॥ श्रीएकनाथमहाराजकृत
53.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय त्रेपनावा ॥
महिरावणाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हनुमंत स्वतःची चिंता व्यक्त करुन मकरध्वजाचे साहाय्य मागतो :
ऐकता मगरीचें वचन । झाले हनुमंता समाधान ।
देवोनि पुत्रासीं आलिंगन । निजविवंचन सांगत ॥१॥
आमुचा स्वामी श्रीरघुनाथ । निद्राकांत कटकांत ।
वानर मेळिकारी निद्रिस्थ । राक्षसी मत्त पै केले ॥२॥
मोहनास्त्र सावधानता । घालोनिया तत्वता ।
मोहन केले समस्ता । सुषुप्ति अवस्था लागली ॥३॥
कपतयोद्धे राक्षस । संमुख न येतीच संग्रामास ।
चोरोनियां श्रीरामास । पाताळास आणिले ॥४॥
पृथ्वी पाहता समस्ता । न सांपडती सर्वथा ।
पाताळासी आलो आता । श्रीरघुनाथा पहावया ॥५॥
तंव येथे शुद्धि लागली । तुम्हांसी भेटी झाली ।
श्रीरामप्राप्तीची वहिली । बुद्धि भली तुम्ही सांगा ॥६॥
तुमचे सोयरिकीचे सुख । आम्हांसी हेंचि अलोलिक ।
भेटवावा रघुकुळटिळक । आवश्यक तुम्ही आजी ॥७॥
तुम्हांसारिखे साधुसंत । पुत्रधर्म आचरत ।
ऋणत्रयापासून मुक्त । पितर करित ते ऐका ॥८॥
देवपितरमनुष्यऋण । तिही गुंतले प्राणिगण ।
ऐक याचे लक्षण । विवंचून सांगेन ॥९॥
देवऋणें यागादिकीं । पितर मुक्त तिळोदकीं ।
मनुष्याचें ब्रह्मस्व की । फेडितां सुखी स्वये होती ॥१०॥
मज भेटविल्या रघुनाथ । ऋणत्रयासी तुम्ही निर्मुक्त ।
विभागरचना यथार्थ । ऐक सुनिश्चित सांगेन ॥११॥
देवांचा देव रघुनाथ । तो भेटला यथार्थ ।
देवऋणें नित्य निर्मुक्त । वेदशास्त्रार्थसंमत ॥१२॥
मनुष्यनाट्यविडंबनें । रुप धरिले रघुनंदने ।
मनुष्य ऋणें मुक्त स्वये होणें । जाण दर्शन तयाचेनि ॥१३॥
सकळांचा जनक जाण । स्वये श्रेष्ठ चतुरानन ।
त्याचाही जनक आपण । रघुनंदन साचार ॥१४॥
त्या श्रीरामाची होता भेटी । पूर्वज कोट्यनुकोटी ।
उद्धरती उठाउठी । श्रीराम दृष्टी देखिलिया ॥१५॥
ऋणत्रय बापुडे ते किती । ब्रह्मांडकोटी उद्धरती ।
कर्माकर्माची होय शांती । श्रीराममूर्ती देखिल्या ॥१६॥
ऐसे जाणोनि निश्चिती । राम भेटवावा मजप्रती ।
तेणे आम्हा तुम्हा अति प्रीती । कल्पांतींही खंडेना ॥१७॥
मकरध्वजाला स्वामिद्रोहाची चिंता :
ऐकोनिया कपिवचन । मकरध्वज बोले संकोचून ।
सांगितले विवंचन । धर्म जाण तो होय ॥१८॥
परी एकी संकोचता । स्वधर्माची हनुमंता ।
तू माझा निजपिता । म्हणोनि आता सांगेन ॥१९॥
राक्षसांचें वेतन । खावोनिया जाण ।
