आसन शयन भोजन गोविंदे
2539.
आसन शयन भोजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥१॥
अवघिया केली काळे तडातोडी । अवसर घडी पुरो नये ॥धृपद॥
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
आवडीच्या आले आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
काम तरी क्रोध बुद्धी मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळले शांती ॥४॥
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
अर्थ :
बसताना, झोपताना, जेवताना सारखे गोविंदाचे चिंतन चालू असते त्यामुळे त्रिभूवनात आनंद समवलेला मला दिसतोय. काळाने माझा आणि इतरांचा संबंधाचा ताडातोड केला असून माझ्या चित्तात गोविंदाचे स्मरण सारखे चालू असते व यामुळेच मला कोणाचेही स्मरण करण्यास अवसरच पडत नाही. माझ्या शरीराचे भाग पंचमहाभूताच्या ठिकाणी वाटणीला घातले असून व्दैतभावच मी खंडीत केला आहे. माझ्या आवडीचा आहार तो म्हणजे हरीची भक्ती हा मला पुष्कळ भेटत आहे त्यामुळे इतर सर्व व्यर्थ संकल्प मावळून गेले आहेत. काम, क्रोध, बुध्दी देणारे विविध निश्चय आणि हे सर्व ज्या ठिकाणी तयार होते असे मन नाहीसे झाले असून आता केवळ आत्मज्ञान झाल्यामुळे शांती निर्माण झाली असून भ्रमाचे सर्व ओळसे नाहीसे झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनामध्ये श्रीरंगाचा रंग अभंग व एकनिष्ठ म्हणजे कधीही न भंगणारा बसला आहे.
