पंढरीचे वारकरी । ते
1094.
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥धृपद॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥
तुका म्हणे खरे जाले । एका बोले संतांच्या ॥३॥
अर्थ :
पंढरीचे जे खरे वारकरी आहेत तेच मोक्षाचे खरे अधिकारी आहेत असा वर देवाने पुंडलिकाला दिलेला आहे. तो वारकरी मूढ असो, पापी असो किंवा कसाही असो हा पांडुरंग त्याला आपल्या कासेला बांधून भवसागरातून पार करतो. तुकाराम महाराज म्हणतात पुंडलिकाने देवाला वर मागितला आहे की ‘हे देवा जे कोणी वारकरी तुझ्या दर्शनाला पंढरीला येतील तू त्यांना मुक्त कर " या पुंडलिकाच्या वराला देवाने मान्य करून त्याचे म्हणणे खरे ठरविले.