देह पोशिला आपण । त्यांचे हनन केंवी सांगू ॥२०॥
तू माझा निजपिता । म्हनोनि पुसतसें ताता ।
जेणे चुके अधःपाता । त्या अर्था सांगावे ॥२१॥
स्वामिद्रोह न लागे अंगी । पित्रवज्ञा न घडे जगी ।
ऐसे विचारोनि वेगी । कार्यालागी प्रवर्तावे ॥२२॥
ऐकोनि पुत्राचे वचन । संतोषला कपिनंदन ।
पुत्राचें स्वधर्मलक्षण । स्वये आपण करिता झाला ॥२३॥
श्रीराम आहे येथे । ऐसे कळलें निश्चिते ।
आता काय पुसों यातें । बापुडे अनाथा का गोवूं ॥२४॥
ऐसे विचारोनि कपीद्र । वेगे स्मरला श्रीरामचंद्र ।
बुद्धि स्फुरली सत्वर झाला अगोचर हनुमंत ॥२५॥
हनुमंत देवालयांतील शक्तीचे स्तवन करितो :
अदृश्य होवोनि हनुमंत । गेला देवालयाआंत ।
शक्ति देखिली अद्भुत । सुपूजित दिव्योपचारें ॥२६॥
कर जोडोनि कपिनंदन । आदरिलें शक्तिस्तवन ।
तुवा कृपा पूर्वी करुन । सुद्धि आपण सांगितली ॥२७॥
यक्षिणीवटातळीं जाण । गीधद्वारा आपण ।
सुरस वाचा बोलोन । कपिनंदन प्रबोधिला ॥२८॥
पावावया रघुनंदन । सांगितले विवंचन ।
वंदोनियां ते वचन । केले आगमन तुजपासी ॥२९॥
प्रसन्न होवोनि तत्वता । भेटवावे रघुनाथा ।
म्हणोनि चरणांवरी माथा । ठेवित तत्वता हनुमंत ॥३०॥
अंबिकेने स्वतःच्या जागी हनुमंताला बसवून गमन केले :
ऐकोनिया कपिस्तवना । अंबा संतोषली जाणा ।
सांडोनिया निजासना । कपिनंदना ठाव दिधला ॥३१॥
त्यासी न देता अभ्युत्थान । क्षणे उठवील दैवतपण ।
सुरासुरा नागवे जाण । यासी कोणे बोलावें ॥३२॥
श्रीरामाचा निजभक्त । स्वामिकार्या त्वरित ।
आला असे हनुमंत । याचा कार्यार्थ साधावा ॥३३॥
सकळ वीर राक्षसगण । क्षणे निर्दाळील जाण ।
मारोनियां अहिरावण । रघुनंदन नेईल ॥३४॥
एवढा होईल गजर । म्हणोनिया तो कपींद्र ।
पूजिती झाली खेचर । अतिसत्वर जगदंबा ॥३५॥
धर्ममर्यादा हेचि देख । घरा आलिया हरिसेवक ।
पूजावे जी आवश्यक । तेही देख साधले ॥३६॥
ऐसे विचारोनि चित्ती । गेली जगदंबा परती ।
जाणोनिया मनोवृत्ति । बैसे मारुति आसनी ॥३७॥
मध्यरात्री पूजाविधी व प्रसाद अर्पण :
मध्यरातीची वेळ । झाला पूर्ण असुराकाळ ।
पूजोपचार सकळ । घेवोनि तत्काळ भीतरी आले ॥३८॥
मग बरवी पूजा । समर्पिली अति वोजा ।
नैवेद्य नानापरींच्या खाजा । राक्षसराजा आणित ॥३९॥
आश्चर्य झाले वाडेंकोडें । हात दावित मुखाकडे ।
तंव पसरलीं जाभाडें । अन्न निवाडे खावया ॥४०॥
अंबिकेचे प्रसादग्रहण पाहून राक्षसांना आश्चर्य :
