे़ची साक्षी । चंद्रसूर्या सहित ।
मागेन स्वानुभव अंगुले । पांचा तत्त्वांचे सानुले ।
व्यर्थ इंद्रिये भोगीले । नाही रंगले संताचरणी ॥१॥
बाळछंदो बाबा बाळ छंदो । रामकृष्ण नित्य उदो ।
हृदयकळिके भावभेदो । वृत्तिसहित शरीर निंदो ।
नित्य उदो तुझाची ॥२॥
क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नी भरला ।
नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेंसी ।
दानदेगा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तू वैकुंठा ।
मुक्ति मार्गीचा चोहटा । फुकटा नेघे तया ॥३॥
पृथ्वीतळ राज्यमद । मी नेघे नेणे हेंही पद ।
रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे ।
मंत्र तीर्थयज्ञयाग । या न करि भागा भाग ।
तूंचि होऊनि सर्वांग । सर्वासंग मज देई ॥४॥
वृत्ति सहित मज लपवी । माझे मन चरणी ठेवी ।
निवृत्ति पदोंपदी गोवी तु गोसावी दीनोध्दारण ॥
सात पांच तीन मेळा । या नेघे तत्त्वांचा सोहंळा ।
रज तमाचा कंटाळा । हृदयी जिव्हाळा हरि वसो ॥५॥
श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र ।
स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वस्त्र हरी देई ।
चंद्रसूर्य महेन्द्र पदे । धृवादिकांची आनंदे ।
ते मी नेघे गा आल्हादे । तुझ्या ब्रिदे करीन घोष ॥६॥
करचरणेंसे इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायी तूंचि होती ।
मी माझी उरो नेदी कीर्ति । हे दान श्रीपति मज द्यावे ।
शांती दया क्षमा ऋध्दी । हेहि पाहाता मज उपाधी ।
तुझी या नामांची समाधी कृपानिधी मज द्यावी ॥७॥
बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला ।
अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरी ।
पुंडलिके केले रे कोडे । ते तुवा मागीतलेरे निवाडे ।
मी तुज हृदयी सांपडे । हे त्त्वा केले ज्ञानदेवा ॥८॥
बाळछंद समाप्त
