॥ श्रीएकनाथमहाराजकृत
21.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय एकविसावा ॥
गजेन्द्राचे आख्यान
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लंकादहनाचा परिणाम :
श्रीरामभक्तांचे महिमान । अगाध गहन अति पावन ।
हनुमंते केले लंकादहन । ओंतिली संपूर्ण सुवर्णाची॥१॥
रामभक्त करिती कंदन । ते कंदन होय सुखसंपन्न ।
ऐसे भक्तीचें महिमान । कृपा संपूर्ण रामाची ॥२॥
हनुमंते जाळिलें लंकेसी । नव्हे काळी कोळसा मसी ।
सुवर्ण ओतिलें चौपासी । पीतप्रभेसीं शोभत ॥३॥
करिता लंकेचें दहन । लंका ओतिली सुवर्ण ।
याचे मूळ मुख्य कारण । गजोपाख्यान अवधारा ॥४॥
गजेन्द्र उद्धाराचे आख्यान :
भगवंताचें कृपाळुपण । नामस्मरणाचे महिमान ।
गजेन्द्राचें उद्धरण । प्रसंगे पूर्ण सुवर्णमय लंका ॥५॥
चालता कथा रामायण । त्यामाजी गजेंद्रोद्धरण ।
लंका ओतिली सुवर्ण । ते कारण सांगेन ॥६॥
श्रीशुकांनी परिक्षितीला हे आख्यान सांगितले :
जो योगियांचा योगाग्रणी । जो ब्रह्मचर्य शिरोमणी ।
जो ज्ञानियांचा मुकुटमणीं । तो श्रीशुकमुनि सांगत ॥७॥
जो का वैराग्याचा निधी । ज्ञानविज्ञानाचा उदधी ।
जो का सद्बुद्धीची बुद्धी । तो शुक त्रिशुद्धी बोलत ॥८॥
जो पांडवकुळीं कुळदीपक । कौरवकुळीं कुळनायक ।
श्रोता परीक्षिति त्यक्तोदक । श्रवणचातक कथार्थीं ॥९॥
त्या परीक्षितीकारण । गजेंद्राचे उद्धरण ।
श्रीशुक सांगे आपण । वसतिस्थान गजांचें ॥१०॥
त्रिकूट पर्वतावर गंडकी गिरीत मोठे सरोवर आहे :
त्रिकूटनामा गिरिवर । योजने अयुद दहा सहस्त्र ।
गंडकीपासोनि क्षीरसागर । एवढा थोर पर्वत ॥११॥
जितुका पृथ्वीवरी विस्तार । तितुका उंच दश सहस्त्र ।
त्रिकूटनामा त्रिशिखर । गिरिवर शोभत ॥१२॥
नाना रत्नांचिया खाणीं । नाना धातूंचिया भरणी ।
निर्मळ जळांचिया श्रेणी । सरें पुष्करणीं तेणे भरती ॥१३॥
पर्वताचे निजमहिमान । नाना वर्णी विराजमान ।
श्वेतश्यामसुवर्णवर्ण । सोहा संपूर्ण गिरिवरा ॥१४॥
वृक्ष वल्ली लता द्रुम । सिंहव्याघ्रादि पशु प्लवंगम ।
नाना जातींचे विहंगम । ऋषिआश्रम सिद्धांचे ॥१५॥
निर्मळ जळसरोंवरे पूर्ण । नानापक्षिकुळभाषण ।
गोचमरींचें वसतिस्थान । शोभायमान पर्वत ॥१६॥
सुवर्णताम्ररौप्यखाणी । लोहो निपजे लोहपाषाणीं ।
नाना धातुप्रवाहश्रेणी । पर्वतांतूनी प्रसवती ॥१७॥
जया पर्वताची दरी । जे लागली गंडकीगिरीं ।
वने उपवनें अति साजिरी । नाना वृक्षांतरी गंभीर ॥१८॥
जे देखता उपवन । विश्रांतीतें पावे मन ।
छाया शीतळ सुगंध पवन । कोकिळाकूजन सुखकारी ॥१९॥
सर्वा ऋतूंचें एकायतन । सर्वा ऋतूंचें फळ पुष्प जाण ।