अहिरावण म्हणे नवल । अंबा पसरिते मुखकमळ ।
ताटें रिचवा सकळ । प्रसन्नकाळ आजींचा ॥४१॥
पसरोनिया आपलें मुख । बोणें घेत असे देख ।
शीघ्र आणा अन्न चोख । पात्रें असंख्य राहिली ॥४२॥
पूजा करू आजिवरी । मुख कधींच न पसरी ।
आजि दिसे नवलपरी । कामेश्वरी प्रसन्न ॥४३॥
वडे मांडे फुगी पुरी । चोखट मैदाची तेलवरी ।
साखरें घोळलिया घारी । भात खिरी अति गोड ॥४४॥
साखरमांडे कोरवडे । आंबवडे चिंचवडे ।
दहिंवडे दूधमांडे । वाडेंकोडें क्षीरधारी ॥४५॥
भात सोज्वळ जिरेसाळिया । जेंवी मोगरियाच्या कळिया ।
वरी दाळी मुगाचिया । घातलिया पद्धती त्यावरी ॥४६॥
कढी ताकाची चोखट । वेळामिरे समसकत ।
फुरेके घेता पै उद्भट । ब्रह्मांडकोटी गर्जत ॥४७॥
क्षीर चोखट वळवटाची । वरी पंचधार साखरेची ।
लोणी तावून अति सुरुची । वाटी तुपाची भरियेली ॥४८॥
वेळामिरें कापूर । शुंठीआदि सकळोपचार ।
करोनिया अति अरुवार । दहींभात सत्वर आणिला ॥४९॥
ऐशा ताटांचिया हारी । मुखी घालिता कोटीवरी ।
तृप्त नव्हे ती खेचरी । विचार करी निजचित्तें ॥५०॥
जितुके रांधिलेंसे अन्न । तितुकेंही वेंचिलें संपूर्ण ।
मग मांडिले फळभोजन । नाना जातिप्रकार ॥५१॥
तेंही सरलें पै देख । मग आणिले आणिक ।
पुढे ठेवितां एकाएक । गटका देख पै केला ॥५२॥
रोटी पोळी गुळवरी । दिवसीं मुटक्ले भारी ।
न लागता दशनांतरी । गतका करी जगदंबा ॥५३॥
बहुता दिवसांची भुकेली । रामागमनें सुखी झाली ।
अन्न स्वीकारुं लागली । तृप्ति वहिली पै नव्हे ॥५४॥
हनुमंताचा विचार पूर्ण । राक्षसा वोळला रघुनंदन ।
द्यावयासी मोक्षदान । येथे गमन पै केले ॥५५॥
श्रीरामाचा मी किंकर । मोक्ष देईल निर्धार ।
मागे राहता अणुमात्र । वासना सत्वर ओढील ॥५६॥
राक्षसांचे सर्वस्वें देखा । नार्पितां रघुकुळटिळका ।
न पावती मोक्षसुखा । म्हणोनि देखा गटकावी ॥५७॥
तंव बोलती रक्षोगण । अहिरावणा परिस वचन ।
अंबेसीं तृप्तीलागीं जाण । रघुनंदन आणावा ॥५८॥
राक्षस श्रीरामांना अभ्यंगस्नान घालून देवीपुढे आणतात :
ऐकोनि राक्षसांच्या बोला । अहिरावण संतोषला ।
मान सकळा दिधला । अतिप्रीतीकरोनियां ॥५९॥
ज्यालागीं कष्टलों बहुत । तो साधला कार्यार्थ ।
वेगी आणोनियां रघुनाथ । करु तृप्त जगदंबा ॥६०॥
म्हणोनि आज्ञापिले सेवक । वेगी आणा रघुकुळटिळक ।
स्नान घालोनि विधिपुर्वक। सत्वर देख येथे पै ॥६१॥
वेगी लाहोनि शासन । आले कारागृहा ठाकून ।
जेथे होता रघुनंदन । दूत जाण तेथे आले ॥६२॥
