येई वो श्रीधरे सर्व
629.
येई वो श्रीधरे सर्व रूपसारे | कैवल्य उत्तरे अभिनव ॥१॥
श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे | प्रगट वो संगे पूर्णधन ॥२॥
श्रीकरे श्रीधरे शोभे ते साचारे | चक्रांकित करे शंख तुझा ॥३॥
सुंदर श्यामळ नाम हे अढळ | मुखी हो वेल्हाळ हस्त तुझे ॥४॥
प्रकाशे हा पूर्ण श्रीधरे पै जाण | सांगितली खूण खेचराने ॥५॥
नामा म्हणे माता श्रीधर उच्चारू | तरेन साचारु तिन्ही लोकी ॥६॥