त्या वनी सदा सुखसंपन्न । क्रीडास्थान अप्सरां ॥२०॥
अमृतापरिस फळे सुस्वाद । कस्तूरीहूनि सुगंध ।
मलयानिळ सुस्वर संबद्ध । क्रीडती आनंदें अप्सरां ॥२१॥
कृष्णसारूप्यें कृष्ण भ्रमर । सुमनीं प्रवेशोनि सादर ।
आमोद सेविती सुखसार । केंवी केशर कुचुंबें ॥२२॥
वृक्ष शोभती देवतरू । पाटली पारिजातक मांदारू ।
संतानादिक कल्पतरू । वृक्षविस्तारू चंदनादि ॥२३॥
चंदन चंपक हरिचंदन । चूतवन अशोकवन ।
खर्जुरीवन तालवन । नंदनवनसम शोभे ॥२४॥
रायकेळी सोनकेळी । मघमघिती कर्पूरकर्दळी ।
घडघडित नारीकेळी । शोभा वनफळीं समवेत ॥२५॥
मधुवन विमलार्जुन । औंदुंबर अति गहन ।
तमालवृक्ष शोभायमान । बिल्ववनें साजिरी ॥२६॥
द्राक्षामंडप शोभायमान । जांबुळीवृक्ष एकसमान ।
इक्षुदंड श्वेत कृष्ण । रस उलोन स्त्रवत पै ॥२७॥
कंटकहीन बदरी रसाळी । आंवळीवृक्ष रायआंवळी ।
फणस मघमघिती फळी । मधूकवृक्षातळी फळशोभा ॥२८॥
पिचुमंद सुशीतल । सकळ व्याधि निरसी सबळ ।
गुग्गुळवृक्ष सोवन सरळ । वट पिंपळ पलाश ॥२९॥
निंबोणी नारिंगी पोफळी । रायनिंबोणीच्या हारी ।
विशाळी कपित्थवनाची नवाळी । वर्तुळफळीं परिपक्व ॥३०॥
कोरांटे जेंवी का कोविदार । वृक्षवटाहूनि थोर ।
श्वेतपीतपुष्पीं सुंदर । आणि बीजपूर मातुलुंगें ॥३१॥
सुरभिवृक्ष देवदार । भल्लातकीवृक्षविस्तार ।
इंगुदीवृक्ष अपार । फळसंभार बहुपुष्पी ॥३२॥
ऐसिया वृक्षांचिया जाती । असंख्यात नेणो किती ।
तेणे शोभा पर्वती । ऋषीं वसती मुनि सिद्ध ॥३३॥
त्या गिरिकंदराचे ठायी । एक अगाध सरोवर पाही ।
तेथींच्या जळा मर्यादा नाही । पूर्णत्व ठायी परिपूर्ण ॥३४॥
न्यूनपूर्णता जळीं । असेनाचि कोणे काळी ।
रातोत्पळी सीतोत्पळीं । हेमकमळी शोभत ॥३५॥
कुमुदे कल्हारें नीलोत्पळें । मल्लिका शतपत्रें कुड्भळे ।
जळचांचल्यें चलत्कमळें । जळ परिमळे स्वादिष्ठ ॥३६॥
समस्त ऋतु एकाकाळे । सुपुष्पित सदा फळे ।
सरोवरींचेनि जळे । क्रीडती सकळे जळचरें ॥३७॥
त्या सरोवरात फार मोठा नक्र (सुसर)
होता आणि त्या वनातही मोठा हत्ती होता :
सरोवरीं जळचर । मत्स्य कच्छ पर्वताकार ।
त्यांसी ग्रासी ऐसा नक्र । थोरां थोर गजग्रहो ॥३८॥
तेचि वनी वसे गजेंद्र । तेचि सरोवरीं वसे नक्र ।
दोघांसही पूर्व वैर । अति दुर्धर ब्रह्मशापे ॥३९॥
एवढी ब्रह्मशापाची थोरी । यांसी घडली कैशा परी ।
तेही कथीन निजनिर्धारी । पूर्वानुस्मरी अवधारा ॥४०॥
पूर्वी इंद्रद्दुम्न राजेंद्र । ब्रह्मशापे जाहला गजेंद्र ।
हूहू गंधर्व अति दुर्धर । तो झाला नक्र ब्रह्मशापे ॥४१॥
पौंड्रेदेशी राजा इंद्रद्दुम्न । भगवद्भक्तिपरायण ।