करवून अभ्यंगस्नानें । लाविले हळदीचें उटणे ।
घातली करवीरसुमनें । कंठाभरणे शोभती ॥६३॥
पाशबंधनी बंधु दोघे । बाहेर काढिले वेगे ।
लागलीं वाजंत्री अनेगें । मिरविता जगें देखिजे ॥६४॥
हाटवटींचे लोक । नरनारी असंख्य ।
देखोनि रघुकुळटिळक । अलोलिक मानिती ॥६५॥
वृत्ति जडली रघुवीरीं । प्राशन केला नेत्रद्वारी ।
नेवोनिया अभ्यंतरी । नरनारी भोगिती ॥६६॥
बोलती नगरनागरिक । अवलोकिता रघुकुळटिळक ।
फिकें होत समाधिसुख । त्यासी देख घात करिती ॥६७॥
मदनमोहन श्रीराम । त्यासी मारुं नेती अधम ।
कृपा करो पुरुषोत्तम । होवो भस्म राक्षसा ॥६८॥
यांचा करु जाता घात । पुरला राक्षसांचा अंत ।
सहकुळ मरतील निश्चित । भविष्य वदत वाग्देवी ॥६९॥
सत्य जनी जनार्दन । वृथा नव्हे त्याचे वचन ।
मांडले राक्षसांचे निधन । कपिनंदन मारील ॥७०॥
बाप कृपाळु रघुनंदन । राक्षसा वोळला संपूर्ण ।
वैरिया द्यावया मोक्षदान । स्वये अपमान साहतसे ॥७१॥
करिता वाद्यांचा गजर । देवीसंमुख रघुवीर ।
आणविला वेगवत्तर । देखता कपींद्र विस्मित ॥७२॥
कोण कृपेचे विंदान । मूढ अविवेक राक्षसगण ।
त्यांसी द्यावया मोक्षदान । एवढा अपमान साहतसे ॥७३॥
प्रत्यक्ष करावे जरी नमन । तंव राहिलोसें आच्छादून ।
प्रकट होता नये जाण । कार्य संपूर्ण जंव साधे ॥७४॥
करोनि मनोमय नमन । चरित्र पाहतसे आपण ।
तंव बोलिला अहिरावण । रघुनंदन ऐकत ॥७५॥
रामांना इष्त देवतेचे स्मरण करण्याची राक्षसांची आज्ञा :
खड्गधारा करोनि सतेज । बोलतसे राक्षसराज ।
आता वध करीन मी तुज । स्मरें निजगुज आपुले ॥७६॥
तुझे आराध्यदैवत । त्याते स्मरें पा त्वरित ।
मग झालिया तुझा घात । विस्मरणांत बुडसील ॥७७॥
तू म्हणवितोसि आपणियातें । विश्व स्मरत आहे माते ।
तो तू बांधला आहेसी येथे । स्मर निजचित्तें कुवासा ॥७८॥
आत्मा त्वं भुवनैकनायक रघो सूक्ष्मातिसूक्ष्मं जगु
र्वेदैःसोपनिषत्पुराणगणकैर्बद्धोऽसि देव्यग्रतः ।
तच्छ्त्वा रघुवंशकेसरियुवा रौद्रीं तनु चिंतयन्
मुक्तःसानुजराघवस्य पुरतो दृष्टो हनूमानकपिः ॥१॥
आपणिया म्हणविसी रामा । जो मी विश्वाचा विश्वात्मा ।
वेदांसी न कळे महिमा । रुपनामा अतीत ॥७९॥
सूक्ष्माचेंही अति सूक्ष्म । लक्षालक्षातीत परम ।
उपषिदांसी दुर्गम । मनोधर्म थोटावे ॥८०॥
नेत्री देखिला न वचे । व्यवहार खुंटले शब्दांचे ।
क्षीणकर्म समरणाचें । श्रवणीं नवचे आकळिला ॥८१॥
