दुधाळ गाढवी जरी जाली
1100.
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥धृपद॥
मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तू नेणे ॥२॥
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी ॥३॥
अर्थ :
गाढवीनीने दूध दिले तरी त्या दुधाची बरोबरी गाईच्या दुधाशी होईल काय ? कावळ्याच्या गळ्यामध्ये पुष्पाचा हार घातला तरी त्याला हंसाचे रूप येईल काय ? मर्कटाने जरी अंगाला बारा टिळे लावले तरी त्याला ब्राम्हणाप्रमाणे वर्तन करता येईल काय ? तर येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ब्राम्हणाने जरी कर्म भ्रष्ट पणा केला तरी तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे चांगले कर्म करणाऱ्याकडून एखादे कर्म चुकून वाईट जरी घडले त्याच्याकडून कर्म भ्रष्ट पानाचे वर्तन झाले तरी तो श्रेष्ठ होय. (या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ‘तो ब्राम्हण " म्हणजे नेहमी चांगले कर्म करणारा श्रेष्ठ ब्राम्हण. )