तो या सरोवरा येउन । एकांत देखोन राहिला ॥४२॥
एकांत आणि विश्रांती । राव सुखावला चित्ती ।
तेथे राहोनि नेमस्तीं । व्रत चालवी तपश्चर्या ॥४३॥
तोचि राजा इंद्रद्दुम्न । त्रिकाळ करिता संध्यास्नान ।
केश वळिले जटाग्रंथन । तपस्वी पूर्ण तापसत्व ॥४४॥
तो एके काळी इंद्रद्दुम्न । आराधनकाळ लक्षून ।
ते सरोवरोदकीं करोनि स्नान । घालोनि आसन बैसला ॥४५॥
तेचि काळी अगस्तिमुनी । आला शिष्येंसी परिवारूनी ।
राये अभ्युत्थान न करोनीं । बैसला आसनी ध्यानस्थ ॥४६॥
ऋषि येता देखोनी । रावें सांडिला उपेक्षोनी ।
नाही नमन ना अभ्युत्थानी । बैसला ध्यानीं ध्यानस्थ ॥४७॥
गर्वाचे प्रकार व त्यांचे परिणाम :
साधु सर्वांगी चैतन्यघन । त्यासी न भजता धरी ध्यान ।
ते ध्यान नव्हे परम विघ्न । अधःपतन ध्यानगर्वे ॥४८॥
ध्यानगर्व ज्याचे ठायी । ज्ञानगर्वे जो उताणा पाही ।
विद्यागर्वीं मुसमुसी देही । तो नर पाही अधःपाती ॥४९॥
साधु सच्चिदानंदव्यक्ती । ध्यानीं काल्पनिक मूर्ती ।
साधुउपेक्षा ध्यानाप्रती । ते अधःपाती ध्यानगर्वे ॥५०॥
उपेक्षोनि साधुसज्जन । जो साक्षेपे आदरी ध्यान ।
ध्यान नव्हे ते नागवण । आपणा आपण नाडिले ॥५१॥
ध्यान ब्राह्मणी नाही ब्रह्मभाव । भूतीं नाही भगवद्भाव ।
त्याचे ध्यानचित्त वाव । आला अपाव ध्यानगर्वे ॥५२॥
साधूंच्या उपेक्षेचे परिणाम :
ब्राह्मणी नाही ब्रह्मत्वभक्ती । ना भगवद्भाव सर्वा भूतीं ।
रायाची खोटी ध्यानस्थिती । येणे अगस्ति कोपला ॥५३॥
राजा सावधान भगवद्ध्यानीं । परी उपेक्षा साधुसज्जनी ।
परम विघ्न ध्यानस्थानीं । देखोनि मुनि कोपला ॥५४॥
रायाचा झडे ध्यानाभिमान । भगवत्प्राप्ति पावे पूर्ण ।
ऐसी कृपा अनुलक्षून । शापवचन देतसे ॥५५॥
परम कृपाळू अगस्ती । शाप वदला कृपामूर्तीं ।
साधुसज्जनी गर्वोन्मत्तीं । गजत्वप्राप्ती पावसी ॥५६॥
साधु सज्जनीं गर्वोन्मत्त । तो तू होसी गज उन्मत्त ।
ऐसे अगस्ति जंव वदत । गजत्व प्राप्त रायासी ॥५७॥
ब्राह्मणाचिया अभक्ती । साधुसज्जनी ध्यानोन्मत्तीं ।
रायासी गजत्वाची प्राप्ती । मुनि अगस्तीचेनि शापे ॥५८॥
ब्राह्मण शाप अति दुर्धर । तेचि वनी तो राजेंद्र ।
जाला उन्मत्त गजेंद्र । बळोद्गार महाबळी ॥५९॥
ऐसी इंद्रद्दुम्नाची गती । हूहू गंधर्व याचि रीती ।
ब्रह्मशापाचेनि प्राप्ती । नक्रत्वस्थिती पावला ॥६०॥
तेचि सरोवरीं माध्यान्हकाळीं । देवऋषि करिता आंघोळी ।
हूहू गंधर्व तेचि काळी । करी जळकेळी स्त्रियांयुक्त ॥६१॥
देवऋषि जळा आंत । उभा सूर्यसूक्त जपत ।
हूहू गंधर्व जळीं गुप्त । येवोनि धरी ऋषिपाय ॥६२॥