जेथे मनाची मुरकुंडी । कल्पिला न वचे कडोविकडी ।
वृत्ति झाली पै वेडी । इंद्रियें बापुडीं काय करिती ॥८२॥
पुराणे काय करिती तेथ । वेडावला शास्त्रार्थ ।
तो म्या देवींपुढें तेथ । श्रीरघुनाथ बांधिला ॥८३॥
सर्वथा व्यक्ती न येसी । अव्यक्तामाजी लप्सी ।
तो नांवरुपा आलासी । देवीपाशीं मारावया ॥८४॥
सर्वातीत रघुनाथ । बंधुसमवेत येथ ।
म्या बांधिलासी त्वरित । सुटका निश्चित चिंती पा ॥८५॥
विलंब कायसा येथ । जगदंबा क्षुधाक्रांत ।
स्मर आपुलें कुळदैवत । शिरःपात करु तुझा ॥८६॥
श्रीराम विचारपूर्वक हनुमंताचे स्मरण करतात :
ऐकोनिया त्याचे वचन । स्वये विचारी रघुनंदन ।
करु कोणाचे स्मरण । विश्व चिंतन करी माझे ॥८७॥
प्राणिमात्रास संकट पडत । तितुके श्रीरामा स्मरत ।
तेणे पुरती मनोरथ । जग निर्मक्त श्रीरामे ॥८८॥
मज वर्ण व्यक्ति नाही । ऐशियाते पाही ।
घाला घालोनिया लवलाही । धरिले कांहि चालेना ॥८९॥
ऐसे असता सर्वथा । कोणातें स्मरो मी आता ।
विचार करिता रघुनाथा । बुद्धि तत्वता आठविली ॥९०॥
अहंकारें घालोनि घाला । अव्यक्त व्यक्ती आकळिला ।
जीवदशेंसीं आणिला । वेगी बांधला कर्मपाशीं ॥९१॥
लटकेंचि क्रियमाण । करवून संचित जाण ।
वरते ते भोग दारुण । प्रारब्ध जाण तया म्हणती ॥९२॥
या त्रिविध कर्माच्या संगती । पडिजे जन्ममरणावर्तीं ।
भोगिजेती योनिपंक्तीं । उसंत चित्ती असेना ॥९३॥
ते छेदावया कर्मबंधन । सबळ विरक्त भक्त जन ।
मी होवोनियां भजन । माझेंचि जाण करिताती ॥९४॥
अद्वैतभजनाचा संतोष । होती सर्वभावीं उदास ।
करोनि कुर्वंडी सर्वस्व । स्वये सुखास भोगिती ॥९५॥
स्वये स्वसुख भोगिती । उसंत नाही अहोरातीं ।
इतर कर्मबंधीं पडती । तेही येती तया शरण ॥९६॥
बाप कृपाळु दीनदयाळ । न म्हणती वेळ अवेळ ।
दीन देखोनि तत्काळ । करिती सकळ सोडवणे ॥९७॥
छेदोनि कामक्रोधांचे बंध । आणि कर्माकर्मांचे भेद ।
खाणोनि विषयाचा कंद । स्वरुप शुद्ध प्रबोधिती ॥९८॥
देहमात्र झाला कृश । त्यासी उपचारिती सुरस ।
देवोनि अर्धमात्रारस । जन्ममरणास नासिती ॥९९॥
एवढे असता दीनोद्धारी । मज दीन केले इहीं किंकरीं ।
आता स्मरोनि झडकरी । करीन बोहरी सकळांची ॥१००॥
ऐसा करोनि निर्धार । सरिसावला रामचंद्र ।
स्मरला तो हनुमान वीर । रुद्रावतार प्रत्यक्ष ॥१॥
हनुमंत प्रगट होऊन रामांचे पाश तोडतो :
ऐकता श्रीरामवचन । पातला सवेग कपिनंदन ।
पाश छेदोनियां जाण । रगुनंदन सोडविला ॥२॥
