तुजविण वाणी आणिकाची
281.
तुजविण वाणी आणिकाची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥धृपद॥
नेत्री आणिकासि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचे ॥३॥
तुका म्हणे काय वाचून कारण । तुज एक क्षण विसंबता ॥४॥
अर्थ :
हे हरी तुझ्यावाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करील तर माझी जिव्हा झडो. देवा माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरे काही आवडत असेल तर माझे मस्तक फूठून जावो. तुझ्या वाचून जर माझ्या या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाला आवडीने पाहिल तर त्याचवेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होवो. माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही तर मग त्या कानांचा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज म्हणतात तुला मी एक क्षणभर जरी विसरलो तरीही देवा तश्या जगण्याला कायअर्थ : आहे.