ग्रह जैसा उदकी । येवोनि झोंबे एकाएकी ।
तैसाचि गंधर्व अविवेकीं । झोंबला तवकीं ऋषिपायीं ॥६३॥
पाया झोंबतां सत्वर । कोपोनि शापी ऋषीश्वर ।
गुप्तरूपें जळचर । होसी नक्र गजग्रहो ॥६४॥
दोघेही ऋषींना शरण गेल्यावर त्यांना उःशाप मिळाला की
त्यांचे द्वंद्वयुद्ध जुंपल्यावर भगवंतांच्या कृपेने दोघांचा उद्धार होईल
ब्रह्मशाप ऐकोनि कानी । गंधर्व इंद्रद्दुम्न दोनी ।
उच्छाप मागाया लागूनी । कर जोडूनी विनविती ॥६५॥
आमुचे आम्ही गर्वोन्मत्त । ब्रह्माशाप जाला प्राप्त ।
तुम्ही दोघे अति कृपावंत । शापन्मुक्त करावे ॥६६॥
आम्ही दोघे अति अपराधी । तुम्ही दोघे कृपानिधी ।
तुम्ही अक्षोभ अगाधबुद्धी । आम्हा त्रिशुद्धी उद्धरावें ॥६७॥
तुम्ही मायबापांहूनि आप्त । आम्ही अपराधी अत्यंत ।
दोघे कृपाळू जी समर्थ । शापोन्मुक्त करावे ॥६८॥
ऐसे ऐकता प्रार्थन । कृपेनें द्रवले दोघेजण ।
वदते जाले उच्छापवचन । सावधान अवधारा ॥६९॥
एक जळी एक स्थळी । वैरी व्हाल आतुर्बळी ।
युद्ध करिता जलकल्लोळी । तुम्हा वनमाळी पावेल ॥७०॥
युद्ध करिता अत्यंत । जेव्हा मांडेल प्राणांत ।
तेव्हा पावोनि भगवंत । नित्य निर्मुक्त करील ॥७१॥
शापोन्मुक्त जन्मोन्मुक्त । हरि करील भवनिर्मुक्त ।
ऐसे वदले वरदोक्त । ऋषि समर्थ कृपाळु ॥७२॥
ब्राह्मण शापिती क्षोभोन । हे समूळ मिथ्या वचन ।
ऋषी कृपाळु दीनोद्धरण । वरद वदोन उद्धरिले ॥७३॥
उद्धरावयाची नवलपरी । काढिले जन्ममरणाबाहेरी ।
एवढी कृपेची थोरी । कोपामाझारी ऋषींच्या ॥७४॥
जैसा मातेचा निजकोप । वरी कठिण आंत सुखरूप ।
तैसाचि ब्राह्मणांचा शाप । शापे चिद्रूप पावती ॥७५॥
ब्राह्मणांचे कोपे निवृत्ती । पाप निर्दळोन ब्रह्मप्राप्ती ।
संतोषलियाकाय देती । श्रुतिस्मृती अगम्य ॥७६॥
त्यामुळे गजेन्द्र सरोवरात कधीही गेला नाही :
ऐसी वरदोक्ति वरदोन । ऋषी गेले करोनि स्नान ।
गजेन्द्र नक्र दोघे जण । जाले आपण ऋषिशापें ॥७७॥
राजा गजेंद्र वनस्थळी । गंधर्व नक्र जाला जळीं ।
दोघे जण आतुर्बळी । जळीं स्थळीं विचरत ॥७८॥
जळीं नक्र महाबळी । तिमिंगिलातें सगळें गिळी ।
जळचरें कांपती जळीं । जलकल्लोळी विचरता ॥७९॥
लहानसान नाणी दृष्टी । पर्वतप्राय मत्स्य घोंटी ।
ऐसा नक्र जगजेठी । सुखसंतुष्टी राहिला ॥८०॥
शापे स्मृति गेली समस्त । तरी माझा वैरी उदकांत ।
ऐसे गजेंद्र नित्य स्मरत । न ये उदकार्थ सरोवरा ॥८१॥
गजेंद्र जों का माझा वैरी । वसतो याचि वनांतरीं ।
हे आठवण नित्य नक्रीं । न ये बाहेरी आहारार्थ ॥८२॥
नक्र जळीं महाबळीं । गजेंद्र वनी बळिया बळी ।
दोघे जण शापसमेळीं । जळीं स्थळीं विचरत ॥८३॥