लक्ष्मणासमवेत । श्रीराम केला नित्यमुक्त ।
अगाध बोध हरिभक्त । नामे निर्मुक्त चराचर ॥३॥
जगा संकट पडलिया जाण । श्रीराम सोडवी आपण ।
त्या श्रीरामाचे पाशबंधन । निजभक्तें जाण सोडविले ॥४॥
यालागी श्रीरघुनाथ । झाला भक्ताचा अंकित ।
तो ज्याच्या माथा ठेवी हात । त्यासी मुक्त करी श्रीराम ॥५॥
मुक्तोपकार फेडावया । अवतार धरणे रघुराया ।
धांवतसे लवलाह्यां । राखावया निजभक्ता ॥६॥
अंबरीषाची जन्मकथा । न साहवेचि भगवंता ।
स्वये झालाचि अंगीकारिता । उणें भक्ता येऊ नेदी ॥७॥
गज गांजितां पाणियेथडी । वैकुंठीहोनिया उडी ।
घालोनिया लवडसवडी । गज तांतडी सोडविला ॥८॥
दैत्ये पीडिलें प्रल्हादासी । न साहवे भगवंतासी ।
उतटूनिया कोरड्या खांबासी । निजरुपासी दाविले ॥९॥
दैत्य धरोनि मांडिवरी । चिरियेला नखाग्री ।
भक्ताकाजकैवारी । नरकेसरी पल्हाद ॥११०॥
निजभक्तांसीं अट्क । जरी पडले अलोलिक ।
तितकेंही रघुकुळटिळक । स्वांगे देख निवारी ॥११॥
ऐसा भगवंताचा निर्धार । म्हणावोनि हरिभक्त निरंतर ।
न वचकती अणुमात्र । हनुमान वीर अग्रणी ॥१२॥
पुढे देखोनि रघुवीरा । श्यामसुंदर मनोहरा ।
प्रेमे कांपत थरथरां । अश्रुधारा स्रवताती ॥१३॥
अंगी रोमांच रवरवित । स्वेदबिंदु डळमळित ।
कंठी बाष्प पै दाटत । सद्गदित पै वाचा ॥१४॥
सत्वभरितें न सांवरत । पडिला चरणावरी मूर्च्छित ।
श्रीराम अति प्रीती उचलित । आलिंगित निजहृदयीं ॥१५॥
आंवरुन सत्वावस्था । चरणांवरी ठेऊन माथा ।
झाला काय विनविता । सावधानता परिसावे ॥१६॥
अप्यग्रणीरात्मभुवां कपींद्रो जगाद देव जयपूर्वशब्दैः ।
निःशेषकर्तुं हि निशाचराणामस्मादृशां वा इह तर्जनात ॥२॥
जो भक्तांमाजी मुकुटमणी । ब्रह्मादिका अग्रगणी ।
श्रेष्ठ सकळिकांच्या स्रजनीं आत्मभू म्हणोनि त्यासी म्हणती ॥१७॥
भगवंतापासून ज्ञान । प्राप्त झाला चतुरानन ।
त्यासही लागले लांछन । स्वकन्या देखोन भुलला ॥१८॥
त्याहीपरीस विशुद्ध । कपिनाथ सावध ।
अद्वैतज्ञानें अगाधबोध । निजानंद भोगित ॥१९॥
वाती लावोनि पाहता । दुजे नये दृष्टचे हाता ।
तेथे कैंची विषयवार्ता । पूज्य तत्वता आत्मभूसि ॥१२०॥
भक्तांचा तरी मुकूटमणी । सबाह्य वेंचिलें श्रीरामभजनी ।
उसंत नाही अर्धक्षणी । मनादिकरणी सर्वथा ॥२१॥
सर्वप्राण सर्वशक्ती । उसंत नाही श्रीरामभक्ती ।
तो उभा राहोन मारुती । श्रीरामाप्रती विनवित ॥२२॥
हनुमंत रामाचे स्तवन करितो :
करोनि रामनामे भुभुःकार । जयजयकारें गर्जे थोर ।
