नव्हती माझे बोल जाणा
1774.
नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार । मी आहे मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविले माझ्या । कृपाळुवे लज्जा राखियेली ॥धृपद॥
निर्भर मानसी जालो आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषे ॥२॥
आता भय माझे नासले संसारी । जालोसे यावरी गगनाचा ॥३॥
तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद । लाधलो आनंद प्रेमसुख ॥४॥
अर्थ :
मी जे काही बोललो आहे ते सर्व शब्द माझे नाही तर प्रत्यक्ष विठोबाचेच आहे. विठोबाच माझ्या मुखातून बोलत आहे मी त्या विठोबाचा मजूर आहे. भक्ती करण्याचा मी निश्चय केला आहे आणि भक्ती करून घेण्यास विठोबाने मला सहाय्य केले व यानेच माझी लाज राखली. आता मला संसारांमध्ये कसलेही भय राहिले नाही. सर्व भय नष्ट झाले आहे त्यामुळे मी आकाश यापेक्षाही मोठा झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा तर सर्व संतांचाच प्रसाद आहे व संतांमुळे मला भक्ती ब्रम्हज्ञानाचा लाभ झाला आहे.