जो गजेंन्द्र ते गिरिकंदरी । गजीगजशावसह परिवारीं ।
क्रीडा करी वनांतरीं । वनविंहारीं उन्मत्त ॥८४॥
उन्हाळ्यात आपल्या सहकार्यांसह वनातून विहार करीत
असता तहानेने व्याकुळ होऊन गजेन्द्र सरोवरात आला
चैत्रमासींच्या वनशाखी । तयानें सेविता एकाएकी ।
मद चालिला पै तवकीं । अति उद्रेकी उन्माद ॥८५॥
तेणे उन्मादे आपण । मांडिलें वनविहरण ।
वेळु जाळिया उपडून । वेत्रवन विध्वंसी ॥८६॥
गुल्मलता थोर थोर । गगनचुंबी तरूवर ।
कांटेसांवरी अपार । उन्मूळी समग्र दंताग्रें ॥८७॥
हाणिता दातांची पै झडें । पाडी पर्वतांचे कडे ।
त्याचे मदगंधापुढें । पळती रोकडे वनसिंह ॥८८॥
गजेंद्रमदाचे अवघ्राणें । दिग्गज कांपती संपूर्ण ।
शरभ शार्दूळ पलायमान । सांडिती प्राण व्याघ्रसिंह ॥८९॥
आस्वन वराह महिष वृक । गौरवानर खड्ग जंबुक ।
गोचमरी शाळ शशक । मृगादिक भयें पळती ॥९०॥
पळत्या पशूंसी नाभीकार । देवोनि राखी त्यांसी गजेंद्र ।
घेती उदक साचार । दर्प दुर्धर साहवेना ॥९१॥
पर्वती चालता गजेंद्र बळीं । पर्वत दडापीत पाताळीं ।
सर्प चेपती फणामंडळी । पन्नगकुळीं आकांत ॥९२॥
गजेंद्र उन्मादमदमेळीं । करिता वनांची रवंदळी ।
चैत्रींचा रवि माध्यान्हकालीं । कुंभस्थळीं पोळत ॥९३॥
गजी गजशाव समस्त । उष्णें जाली अति संतप्त ।
अवघी जालीं तृषार्त । उदकार्थ तळमळती ॥९४॥
करोनि पंचयोजनें गमन । नित्य करिती गंडकीउदकपान ।
परी सरोवरांचें जीवन । नक्राभेण स्पर्शेना ॥९५॥
गंडकी न ठाके उष्णसमेळीं । किरणीं पोळला कुंभस्थळीं ।
आला सरोवराजवळीं । भयसमेंळी तृषार्त ॥९६॥
सोंड घालिता सरोवरीं । गजेंद्र धाकत जिव्हारीं ।
झणी मज झोंबेल वैरी । भय भारी जळपानीं ॥९७॥
सोंड घालितांचि जळीं । गजमदगंध सेवावया अळी ।
रूंजी करिती गंडस्थळीं । भ्रमरावळी रूणझुणती ॥९८॥
गजी गजशावयांसंयुक्त । तृषें पीडिली जळार्थ ।
गजेंद्रेंसीं समवेत । आली धांवत सरोवरा ॥९९॥
ते तडाग अति पुष्कळ । माजी निर्मळ जळसुनीळ ।
कमळगंध सुपरिमळ । अति शीतळ शीकरांबु ॥१००॥
गज राहोनि जळाबाहेरी । सोंड घालोनि सरोवरीं ।
जळ प्राशिलें स्वइच्छेवरीं । मस्तकावरी शिंपिलें ॥१०१॥
जळप्राशनें गजपती । जाली सकळ श्रमां शांती ।
जलशिंपणें जाली विश्रांती । चढला पुढती गजमद ॥१०२॥
रिघोनि सरोवरजळी । उन्मादे मांडिली जळकेळी ।
कमळां करित रवंदळी । जलकल्लोळीं क्रीडत ॥१०३॥
गजी गजशाव उदकाप्रती । रिघावया अवघी भीती ।
शुंडादंडें गजपती । जळ पाजीत सर्वांसी ॥१०४॥
पहिले पाजिलें प्रिय भार्येसी । भार्या पाजी प्रियपुत्रासी ।
मग पाजित इतरांसी । जेंवी कुटुंबासी गृहस्थ ॥१०५॥