श्रीरामासी उत्तर । काय कपींद्र बोलिला ॥२३॥
तू अकळ लाघवी रघुनाथा । सांडोनिया शरणागता ।
दीना वानरा समस्ता । कोणा न पुसता आलासी ॥२४॥
आम्हा गमतसे चित्ते । वंचोनियां निजभक्तांतें ।
स्वामी येणे केले तेथे । ते कळलें निश्चिते दातारा ॥२५॥
मारिलिया रावणास । पाताळीही राक्षस ।
प्रबळ होतील बहुवस । मागुतें आपणास येणे घडेल ॥२६॥
म्हणोनि श्रीरामा जाण । न मारिता रावण ।
येथे केले आगमन । यांची बोळवण करावया ॥२७॥
राक्षसांचा मनोगत । रावण मारील रघुनाथ ।
जाईल अयोध्ये त्वरित । आम्हांसी येथे सांडूनी ॥२८॥
मग आम्ही करावे काय । श्रीरामी भेटी कैंची होय ।
म्हणोनि रचिले उपाय । तुज पाहे आणावया ॥२९॥
तू अजेय गा सर्वथा । रणी नातुडसी झुंजतां ।
आपुले पूर्वजन्म शोधिता । युक्ति तत्वता आठवली ॥१३०॥
जन्मांतरीं निष्कामभजनीं । श्रीरामा तुज केले ऋणी ।
यास्तव तिही पाशेंकरोनी । तुज बांधोनी आणिले ॥३१॥
नाम स्मरतां श्रीरघुनाथ । महापापी उद्धरत ।
त्या तुज राक्षस बांधित । असंभावित हे वार्ता ॥३२॥
इहलोकी परलोकीं । ऋण फेडावें आवश्यकीं ।
हे जाणावया या लोकी । पास कौतुकीं साहिले ॥३३॥
हाचि तुझा निजविचार । श्रीरामा आहे साचार ।
की विचारिलें प्रकारांतर । वानरभार छळावया ॥३४॥
तुज राहिलिया गुप्तगतीं । वानरभार काय करिती ।
कोठे कोठे तुज पाहती । साधन करिती ते कोण ॥३५॥
तरी साधावया रघुनंदन । जे आचरावें ते बंधन ।
साधनी रिघोन अभिमान । वृथाचि जाण धांवडीत ॥३६॥
ऐसे जाणोनि मर्कट । सांडिले साधनकचाट ।
नाम स्मरती यथेष्ट । तेणे वाट दाविली ॥३७॥
नामी अनुसरलों तत्वता । शुद्धि लागली नाम स्मरता ।
नामे भेटविलें रघुनाथा । उपाय अन्यथा नेणे मी ॥३८॥
ऐसा विनवोनियां रघुनंदन । पुसता झाला वीर वायुनंदन ।
देई आज्ञा मजलागून । राक्षसनिधन करावया ॥३९॥
ऐकोनि कपीचे उत्तर । संतोषला रघुवीर ।
आलिंगिला पै सत्वर । अति चतुर तू होसी ॥१४०॥
अद्भुतशक्ति हनुमंता । वाचे न बोलवे सर्वथा ।
मज सोडविले रघुनाथा । बहुत आता काय बोलू ॥४१॥
पुसणे काय विचार । करी दुर्जनांचा संहार ।
वचन ऐकोनि कपींद्र । करु संहार आदरिला ॥४२॥
पूर्वीच अतर्क्य गती । पुच्छाचा वेढा नगराप्रती ।
करोनि राहिला मारुती । होता निश्चिती चिन्ह पाहत ॥४३॥
हनुमंत रामांच्या आज्ञेने राक्षसांना मारुन महिरावणाचा वध करितो :
श्रीरामाचे आज्ञापन । लाहोनियां कपिनंदन ।
करिता झाला कंदन । सावधना अवधारा ॥४४॥
