साई खडियाते देखोनिया
853.
साई खडियाते देखोनिया माते ।
तैसा संसाराते येत रया ॥१॥
सोय ध्यान उन्मनी पाचांची मिळणी ।
सत्रावीचे कानी गोष्टी सांगे ॥२॥
दुभोनिया खडाणी नैश्वर्य ध्यान गगनी ।
चेतलिया मन क्षीर देत ॥३॥
ज्ञानदेवी समभाव त्रिगुणी नाही ठाव ।
आपेंआप राणीव साई खडिया ॥४॥
अर्थ :
कटपुतळीच्या लाकडांच्या बाहुल्या करून त्यांना नाचवून दाखविणारा तो जसा जड बाहुल्या नाचवून दाखवितो. पण पहाणाऱ्याला त्या बाहूल्या खऱ्याच वाटतात. वास्तविक त्या मिथ्या आहेत. त्याप्रमाणे तात्त्विक संसार मिथ्या असला तरी. पंचमहाभूतांचे कार्य जो देह त्यात ध्यानाच्या द्वाराने उन्मनी साधली असता सतरावी जी आत्मकला त्यांची गोष्ट कानांत सांगितल्यासारखी होते. लाथा मारणारी गाय दूध देत असली तरी ते जसे फुकट, कारण तिच्या लाथा झाडण्याने ते सांडले जाते. त्याप्रमाणे अनित्य असा जो संसार त्याच्या चिंतनाचा उपयोग नाही. असे जाणून या नश्वर संसारात जर आत्मचिंतन केले तर मनाला आनंदरूप दूध प्राप्त होते. आत्मसमभाव झाला असता या त्रिगुणरूप प्रपंचाचा ठाव ठिकाणा नाहीसा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचे जे राजऐश्वर्य प्राप्त होते. ते सुद्धा कठपुतळीतील बाहुल्याप्रमाणेच होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