विसरोनियां निजमरण । गृहस्था कुटुंबपोषण ।
तैसा गजेंद्र आपण । नक्रग्रहण विसरला ॥१०६॥
प्राणी विसरे निजमरणासी । काळ टपतसे तयासी ।
तेंवी नक्र गजेंद्रासी । जळसहवासीं टपतसें ॥१०७॥
जेंवी काळ पाहोनि अंत । मग प्राण्याचा करी घात ।
तेंवी गजेंद्र सरोवराआंत । नक्र धरित साटोपे ॥१०८॥
माये केला विपरीरार्थ । विसरोनियां अपघात ।
स्त्रीपुत्रांअति मोहित । केला भ्रांत मोहममते ॥१०९॥
अंगी देहलोभाचा मद । दुसरा बळाचा उन्माद ।
तिसरा गजमदाचा मद । जाला मदांध गजेंद्र ॥११०॥
जन्ममरणाचा महाबाध । ज्या नाठवे तो मोहांध ।
न देखे नरकपातबाध । तो मधांद महामूढ ॥१११॥
त्रिविध मोहमंदें मोहित । बुद्धिअंधत्वें गजेंद्र भ्रांत ।
विसरोनिया नक्रघात । जळीं क्रीडत स्त्रीलोभें ॥११२॥
ऐसे क्रीडतां जळस्थानीं । नक्रें धांवोनि धरिला चरणी ।
गजे निजबळे ओढोनी । बाहेर आणूंनी मारू पाहे ॥११३॥
तंव तो नक्र महाबळीं । हबका हाणोनि नेला जळीं ।
गजे युद्ध केले ते काळी । सोंडें कवळी नक्रातें ॥११४॥
सोंड हाणिता तवकें शिरी । सोंड आदळे जळावरी ।
नक्र निश्चळ जळा भीतरी । भय न धरी सोंडेंचे ॥११५॥
सोंड बुडवितां जळसंपुटीं । नक्रें खुडिली सोंड आनकुटीं ।
तेणे गज आला कष्टी । मकरमिंठी सुटेना ॥११६॥
नक्र जाणे गजवर्मस्थ । सोंडेची अणी टपोनि खुडित ।
अमित प्रवाहें पै रक्त । गज किरकिरित अति दुःखे ॥११७॥
मग दोघांची झटपट सुरू झाली :
गजे ओढिता भूतळीं । नक्र निजबळे ओढी जळीं ।
सहस्त्र वर्षे रणरवंदळीं । जळकल्लोळीं भिडले ॥११८॥
सहस्त्र वर्षें करिता रण । सोघे सबळ सप्राण ।
ते देखोनि अमरगण । आश्चर्य पूर्ण करिताती ॥११९॥
नक्रासी जळीं जळाहार । गजा पडिले निराहार ।
भूतळा नाणवेचि नक्र । शक्ति समग्र क्षीण जाली ॥१२०॥
खंडितां सोंडेच्या अणीसी । गजेंद्र जाला कासाविसी ।
मग बोभाय स्त्रीपुत्रांसी । ओढोनि पुच्छेसीं मज काढा ॥१२१॥
पुच्छी लागोनि समग्र । बळे ओढिती स्त्रीपुत्र ।
तिळभरी ढळेना तो नक्र । केले विचित्र ते ऐका ॥१२२॥
समस्तीं ओढिता पुच्छासी । न सोडवे गजेंद्रासी ।
शेखी न ओढवेचि नक्रासी । अति बळेंसी कष्टतां ॥१२३॥
नक्रे आसुडितां तेथ । गजीगजशावसमवेत ।
गजेंद्र नेला सरोवरांत । भयभीत जळमग्न ॥१२४॥
नक्रभयें भयभीत । जळमय निर्बुजत ।
गजेंद्रा सांडोनिया समस्त । आले पळत तीरासीं ॥१२५॥
स्त्रिया म्हणती भाग्य थोर । संकटीं वांचले कुमर ।
नक्रें गिळिला गजेंद्र । अक्षत पुत्र कडे आले ॥१२६॥
माता पुत्रांसी कृपादृष्टी । बुद्धि सांगती गोमटी ।
सोडा गजेंद्राच्या गोष्टी । जळसंकटीं न रिघवे ॥१२७॥
