क्षुधा तृषा काही सर्
3210.
क्षुधा तृषा काही सर्वथा नाठवे । पहावया धावे कोल्हांटासी ॥१॥
कथेसी साक्षेपे पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरी कोणी नाही ॥धृपद॥
बलत्कारी जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनिया ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अर्थ :
जिथे कोल्हाटाचा खेळ असेल, तमाशा चालू असेल तिथे धावत जाईन त्यावेळी त्याला तहान भूक काहीही आठवणार नाही परंतू हरीकथेला जर आग्रहाने बोलावले तर हा जात नाही त्यावेळी म्हणतो की माझ्या घराचे रक्षण करण्याकरता कोणीही नाही त्यामुळे मला येण्यासाठी जमणार नाही. आणि त्याला बळजबरी करुन जरी हरीकथेला आणले तरी तो पाठीमागे टेकण्यासाठी लोड घेतो व लोडाला टेकून झोप घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याच्या तोंडावर थुंका कारण हा पुढे यमपुरी भोगण्यासाठीच जातो.