श्रीरामाचे पाश बहुत । स्वयेंचि तुटले समस्त ।
पुढे देखिला कपिनाथ । अति आकांत राक्षसा ॥४५॥
एकाचे हातपाय गळाले । एकाचे प्राण कंठी राहिले ।
एका अधोवात सुटले । मुतों लागले उभ्यां उभ्यां ॥४६॥
एक आरडती ओरडती । एक पळाले मागुती ।
एक येती काकुळती । तृणें दांती धरोनि ॥४७॥
एके लागलीं दिक्पुटी । एकांची रुधली घांटी ।
तंव अवचित पुच्छाटी । वाजे पाठी अनिवार ॥४८॥
देखोनि सकळांची करुणा । न साहवे महिरावणा ।
येवोनियां समरांगणा । वायुनंदना पाचारी ॥४९॥
येरु ठायींच सावध । श्रीराम प्रभावें विशद्ध ।
करु आदरिलें युद्ध । अति सुबद्ध झोतधरणी ॥१५०॥
मिसळले द्वंद्वयुद्धा । मागे न सरती कदा ।
येरयेरांचिये वधा । करिती सावध येरयेरा ॥५१॥
येरयेरा लाविती कळा । परस्परें चेपिती गळा ।
वर्मी हाणिती सबळा । आणिती तळा परस्परें ॥५२॥
येरयरां हाणिती धके । गुडघे कोंपर तिखट नखे ।
वोरबडे एकमेकें । अति तवकें काढिती ॥५३॥
हनुमान वज्रदेही वीर । अंगावरी न वचे चीर ।
राक्षसाचे शरीर । नखी सत्वर विदारिलें ॥५४॥
हनुमान विचारी निजचितें । विलंब कासया करु यथें ।
हाणी आवेशें बहुते । मुष्टिघाते मस्तकी ॥५५॥
माथा लागता आघात । मस्तक गेला कोथळांत ।
भडभडा रुधिर वमित । प्राण निश्चित सांडिला ॥५६॥
देखता श्रीरघुनाथा । हनुमंताचेनि हातें मरतां ।
चारी देहा हाणोनि लाता । श्रीरामी तत्वता मिळोनि गेला ॥५७॥
स्थूळ सांडी नश्वर म्हणोन । सूक्ष्म ते मनोजन्य ।
कल्पनामात्र ते कारण । स्वरुपाभिमान ते चौथें ॥५८॥
होता श्रीरामदर्शन । अप्राप्तता निमाली पूर्ण ।
नित्यमुक्ततेची निजखूण । बाणली संपूर्ण राक्षसा ॥५९॥
पृथ्वी सदाचिंतित । माझे माथा श्रीरघुनाथ ।
विचरत आहे अहोरात । कृतकृतार्थ तेणे मी ॥१६०॥
तेथे स्वरुपाभिमान । राहोनिया कार्य कोण ।
मग लाजोनियां जाण । झाली लीन श्रीरामी ॥६१॥
ऐसे पृथ्वीचें अंतःकरण पूर्ण । तिचे नांवाचा महिरावण ।
दृष्टी देखता रघुनंदन । झाला जाण नित्यमुक्त ॥६२॥
कृपाळु श्रीरघुनंदन । फेडावया पूर्वभजनऋण ।
येवोनि पाताळा आपण । राक्षस जाण उद्धरिला ॥६३॥
एका जनार्दना शरण । मारियला महिरावण ।
पुढे वधूं अहिरावण । सावाधान अवधारा ॥१६४॥
स्वस्ति श्रीभावार्थारामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
महिरावणवधो नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥
ओंव्या ॥१६४॥ श्लोक ॥२॥ एवं ॥१६६॥