आयुष्य व्हावे निजपुत्रांसी । उदक पाजोनि समस्तांसी ।
संकटीं सांडोनि भ्रतारासी । घेवोनि पुत्रांसी वना गेल्या ॥१२८॥
हजार वर्षे युद्ध झाल्यावर गजेंद्र
हतबल झाला व त्याने प्रभूचा धावा केला
सहस्त्र वर्षें पुरूषार्थी । युद्ध करिता नक्राप्रती ।
निराहारीं युद्धावर्तीं । क्षीणशक्ती गजेंद्र ॥१२९॥
क्षीण शरीरबळशक्ती । मन : शक्ती प्राणशक्ती ।
क्षीण इंद्रिये इंद्रियशक्ती । ग्रहगति गजेंद्रा ॥१३०॥
ऐसा गजेंद्र क्षीणशक्ती । येता स्त्रीपुत्रां काकुलती ।
सांडोनि गेली पतिप्राणांतीं । कोणी अंतीं न येती कामा ॥१३१॥
गजेंद्र पाहे ममता धरोनी । अंतीं सांडिलें सुह्रज्जनी ।
ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्नी । अंती त्यागोनि मज गेल्या ॥१३२॥
मजसमान बळ दुर्धर । शतानुशत माझे कुमर ।
अंती विमुख समग्र । पुत्र कलत्र न ये कामा ॥१३३॥
सुह्रद आणि पुत्र प्रौढ । तिही सांडिली माझी चाड ।
हस्तिणीचा कोण पाड । अति अवघड प्राणांत ॥१३४॥
सोडवावया नक्राप्रती । गजे वेंचिली निजशक्ती ।
पुत्र कलत्र सुह्रदज्ञाती । अंती न येती उपयोगा ॥१३५॥
सार्थक करावया अंतकाळ । एक भगवंत कृपाळ ।
नामे मोक्षाचा सुकाळ । कळिकाळ आंकणा ॥१३६॥
ज्याचे आदरे करिता स्मरण । निःशेष निमे जन्ममरण ।
त्याचे चरणा रिघोनि शरण । भवबंधन छेदावें ॥१३७॥
जीवशिवांहूनि पर । चहू वाचां परात्पर ।
गुणागुणी अनिवार । त्यासी साचार शरणार्थी ॥१३८॥
श्रीहरीसी जालिया शरणागत । देही असोनि देहातीत ।
कळिकाळाचे पाडोनि दांत । फाडीन खत विषयांचें ॥१३९॥
गर्जता रामनामपडवाडे । कर्मबंधन समूळ उडे ।
यम अंतक पाया पडे । नक्र बापुडे ते काय ॥१४०॥
ऐसी मज जे आठवण । हे श्रीहरीची कृपा पूर्ण
हरीचे अनुग्रहविण । नामस्मरण नाठवे ॥१४१॥
करावे श्रीहरीचें स्मरण । ऐसी युक्ति विवंचून ।
मनबुद्धीं ह्रदयीं समाधान । देवोनि आपण स्वस्थ जाला ॥१४२॥
नक्रें केला जो का व्यग्र । ते व्यग्रता निरसावया समग्र ।
धैर्यधारणा धरोनि अव्यग्र । जपे परात्पर ते ऐका ॥१४३॥
धैर्य नाही जयांपासीं । ते जन्ममरणाचे आंदणी दासी ।
पूर्वभजनसंस्कारेंसीं । धैर्य गजासी हरिस्मरणीं ॥१४४॥
पूर्वभजनपरिपाटीं । हरिस्मरणीं धृष्टि पुष्टी ।
मंत्र जपावया वाक्पुटी । उल्लास पोटी गजेंद्रा ॥१४५॥
एकाजनार्दना शरण । गजेंद्रमुखींचे श्रवण ।
अनुतापे पशु पावन । त्याचे ज्ञान अवधारा ॥१४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
गजेंद्रोपाख्यानं नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥२१॥
॥ ओव्या १४६ ॥ श्लोक ३१ ॥ एवं संख्या १७७ ॥
