मायबाप करिती चिंता ।
1754.
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगता ॥१॥
नको जाऊ देउळासी । नेतो बागुल लोकासी ॥धृपद॥
वैष्णवा संगती । हाती पडली नेणो किती ॥२॥
कर्णद्वारे पुराणिक । भुलवी शब्दे लावी भीक ॥३॥
आम्हा कैचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥
तुका म्हणे जाणे नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
अर्थ :
एखादा मुलगा परमार्थ करतो आणि ते त्याच्या आई बापाला आवडत नाही मग त्याच्याविषयी त्याच्या आई बापाला फार चिंता लागते ते म्हणतात काय करावे याला कितीही सांगितल तरी हा ऐकतच नाही. मग ते आईबाप त्या मुलाला म्हणतात अरे तू त्या देवळामध्ये जाऊ नकोस बंर कारण तेथे बागुलबुवा आहे तो लोकांना धरून नेत असतो. अरे त्याची भक्ती करणाऱ्या वैष्णवा च्या संगतीत असे किती लोक आहेत की त्यांचे हात साफडले आहेत. आणि हे पुराणिक लोक कानात असे सांगतात की जग मिथ्या आहे व त्याची कथा पटवून सांगतात आणि त्यांच्या शब्दात भुलुन टाकून भिकेला लावतात. अरे तू जर त्या उघड्या वैष्णवाची संगती करशील तर तु ही त्यांच्यासारखाच होशील मग आमची सेवा करण्यासाठी ईथे कोण राहील ? तुकाराम महाराज म्हणतात ज्या मुलाला अशा दुष्ट आई बापाचा उपदेश ऐकून नरकाला जायचं असेल त्यांनी त्यांचा उपदेश ऐकावा.
