विठ्ठल विठ्ठल मंत्र
1064.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनी । कोड कानी ऐकती ॥धृपद॥
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ॥२॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ॥३॥
अर्थ :
तुकाराम महाराज म्हणतात 'विठ्ठल विठ्ठल' हा नाम मंत्र अतिशय सोपा आणि सुलभ आहे, त्याच्या उच्चाराने पापाचे समूळ निर्मूलन होते. ते म्हणतात परंतु येथे जे थोडे भाग्यवंत आहेत त्यांनाच या नामाचा छंद लागतो आणि त्या एका नारायणाचेच कौतुक ते कानाने ऐकतात. ते म्हणतात विठ्ठल हे दैवत अतिशय भोळे असून भक्ताने प्रेमाचा वर्षाव करताच लगेचच तो त्यांचा अंकित होतो, त्यांच्या सेवेस हजर होतो. म्ह्णून ते म्हणतात हरिभक्तांनी कधीही काळाची चिंता मनी वाहू नये, मरणाची भीती कधीही बाळगू नये कारण श्री हरी त्याच्या प्रत्येक भक्ताचे स्वतः संरक्षण करत असतो.
तुकोबाराय म्हणतात या संसारातील व्यक्ती कोणत्याही जातीची असूदेत, म्हणजेच तिने कोणत्याही जातीत जन्म घेतलेला का असेना, त्याचे मोठे आणि लहानपण त्यावर ठरत नाही व सिद्धही होत नाही पण जर का त्याने चित्तात फक्त आणि फक्त श्री हरीलाच स्थान दिले, त्याचेच नाम कंठी धरले तर या संपूर्ण जगतात तो निश्चितच धन्य मानला जातो.
