संत भानुदास अभंग मुम
४९.
संत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध
ये संसारी बहूता वाटा । सिद्ध साधका सुभटा ।
दीप देहींचा गोमटा । तवंची ठाका सुपंथू ॥१॥
मग आयुष्यांच्या अस्तमानीं । पडलिया काळाच्या वदनी ।
तें वेळे न राखे मायाराणी । वडवा जंखिणीं प्राणियां ॥२॥
मार्गु सांपडला निगुती । ध्रुव प्रल्हाद परीक्षिती ।
आम्ही तयाचे सांगाती ॥ भावे भक्ति अनुसरलों ॥३॥
लहाना आनि सहाना । इडा पिंगळा सुषुम्ना ।
पवनपंथे योगी जाणा । ब्रह्मास्थान न्यावया ॥४॥
तेथें सप्त धातूंची आटणी । या नांव बोलिजे कुंडलिनी ।
ती तंव असाध्य कहाणी । तुम्ही त्या पंथे नव जावे ॥५॥
एक यज्ञाचोनि बळे । इच्छी स्वर्गांची फळे ।
दिवस चारी सोहळे । पुरती इंद्रियांचे ॥६॥
तप वेंचिलिया पुढती । मागुती मृत्युलोकी लोटतीं ।
तेथें आहे पुनरावृत्ती । तुम्ही त्या पंथे नव जावे ॥७॥
नाना बळिदाने देती । गळा वोखदें बांधिती ।
क्रूर दैवते पूजिती । ते काय पुरविती इच्छिले ॥८॥
तैसा नव्हे लक्ष्मीपती । त्याची कोणी न करिती भक्ति ।
मुढ सिंतरले नेणो किती । तया होय गती यमापंथु ॥९॥
तीर्थे तीर्थ प्रदक्षिणा । क्षमा नाही अंतःकरणा ।
कोप आलिया उगाणा । होय केलीया पुण्याचा ॥१०॥
तैसीच प्रतिज्ञा मतें । गर्वें वाहवालीं बहूतें ।
तुम्ही नव जावे तया पंथे । साधुसंगती अनुसारा ॥११॥
हरिश्चर्द्रं सूर्यवंशी । तेणें ठीकिली हो काशी ।
अर्थ दिधला महंतासी । स्त्रीपुत्रांसी विकुनी ॥१२॥
तैसेंच बळी बिभीषण । हनुमंत उद्धव अक्रूर जाण ।
रुक्मागंद सुलक्षण । येणेंचि पंथे उद्धरले ॥१३॥
मेघ वर्षाती धारा प्रबळा । तेणें वाहाती नदी नद वोहळा ।
त्या मीनलीया सिधुं जळा । आगाधपण पावती ॥१४॥
तैसी ही विद्या पाहा हो । श्रीगुरुचरणी प्रेमभावो ।
भानुदास म्हणे हा उपावो । संसार वावो निस्तरेल ॥१५॥
५०.
मनासी करी पा रे बोध । आतां लवकरी होई सावध ।
सांडी द्वैत भेदाभेद । वाचे उच्चारी रामकृष्ण गोविंद ॥१॥
व्रत करी एकादशी । नेमे जाई पंढरीसी ।
आषाढी आणि कार्तिकीसी । दोही वारींसी चुकों नको ॥२॥
सोपे वर्म म्हणे भानुदास । नाचा गाता माना उल्हास ।
आणिक नको बा हव्यास । साधी साधन हेंचि सोपे ॥३॥
५१.
योगाचिया आटी नको धरुं पोटीं ।
वायीं शीण तळवटीं तुज होय ॥१॥
यज्ञाचिया आटी नको धरु पोटीं ।
वाया शीण तळवटी तुज होय ॥२॥
जपाचिया आटी नको धरुं पोटीं ।
वाया शीण तळवटी तुज होय ॥३॥
तपाचिया आटी धरु नको पोटीं ।
वाया शीण तळवटीं तुज होय ॥४॥
अनुष्ठानाचिया आटी नको धरु पोटीं ।
वाया शीण तळवटीं तुज होय ॥५॥
भानुदास म्हणे रामनामे गोष्टी ।
धन्य तू सृष्टिमाजीं होई ॥६॥
५२.
कामाचिया सोसे पडशी पतनीं ।
यमाची जाचणी बहु असे ॥१॥
क्रोधाचिया सोसे पडशी पतनीं ।
यामाची जाचणी बहु असे ॥२॥
मदाचिया सोंसे पडशी पतनीं ।
यमाची जाचणी बहु असे ॥३॥
लोभाचिया सोसे पडशी पतनी ।
यमाची जाचणी बहु असे ॥४॥
भानुदास म्हणे सांडोनिया सोस ।
होई रे उदास सर्व भावे ॥५॥
५३.
आशेचिया सोसे गुंतसी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्याशींच्या ॥१॥
मदाचिया सोसे गुंतसी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्यांशींच्या ॥२॥
तृष्णेचिया सोंसे धांवंशी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्याशींच्या ॥३॥
कल्पनेच्या मागे धांवशी कल्पका ।
न पावसीं सुखा बुडसी वाया ॥४॥
भानुदास म्हणे सर्व हें सोडुनी ।
एक चक्रपाणी सखा करी ॥५॥
५४.
साधनाच्या आटी नको रे कपाटीं ।
पंढरी वैकुंठ पाहें डोळा ॥१॥
मंत्राचा आटी पडशील व्यसनीं ।
पंढरी जाउनी पाहे डोळा ॥२॥
तपाचिया आटी पडशी डोंगरीं ।
पाहें पा पंढरी डोळेभरी ॥३॥
यज्ञाच्या आटी फिरु नको देशा ।
पंढरीनिवास पाहे डॊळां ॥४॥
भानुदास म्हणे नामाचा हव्यास ।
पंढरी सुखास पात्र होशी ॥५॥
५५.
भाबांवसी का रे माझें म्हणसी ।
कोण हे कोणासी कामा आले ॥१॥
घेई तू अनुभव कोणाचे ते कोण ।
अंतकाळीं जाण पारखे होती ॥२॥
जवळी असता धन कांही रुका ।
तेव्हा म्हणती सखा दादा भाई ॥३॥
हीनपणें म्हणती अभागी करंटा ।
जन्मला फुकटा मारतां बरें ॥४॥
भानुदास म्हणे ऐसे हे जन ।
परी माझे जाण करिती वाया ॥५॥
५६.
नको फिरूं रानीं वनी तू दुर्गघाट ।
सोपीं आहे वाट पंढरीची ॥१॥
नको करु जप तप अनुष्टाहान ।
सोपी आहे जाण पंढरी हे ॥२॥
नको जाऊ तीर्था मनाच्या हव्यासे ।
जाई तुं उल्हासें पंढरीसी ॥३॥
नको करु योग अष्टांग निर्वाण ।
सोपें तें भुवन पंढरी जगी ॥४॥
भानुदास म्हणे सोपें वर्म राम ।
कासयासी श्रम करिसी बहु ॥५॥
संत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध समाप्त
