वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ५, गौळणी अभंग ८५८ ते ८७०

लेकुरे नसतील काय घरो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074685 · अभंग क्र. ८६५

865.
लेकुरे नसतील काय घरोघरी काय न विये ते माया ।
परी हे दशा वेगळी नवाई हो ।
हा न ये त्या आधी जीव निघो पाहे ।
आला तरी उरो नेदी काही जाय तरी जाये डोळे तळमळिता ठाये ।
लांचावला जिऊ राहे गे बाई ये ॥१॥
तमाळनिळे चांदिणे वो वारी वोवराल आपुलीयेस बये ।
हे मूळदृष्टि पुढे रिघोनिया झाडा घेत आहे ।
येणे कान्हये कासावीस केले गे माय ॥२॥
नेणो कैसे बाळसे डौरले डोळा डोळसे ।
माजी महुरजता हे हासे भोळिवेच देखिलियाची पुरे ॥
घालूनी दृष्टीचे भुरेरे ।
मग ते हृदयी वाव रे इच्छावसे गे माये ॥३॥
थुरथुर करितु शक्ति भोळी वाचालवतु ।
मुद्गुले गुणे बोलतु गे माय ।
असावतु सावळिया प्रभा डोळसु नभाचा गाभा ।
कटी कर ठेऊनिया उभा हेचि जाण गे बाईये ॥४॥
पाहो याची नवलपरी बरवेपणाची हाऊली वरी ।
दृष्टीकर झोंबवी यासी कवण वारी ।
आम्हीच साहतो अळी परी हे चुबडी भली । रिघोनिया आड घाली ।
अंगकांती घे माये ॥५॥
पहा वो याचा खेळु आमचे ।
नासे कोपो तरी खदखदा हासे ।
जी जी बाळा म्हणो तरी रुसे वो ॥
राहो नेदी सुखे नहाये निमिष एके ।
वारा का गोडी सेविखे कान्हो दिठीचे माये ॥६॥
आता येईल म्हणोनी सांपडऊ द्वारे ।
आडऊ तव झळाळीत दिसता हे उजियेडे ।
भितरींच्या भितरी लांबा धुमाळू चाचरु ।
मांडी कामा पाडी आवारु गे माय ॥७॥
गाहाण्याचेंनी मिसे गौळणी उचंबळता हे ब्रह्मरसे वानवसे चोपसे कृष्णाचेनी ॥
मालाथून एक मोहरे देवपण धाडिले अनुरे ।
भावो की देवो बैसवाल धुरे पुसे निवृत्तिदासु ॥८॥

अर्थ :
घरोघरी काय लेकरे नाहीत? कोणी माता, आपल्या मुलांना काय प्रसवीत नाहीत? परंतु कृष्णाच्या स्वरुपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गौळण म्हणते काय सांगावे बाई हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरांत दूध, दही, लोणी, काही उरु देत नाही. परमार्थदृष्टीने देहभावही उरु देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्या सारखा होतो ग बाई. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाहाण्याच्या सवयीने घरांतून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ति त्यालाच वरते. हे श्रीकृष्णमूल आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्ववृत्तीच्या झाडा घेत आहे. किंवा घरांत काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू? या कान्हाने जीव अगदी कासावीस करुन टाकला. काय सांगावे ! या श्रीकृष्णाचे रुप ! याच्या डोळ्यांतील तेजाने आमचा डोळा चोरला जातो त्याचे भोळेपणातील हंसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून आपल्या इच्छेने आमच्या मनांत शिरुन व्यवहार करतो. भोळ्याभावाच्या शक्तिने कसा तुरतुर चालतो आहे? कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणांने बोलतो. याच्या नभाच्या गाभासारखा सांवळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे. असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे. याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टि गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहाण्याचा आळ आमचेवर आला तर तो आमचा आम्ही सहन करु. पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते. काय याचा खेळ आमच्या सर्व घरांदाराचा नाश करुन टाकतो. त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हासतो. मृदु भाषेने बाळा, असे करतोस म्हणावे तर रुसतो. सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही. त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते. असे त्याचे दृष्टित कौतुक आहे. आता हा घरांत येईल आपण त्याला घरांतच अडवून धरु असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशांने दिसतो. आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकुळ घालून आम्हालाच आवारांत अडकवल्यासारखे करतो. त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाऱ्हाणी सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत. कृष्णांच्या सौदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात. त्यांनी आपला परमात्मभाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुखभावाच्या स्थांनी बसवाल की नाही असे निवृतीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग