पोट धाले मग न लगे पं
2636.
पोट धाले मग न लगे पंगती । झालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥
आपुलिया हाते देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥धृपद॥
घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी छंदे प्रेमाचिया ॥२॥
तुका म्हणे तोचिवरी करकर । मग हे उत्तर खंडईल ॥३॥
अर्थ :
एकदा की पोट भरले की पुन्हा पंगतीला बसावे लागत नाही आणि एकदा की निश्चिंती झाली की भक्तीचा खेळ गोड वाटतो. हे विठ्ठला तू आपल्या हाताने मला घास भरव आणि त्यानंतर मला भक्तीचे पाणी पाज. हे विठ्ठला तुझ्या प्रेमाच्या आनंदाने मला घराचा विसर पडेल आणि तुझ्या प्रेमाच्या छंदात मी नाचेन. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला जोपर्यंत तू माझे पोट भरवित नाही तोपर्यंत मी तुझ्याजवळ अशीच किरकिर करीन एकदा की माझे पोट भरले की मग माझे बोलणेच बंद पडेन.
