संध्या भारुड
1.
संध्या भारुड
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयी शेजे आला ॥धृ॥
गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदे एकत्र जेथे होती । स्वानुभव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥
सद्बुद्धीचे घालुनि शुद्धासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण ।
शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हा ।
भक्ति बहीण धावूनि आली गांवा । आता संध्या कैसी मी करू केव्हा ॥३॥
सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन ।
ऐसे ऐकता निवती साधुजन । एका जनार्दनी बाणली निज खुण ॥४॥
संध्या अभंग समाप्त
